ई-जीवन है… –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/column/satirical-column/internet-generation/articleshow/81027631.cms

सध्या आमचे जीवन ‘ई ई ई’ झाले आहे नुस्ते! ई-मेल, ई-बुक, ई-पेपर, ई-शॉपिंग, ई-चलन असे अनेक ई-चलनवलन करीत करीत आता आम्ही ई-बाइकपर्यंत येऊन पोचलो आहो. मधल्या लॉकडाउनच्या काळात तर या ‘ई’नेच आम्हाला केवढा आधार दिला होता, याची कल्पनाच केलेली बरी! सध्या इंधनाच्या वाढत्या दरांनी शंभरी गाठली असताना आम्हाला ई-बाइककडे वळावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. शिवकालीन मावळ्यास घोड्याचे जे महत्त्व, तेच पुण्यपत्तनस्थ पुरुषास बाइकचे! पुण्यपत्तनस्थ महिलाही झाशीच्या राणीप्रमाणे त्यांच्या स्कूटरी पळवीत असतात. पुण्यातील पुरुषास एक वेळ प्रेयसी नसली तरी चालेल (म्हणजे बहुतांश नसतेच); पण बाइक ही हवीच! अशा या बाइकवर दौड मारावयाची तर सध्या इंधनाच्या दराने खिसा आरपार कापल्याचे फीलिंग येते आहे. एके दिवशी प्रात:समयी, शनिपार केंद्रबिंदू धरून अडीच किलोमीटरच्या त्रिज्येबाहेरही जग असल्याची खबरबात नसलेल्या आमच्या एका मित्रास आमची ही चिंता बोलून दाखविली असता, त्याने आम्हाला (स्वाभाविकच) वेड्यात काढले. ‘पेट्रोल कितीही वाढू दे, मी नेहमी पन्नासचंच टाकतो,’ असे सांगून त्याने आम्हाला दरवाढीवरचा अक्सीर इलाज मोठे गुपित सांगितल्याच्या आविर्भावात ऐकविला. आम्हाला हे लक्षातच आले नव्हते. अगदी खरे आहे! पेट्रोल किती का महाग होईना, आपण नेहमी पन्नासचेच टाकायचे, असा दृढनिश्चय करून आम्ही तिथल्या तिथे मित्राला ‘अमृततुल्य’मधला आणखी एक कटिंग चहा पाजला. एवढी महागाई झाली, तरी आमच्या दुकानदाराने चहा १० रुपयेच ठेवला होता. आता त्याच्या कपाचा आकार लहान लहान होत काही दिवसांनी तो पळीनं हातावर तीर्थासारखा चहा देईल, तो भाग वेगळा! ते चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले असता, आम्हाला एवढ्या महागाईतही हसू आले. तोच डोक्यात ट्यूब पेटली. आम्ही मित्राच्या डोक्यावर टपली मारून, त्याला ‘बुद्धू कुठला,’ असे म्हटले आणि बाइकला किक मारली. ताजा अमृततुल्य चहा प्यायल्यानंतर खरोखर किक बसून आमचे डोके घोड्याप्रमाणे दौडू लागते. हाच तो दिव्य क्षण… समोरच आम्हाला ई-बाइकची जाहिरात दिसली. आता तातडीने ही ई-बाइक घ्यायची आणि पेट्रोल पंप विसरून जायचा, असे मनोरथ आम्ही १२० च्या स्पीडनं पळवू लागलो. आपल्याला इंधनदरानं ग्रासलं आहे आणि आपण अत्यंत त्रस्त झालो आहोत, असं स्वप्न पाडून घेण्याचा रात्री अतोनात प्रयत्न केला. मात्र, एकदाही तसं वाटेना. आपण अचानक उच्च मध्यमवर्गीय झालो की काय, या विचारानं शहारलो. (बघा, ‘श्रीमंत’ हा शब्द कल्पनेतही सुचत नाही!) आयुष्यात बाकी काही नाही; पण एका विशिष्ट मानसिक दारिद्र्यरेषेच्या वर यायचं नाही, असा आमचा निर्धार आहे. इंधनदर आपल्याला चक्क परवडत आहेत, हा विचार त्या निर्धाराला छेद देत होता. आता ई-बाइक घेतली तरच हा निर्धार कायम राहणार होता. तातडीने ई-शोरूमवर जाऊन किंमत बघितली. सहा आकडी किंमत बघितली आणि ‘आकडी’ आली. आम्ही पुन्हा आमच्या दारिद्र्यरेषेखाली आलो होतो… मनोमन खूश होत आम्ही गुणगुणू लागलो… ई-जीवन है… इस जीवन का यही है, यही है, यही है रंगरूप!

– चकोर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s