दूरदृष्टीचा नवनिर्माता : हणमंतराव गायकवाड –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/literature/a-p-deshpande-book-review-on-the-visionary-entrepreneur-hanmantrao-gaikwad-by-dr-vijay-dhawale/articleshow/80297688.cms

हणमंतराव गायकवाड नावाचा मुलगा सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा. घरी दारिद्र्य. चौथीपर्यंतचे शिक्षण रहिमतपूरला झाल्यावर, पाचवीसाठी कुटुंब पुण्याला आले आणि नऊ बाय ११ फुटांच्या खोलीत राहू लागले.

अ. पां. देशपांडे

हणमंतराव गायकवाड नावाचा मुलगा सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा. घरी दारिद्र्य. चौथीपर्यंतचे शिक्षण रहिमतपूरला झाल्यावर, पाचवीसाठी कुटुंब पुण्याला आले आणि नऊ बाय ११ फुटांच्या खोलीत राहू लागले. पुण्यातील शाळेत प्रवेश मिळवला; पण बसने जायला रोजचा एक रुपया कुठे होता? मग दोन-दोन तास पायी चालत जायचे; पण शाळेत दर वेळी पहिला क्रमांक. त्यानंतर इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि नंतर पदवी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचे कर्ज काढून, पुण्यातील ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश घेतला. इथे येण्यासाठी सायकलवर ४० किमीची रपेट करावी लागे; मात्र हुशारी पाहून शिक्षकांनी त्यांना सवलतीत वसतिगृहातील खोली दिली. जेवायला पैसे नसत. उपाशी राहून दिवस काढले. उद्योजक असलेल्या हणमंतराव गायकवाड यांचा हा खडतर प्रवास समजतो, तो ‘द व्हिजनरी एंटरप्रेनिअर हणमंतराव गायकवाड’ या डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकातून.

पैसे मिळवण्यासाठी शिकवण्या घेतल्या, घरांची रंगकामे केली. बालेवाडी ‘क्रीडाग्राम’मधील रस्ता बांधून दिला; पण कॉलेजातील पहिला क्रमांक सोडला नाही. मग ‘टेल्को’त नोकरी केली. ‘टेल्को’त कचऱ्यात फेकून दिल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारा डोके लढवून सरळ करून, त्या परत कामात आणून कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यांना कंपनीचे साफसफाईचे कंत्राट हवे होते; पण तेथे कर्मचारी म्हणून ते करता येणार नाही हे समजल्यावर, त्यांनी ‘भारत विकास ग्रुप कंपनी’ स्थापली. त्यांचा बँक मॅनेजर असलेला मित्र उमेश माने यानेही राजीनामा देत त्यांच्यासोबत काम सुरू केले.

‘भारत विकास’ची प्रसिद्धी होऊ लागली. पुढे कुर्ल्याची फियाट कंपनी पुण्याजवळ रांजणगावला हलवून परत उभारून द्यायची होती. काहीही अनुभव नसताना ‘भारत विकास’ने हे काम मिळवले आणि ८००० ट्रक लावून ते यशस्वी केले. मग टाटांचा पश्चिम बंगालमधील नॅनो गाड्यांचा कारखाना गुजरातमध्ये हलवण्याचे काम मिळाले. ‘भारत विकास’ची सर्व कामे यशस्वी झाली, असे नाही. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना तीन वर्षे चालवायला घेतला; पण ते जमले नाही. अशा अनेक चढउतारांची ओळख या पुस्तकातून करून घेता येते.

एक दिवस लोकसभेच्या लायब्ररीच्या सफाईचे काम आले. कुठलेही काम जिद्दीने करणाऱ्या हणमंतरावांनी, मशिनरी भाड्याने घेऊन हे काम स्वीकारले व यशस्वी केल्याने, अनेक खासदारांनी त्यांची लोकसभेच्या आतली साफसफाई करण्यासाठी शिफारस केली; त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेची कामे मिळाली. ती नीट झाल्याने मग पंतप्रधानांचे निवासस्थान आणि राष्ट्रपती भवनही याच कामासाठी मिळाले. अनेक कंपन्यांकडून कामामागे कामे येत राहिली. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आळंदी, पंढरपूर आणि तुळजापूरची मंदिरे विनामूल्य साफ करायचे काम स्वीकारले.

हणमंतरावांच्या ‘भारत विकास’ने अनेक समाजोपयोगी कामे करण्याचे ठरवले. त्यांनी महाराष्ट्र धरून तीन राज्यांत १७०० रुग्णवाहिका चालू केल्या आणि १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर २० मिनिटांत रुग्णवाहिका मिळण्याची सोय केली. महागड्या रासायनिक पिकांऐवजी, जास्त पीक मिळवण्यासाठी आणि कीड काढण्यासाठी त्यांनी संशोधनपूर्वक अॅग्रो सेफ, अॅग्रो मॅजिक आणि अॅग्रो न्यूट्री ही हर्बल उत्पादने काढून, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, सातारा, जालना, लातूर, सोलापूर जिल्ह्यात ढोबळी मिरची, भोपळा, आले, डाळिंबे, मिरची, क्रिसेन्थम फुले, पपई, कपाशी या पिकांचा आकार टपोरा केला आणि उत्पादन वाढवले. ज्या ज्या शेतकऱ्यांची उत्पादने वाढली, त्यांची नावे फोन क्रमांकासह या पुस्तकात दिली आहेत. याशिवाय, हणमंतरावांनी सौर ऊर्जा, सौर पंप, गायी-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी बीव्हीजी वर्धन पावडरीवर वाढवलेला चारा, अशा कामातही लक्ष घातले. अशा अनेक विस्मयकारक गोष्टी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

आज हणमंतरावांच्या ‘बीव्हीजी’ कंपनीत एक लाख लोक काम करत असून, माणसांना टिकवण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या गाडीचा चालक जगन्नाथ आता दरमहा ५० हजार रुपये पगार मिळवतो. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुखदु:खाच्या प्रसंगी ते अथवा त्यांची बायको वैशाली, कर्मचाऱ्याच्या घरी जातात. ही सगळी कहाणी कॅनडाच्या डॉ. विजय ढवळे या उद्योगपतीने भारतात येऊन, पन्नासाहून अधिक मुलाखती घेऊन लिहिली आहे.

द व्हिजनरी एंटरप्रेनिअर हणमंतराव गायकवाड

प्रकाशक : भारत विकास ग्रुप

लेखक : डॉ. विजय ढवळे

पाने : १८०

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s