वाट ‘वळणा’ची.. –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/dr-sangeeta-godbole-talks-about-child-discipline-methods-and-women/articleshow/80730960.cms

पाचव्या वर्षाचा ट्रिपल पोलिओ बूस्टर डोस द्यायला एक उच्चशिक्षित आई आपल्या मुलाला घेऊन आली होती. त्यानं मोठं भोकाड पसरलेलं. आई त्याला समजावत होती, ‘तुला नाही मला देणार इंजेक्शन.

डॉ. संगीता गोडबोले

पाचव्या वर्षाचा ट्रिपल पोलिओ बूस्टर डोस द्यायला एक उच्चशिक्षित आई आपल्या मुलाला घेऊन आली होती. त्यानं मोठं भोकाड पसरलेलं. आई त्याला समजावत होती, ‘तुला नाही मला देणार इंजेक्शन.’ मला असं खोटं बोललेलं आवडत नाही कधीच. मुलांना आधी समजावून सांगून मग मी इंजेक्शन देते नेहमी. मुलाचा ‘ आ’ काही मिटत नव्हता. शेवटी पकडून दिलं इंजेक्शन. खुर्चीत बसेपर्यंत एक सण्णकन कानाखाली वाजवल्याचा आवाज. मी पटकन वळले आणि म्हटलं, ‘अगं, मारतेस कशाला? मूल आहे, रडणार थोडंसं.’ तिनं कसानुसा चेहरा करून पाहिलं माझ्याकडे. चक्क त्या पोट्ट्यानं दिली होती आईच्या कानाखाली. आता माझे हात असे शिवशिवत होते म्हणता. इंजेक्शन दिल्याबद्दल त्या एवढ्याशा मुलानं आईच्या कानफाटात द्यावी आणि आईनं ती निमूटपणे खाऊन घ्यावी. चाइल्ड सायकॉलॉजीच्या नावानं चांगभलं. काय चाललंय नि कसं चाललंय, हे एक त्या परमेश्वरालाच ठाऊक. मुलांना वळण लावायचंच नाही? की वळण लावण्याचे योग्य मार्गच या आईला माहीत नसतात ? नीतीमूल्य शिकवणार तरी कशी यांना?

मला लहानपण आठवलं. दिवाळीच्या दिवसात भातुकलीचा खेळ मांडायचा. सगळ्या मैत्रिणी गोळा करायच्या. बाहुलाबाहुलीचं लग्न करायचं. एका वर्षी बाहुलीच्या लग्नात साडी नेसलेली मी, वरमाई म्हणून तीन चाकी सायकलवर वरातीसाठी बसले. आईनं सांगितलं होतं, साडी नेसून सायकलवर बसू नकोस. चाकात अडकेल. पण वय लहान आणि हौस मोठी. कुणीतरी म्हणालं, ‘काही होत नाही गं. बस तू.’ पण दुर्दैव कसलं, हट्ट नडला माझा. आईची प्युअर सिल्कची साडी चाकात अडकवून ठेवली मी. काढताना वाकडी तिकडी फाटली. वर आईला सांगू नकोस म्हणून मैत्रिणीच्या आईने शिवूनपण दिली. घरी आले पेटीकोटवरच बारीक चेहेरा करून. छातीत धडधडतय पण आईशी खोटं बोलण्याची हिंमत नव्हती. आईनं ओळखलं. अर्धा तास घराबाहेर उभं केलं. मग आली न् जवळ घेऊन म्हणाली न ऐकण्याची इतकी शिक्षा पुरे. पण खोटं बोलली नाहीस म्हणून तुला रागावणार नाही नि मारणार पण नाही. साडी काय गं, दुसरी मिळेल पण तुझा सच्चेपणा गेला तर कुठे जाऊ?

