कलेक्टर कचेरीवर फडकावला तिरंगा–महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/makarand-joshi-article-on-freedom-fighter-kumud-gupte-nachane/articleshow/80910208.cms

​​महात्मा गांधीजींनी १९४२ साली ब्रिटिशांना ‘चले जाओ’ म्हणून ठणकावले आणि देशभरात स्वातंत्र्य आंदोलनाची आग भडकली. ठाण्यासारख्या शहरात जिथे आधीपासूनच स्वातंत्र्य चळवळीला पूरक आणि पोषक वातावरण होते,

मकरंद जोशी

महात्मा गांधीजींनी १९४२ साली ब्रिटिशांना ‘चले जाओ’ म्हणून ठणकावले आणि देशभरात स्वातंत्र्य आंदोलनाची आग भडकली. ठाण्यासारख्या शहरात जिथे आधीपासूनच स्वातंत्र्य चळवळीला पूरक आणि पोषक वातावरण होते, तिथे या आंदोलनाचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले. शालेय विद्यार्थ्यांनी शाळांवर बहिष्कार घातला. विदेशी कपड्यांच्या होळ्या करण्यात आल्या, महिला-मुले मोर्चांमधून आंदोलनाचा आवाज बुलंद करू लागले. यातच काही शाळकरी मुलींच्या मनात एक धाडसी कल्पना आली. ठाण्याच्या कलेक्टर कचेरीवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकत असे, तो काढून तिथे भारताचा तिरंगा फडकवण्याचा बेत आखला गेला. एका सकाळी कलेक्टर साहेबांनी झेंडा फडकवला आणि ते आपल्या कचेरीत गेले. त्यानंतर या विरबाला कचेरीच्या मागे दत्त मंदिर होते,तिथल्या झाडांवर चढून झेंड्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी ब्रिटिशांचा झेंडा काढून तिथे भारताचा तिरंगा फाडकावला. त्यानंतर ‘भारत माता की जय’ च्या आरोळ्यांनी त्यांनी कलेक्टर कचेरी दणाणून सोडली. साहजिकच बंदोबस्तावरचे पोलिस जमा झाले आणि मुलींनी गाजवलेला पराक्रम लक्षात आला. मग या मुलींना रितसर अटक करण्यात आली, पण कोर्टात उभे केल्यानंतर यांची वये १५पेक्षा कमी आहेत म्हणून दोन दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्यांना सोडण्यात आले. शाळकरी वयात थेट कलेक्टर कचेरीवर झेंडा फडकवण्याचे शौर्य गाजवणाऱ्या या मुली म्हणजे कुमुद गुप्ते, नलिनी प्रधान आणि सुमन नाडकर्णी. या मुलींनी शाळेत असल्यापासूनच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावले.

ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर बाळासाहेब गुप्ते यांची कन्या कुमुदिनी तथा कुमुद हिने शाळकरी वयात घेतलेला देशसेवेचा वसा आजन्म निष्ठेनं पाळला. ८ एप्रिल१९२९ रोजी कुमुदचा जन्म झाला. ठाण्यातल्या न्यू गर्ल्स हायस्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. शाळकरी वयापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्याने सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्यांच्या पदरी होता. बेचाळीसच्या चळवळीत पत्रके वाटणे, प्रभात फेरीत, मोर्चात सहभागी होणे, परदेशी कपड्यांच्या होळीसाठी घरोघरी जाऊन तसे कपडे गोळा करणे ही कामे त्यांनी मनापासून केली. गुप्ते कुटुंबाचे स्नेही असलेल्या नाचणे कुटुंबातच त्यांची सोयरिक जमली. वसंत वासुदेव नाचणे यांच्याशी कुमुदचा विवाह झाला.

कुमुद यांचे पती वसंत नाचणे यांचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी झाला. ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाहीर लिलाधर हेगडे हे त्यांचे शाळासोबती. वसंताही आपल्या मित्रांबरोबर स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाला होता. सेवा दलाच्या मुशीत सामाजिक समता, सर्वधर्म समभाव, अहिंसक आंदोलने याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यामुळेच १९५१ साली कुमुदबरोबर विवाह झाल्यानंतर त्यांनी कुमुदलाही सेवादलाच्या कामात जोडून घेतले. रिझर्व बँकेत नोकरी करणारे वसंतराव सेवा दलाच्या इंटरनॅशनल विभागाचे प्रमुख होते. पुढे याच विभागामार्फत ते युरोपमध्ये कॉन्फरन्सला गेले. तिथे सिंगापूर, अर्जेंटिनाच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी युरोपातील आठ देशांचा दौरा केला आणि त्या त्या देशातील शिक्षण व्यवस्था, शाळा, जीवनशैली यांची पाहणी केली. लग्नानंतर कुमुदताई सेवादलाच्या माध्यमातून सुरू झालेल्या ‘समाजवादी महिला परिषदेच्या’ स्थापनेत सहभागी होत्या. या परिषदेच्या मार्फत महिलांमध्ये जागृती करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी त्या काम करू लागल्या.

१९५४ साली ठाण्यातील नागरिकांनी एकत्र येऊन मासुंदा तलावात वाढलेली हायसिंथ वनस्पती काढून तलाव स्वच्छ केला तेव्हा या मोहिमेत वसंतराव सहभागी होते. त्यानंतर या तलावाचा काही भाग बुजवून वाढत्या शहरासाठी नवा रस्ता करावा का ? याचा निर्णय घ्यायला एक समिती तयार करण्यात आली होती. ग. ल. जोशींच्या अध्यक्षतेखालील त्या समितीत वसंतराव नाचणे सभासद होते आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार आजच्या जांभळी नाक्यावरून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता निर्माण झाला. पुढे १९७५ साली आणीबाणी जारी झाली तेंव्हा त्या दडशपशाही विरुद्ध आवाज उठवण्यात नाचणे दाम्पत्य आघाडीवर होते. आणीबाणीमध्ये सरकारी हुकुमांचा भंग केल्याच्या कारणावरून शेकडो लोकांना ठाण्याच्या तुरुंगात बंदिवान केले होते. यातील ठाण्याबाहेरच्या कैद्यांच्या परिवारासाठी नाचण्यांचे घर म्हणजे हक्काचे आश्रयस्थान ठरले होते. बाहेरगावचे लोक ठाण्याच्या तुरुंगात अडकलेल्या आपल्या कुटुंबीयांना भेटायला यायचे तेंव्हा त्यांना वसंतराव आणि कुमुदताई मदत करायच्या. या लोकांना ठाणे कारागृहाकडे घेऊन जाणे, बंदिवासातील त्यांच्या माणसाशी भेट घडवून आणणे आणि तुरुंगातील राजबंद्यांना घरचे जेवण देणे ही कामे कुमुदताईंनी आपुलकीने केली. वसंतराव सरकारी नोकरीत असूनही त्यांनी आणि कुमुदताईंनी परिणामांची पर्वा न करता मानवतेच्या दृष्टीने कैद्यांना मदत करायचे धाडस दाखवले. १८ फेब्रुवारी २००० रोजी कुमुदताईंनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या ९५ वर्षांतील अनेक रोमांचक क्षणांचे साक्षीदार असलेले वसंतराव आज आपल्या कुटुंबियांसह समाधानाचे वार्धक्य अनुभवत आहेत. त्यांच्याशी बोलताना जुन्या ठाण्याचे आणि ठाणेकरांचे आनंददायी दर्शन घडते.

(माहिती आणि छायाचित्रे वसंतराव नाचणे यांच्या सौजन्याने)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s