व्रतस्थ संग्राहक : परशुराम गंगावणे –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/manasa/padma-shri-award-get-to-parshuram-gangawane-in-sindhudurg/articleshow/80621222.cms

ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना केंद्र सरकारने यंदाचा ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर केल्याने व्रतस्थपणे काम करणाऱ्या या कलाकाराची सरकार-दरबारी यथोचित दखल घेतली गेली आहे.

व्रतस्थ संग्राहक : परशुराम गंगावणे

कोकणातील कुडाळजवळ पिंगळी गुढीपूर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करणारे ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना केंद्र सरकारने यंदाचा ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर केल्याने व्रतस्थपणे काम करणाऱ्या या कलाकाराची सरकार-दरबारी यथोचित दखल घेतली गेली आहे. गंगावणे यांनी सुरू केलेले ‘ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम व आर्ट गॅलरी’ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचे पहिलेच संग्रहालय. पंधरा वर्षांपूर्वी चक्क गोठ्यात सुरू झालेले हे संग्रहालय व त्याचा व्याप आता वाढला आहे. गंगावणे यांनी ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला, म्हणजे कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, पोतराज, वाद्यगोंधळ, डोना, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल या सर्व कलांचे या संग्रहालयाच्या माध्यमातून जतन केले आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या साह्याने त्यांनी अनेक जनजागृतीचे कार्यक्रम सातत्याने केले आहेत. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने त्यांना कळसूत्री बाहुल्या व चित्रकथीसाठी गुरू म्हणून नियुक्त केले आहे. ‘चित्रकथी’ या कलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजाश्रय होता; मात्र काळाच्या ओघात ही कला मागे पडत गेली. परशुराम १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील गेले. तेव्हापासून या कलेचे जतन करण्याचा निर्धार त्यांनी केला आणि गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ तो पाळलाही! हा निर्धार तडीला नेणे सोपे नव्हते. अनेकदा खायची भ्रांत पडली; हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या; अवहेलनाही सोसावी लागली. वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात पाय जायबंदी झाला. तरीही या कलेवरची त्यांची निष्ठा अजिबात ढळली नाही. मात्र, आज एवढ्या वर्षांनी त्यांच्या तपश्चर्येला फळ आले आहे. दहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या कलेची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. अनेक शाळांच्या सहली, तसेच पीएचडी करणारे अभ्यासक गंगावणे यांच्या संग्रहालयाला भेट द्यायला येत असतात. आता गंगावणे यांची मुले हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गंगावणे आज ६५ वर्षांचे आहेत. ‘पद्मश्री’ सन्मानानंतर त्यांच्या मनात आज केवळ कृतार्थतेची भावना असणार, यात आश्चर्य नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s