चार / पाच वर्षांच्या वयात ती बोललेलं फारसं कळलं नाही पण आज अर्थ उलगडतोय. खोटं बोलू नये, सचोटीनं राहावं, हा धडा न सांगता मिळाला होता. कधी मारलं नाही तिनं. पण डोळ्यात तेल घालून लक्ष असायचं. नुसत्या डोळ्यांच्या धाकात होतो आम्ही. आता चाईल्ड सायकॉलॉजीच्या नावाखाली मुलांना रागवायचं नाही, शिक्षा करायची नाही म्हणत आई बापांच्या आंगावर ओरडणारी आणि त्यांच्या थोबाडीत मारणारी मुलं पाहाते मी तेव्हा माझेच हात शिवशिवतात. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की ऐकली पाहिजे हा शिरस्ता होता. भावंडांशी भांडण झालं म्हणून काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा ओरडले किंवा एखादा फटका दिला तर असं का ? म्हणून आईबाप विचारत नव्हते. पानात वाढलेलं सगळं संपवलं पाहिजे. आवडीचे असो वा नसो. आईनं कष्टानं बनवलेल्या अन्नाचा मान राखलाच पाहिजे ही शिस्त होती. संध्याकाळी परवचा म्हटला पाहिजे, पाढे पाठ केले पाहिजेत, असा अलिखित नियम होता. साधे साधे हिशोब करायला कॕलक्युलेटर लागत नव्हता तेव्हा. नियम साधे होते. फारसे जाचकही नव्हते पण त्या काळात न कळणारे अन् आता जाणवणारे कितीतरी फायदे होते त्या वळण लावण्यामध्ये. व्हॅल्यू एज्युकेशन हा विषय तेव्हा शाळेत शिकवावा लागत नव्हता. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच चालती बोलती विद्यापीठं होती नीतिमत्तेचे धडे देणारी.आमची पिढी तर या शिस्तीने तगली. आत्ताच्या आत्ता २ मिनिटवाल्या नूडल्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत, असा हट्ट करणारी मुलं आणि तो पुरवणारे आईबाप. ‘लाड’ नावाखाली दोघेही बिघडताहेत का? मुलांना देण्यासाठी वेळ नाही म्हणून सारं पैशानं विकत घेता येतं. त्यांना हवं ते हवं तेव्हा, योग्य वा अयोग्य हा विचार न करता देऊन टाकणं म्हणजे मुलांचे उत्तम संगोपन, असं त्यांना वाटतंय का?

अर्थात उत्तम रीतीने वेळेचे नियोजन करून करियर आणि कुटुंब यांचा समतोल सांभाळणारीही कित्येक जोडपी आहेतच हेही नाकारता येणार नाही. उगवती पिढी फार हुशार आहे. त्यांना हवी ती गॅजेट्स सहज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या सुयोग्य वापराबद्दल आईवडिलांनी जागरूक असायला हवं. कुटुंब छोटं असल्यामुळे एका किंवा फार तर दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी फक्त आईवडिलांवर येऊन पडते. आपले मूल आपल्याला हवे तसे वाढवता येते, असे स्वातंत्र्य मिळाले तरी ती हाताळण्याचे कौशल्य प्रत्येक आईबापात असेलच, असे नाही. आणि दुसरी गोष्ट मुलांना वळण लावणे हे काही एका क्षणाचे, एका दिवसाचे आणि एका माणसाचे काम नव्हे. त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, आजूबाजूचे वातावरण आणि त्यांचे आदर्श या सर्वांचा एकत्रित परिणाम त्यांच्या वागणुकीवर होत असतो, हेही विसरून चालणार नाही. एक मूल मोठं करणं, त्याचं संगोपन करणं त्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्न करणं तेही त्याला बालपणाचा आनंद देत आणि पुढे जाऊन बालपणाचा काळ सुखाचा, असं वाटणारं वातावरण देऊन, हे मोठं शिवधनुष्य असतं. ते सहज पेलता येणं हेच तर कसब असतं. ही ‘वळणा’ची वाट चालता चालता मुलांच्या आयुष्याची वाट सरळ होत जाईल अन् आयुष्याचे घाटही सुखद होतील, यावर फक्त विश्वास ठेवता यायला हवा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s