प्रयोगशील गुरुकुल –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/article/dr-pradnya-kadam-article-on-shri-arvind-gurukul-school-at-badlapur/articleshow/80722730.cms

प्रजासत्ताक दिनी बदलापूर, वांगणी व अंबरनाथ या परिसरात प्रत्येकी आठ ते दहा विद्यार्थ्यांचा गट मुलगी वाचवा, वीज वाचवा, पाणी वाचवा यावर पथनाट्य सादर करताना दिसतो.

प्रज्ञा कदम

प्रजासत्ताक दिनी बदलापूर, वांगणी व अंबरनाथ या परिसरात प्रत्येकी आठ ते दहा विद्यार्थ्यांचा गट मुलगी वाचवा, वीज वाचवा, पाणी वाचवा यावर पथनाट्य सादर करताना दिसतो. काही मुले त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार करताना दिसतात. त्या अनोळखी वस्तीत काहीजण कार्यक्रमासाठी लागणारे टेबल, तांब्या, भांडे या वस्तूंची जुळवाजुळव करताना दिसतात. काही मुले कार्यक्रमासाठी लोकांना निमंत्रण देताना दिसतात. ही प्रेरणा मुलांना शाळेकडून मिळते. हे सर्व कार्य मुले शाळेकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता करतात. शाळेतून यांना भारतमातेचे पूजन करण्यासाठी केवळ भारतमातेची प्रतिमा दिली जाते. आठ ते दहा मुले एका गटात असल्याने पाहुण्यांची ओळख, स्वागतगीत, योगासनांचे सादरीकरण, पथनाट्य, आभार प्रदर्शन असा कार्यक्रम ३० ते ४० मिनिटांत सादर करतात. या उपक्रमातून मुले सभाधीटपणा शिकतात. अनोळखी व्यक्तीशी बोलण्यातून त्यांचे संभाषणकौशल्य वाढते. निमंत्रणपत्रिका लिहिण्याचे कौशल्य येते. सांघिक व सहकार्याने काम करण्याची वृत्ती निर्माण होते. ही शाळा म्हणजेबदलापूर पूर्व, आपटेवाडी भागातील श्री अरविंद गुरुकुल शाळा.

अशा उपक्रमशील शाळेची प्रेरणा श्रीकांत देशपांडे यांना योगी अरविंद यांच्या पाँडेचरीच्या परीक्षाविरहित शाळेपासून मिळाली. केवळ वर्तमान शिक्षणपद्धतीला नावे न ठेवता अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश अशा पंचकोश विकसनपद्धतीला उपक्रमाची जोड देऊन मुलांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो. हे या शाळेने सिद्ध केले. पहिली ते सातवीच्या मुलांसाठी ‘आनंद बाजार’ व ‘जीवनव्यवहार’ हा उपक्रम चालवला जातो. यात विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या मदतीने वस्तू तयार करतात. कागदी पिशव्या, राख्या, फळांचे ज्यूस, भेळ, विविध भाज्या चिरून त्यांचे पॅकिंग करणे आणि नंतर त्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया प्रत्यक्ष करायला मिळतात. त्यामुळे मुले गणित हा विषय व्यवहार ज्ञानातून शिकतात.

बहुतेक वेळा ‘पर्यावरण शिक्षण‘ हे विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या आड दिले जाते. त्याला मर्यादा असतात. यासाठी शाळेने बदलापूरजवळील चामटोली गावातील एक छोटीशी शेतजमीन दत्तक घेतलेली आहे. तिथे झाडे लावलेली आहेत. एक वर्ग श्रमदानासाठी येतो. तसेच वनभोजनाचाही उपक्रम राबविला जातो. मुले स्वतः गटागटाने काम वाटून घेतात. स्वतः स्वयंपाक करून एकत्रितपणे वनभोजन करतात. यामुळे श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन व निसर्ग सहवास असे अनेक गुण त्यांच्या मनात रुजतात. दिवाळीच्या सुट्टीत मातृभूमी परिचय शिबीर आयोजित केले जाते. यात मुले सहा दिवस भारतातील विविध ठिकाणी राहतात. त्या ठिकाणचे आयोजन मुले शिक्षकांच्या मदतीने करतात. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सलग १३ वर्षे सायकल शिबिराचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाखाली मुले मुरबाड, पुणे, दमण, कोकण, अष्टविनायक यांसारख्या ठिकाणी जाऊन आले. हे करत असताना तेथील भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक महत्त्व, स्थान महात्म्य व व्यक्ती परिचय अशा अनेक गोष्टींचे अनौपचारिक शिक्षण त्यांना मिळते. निर्णय क्षमता साहस व समयसूचकता आदी गुण मुलांच्या अंगी बाणले जातात.

परीक्षाविरहित शाळा हे या संस्थेचे ध्येय आहे. परंतु सद्यस्थितीत मुलांना परीक्षांना सामोरे जावेच लागते. परीक्षांची भीती कमी व्हावी, यासाठी येथे ‘अभ्यास जत्रा’ भरवली जाते. वेगवेगळ्या विषयांतील घटकांचे वेगवेगळे टेबल मांडले जातात. तर तक्ते, आकृत्या, नकाशे, सादरीकरण यांच्या साह्याने मुले एखादा घटक शिक्षक व पालकांना समजावून सांगतात. एका विद्यार्थ्याला एका टेबलवर वीस मिनिटांचा वेळ दिला जातो. तो घटक साधारण विद्यार्थ्याला तीन वेळा सांगावा लागतो. परिणामस्वरूप त्याचा तो घटक चांगला तयार होतो. या सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी येथे सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेत एक कल्पक वेळापत्रक तयार केले आहे. येथील प्रयोगशील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व पालक विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती ठेवून हातात हात घालून काम करत आहेत. त्यामुळे ही संस्था इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.

या विविध उपक्रमांमुळे मुलांचा भावनिक बुद्ध्यांक वाढतो. व्यवहारज्ञान व शिक्षण यांची फारकत होत नाही. पर्यावरणाचे महत्त्व समजते. श्रमप्रतिष्ठा वाढते. विविध क्षेत्रभेटींमुळे राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आदी सामाजिक मूल्ये वाढीस लागतात आणि मग असे आत्मविश्वासाचे पंख लाभलेले विद्यार्थी यशाच्या आकाशात उंच गरुडझेप घेण्यास समर्थ होतात.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s