डॉ. प्र. चिं. शेजवलकर | लोकसत्ता

Clipped from: https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/p-c-shejwalkar-profile-abn-97-2377418/

शिक्षणाचा नोकरीशी संबंध असायला हवा की नाही, हा विषय गेली अनेक दशके  चर्चेत आहे. परंतु देशाला ज्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्याची उभारणी करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण देण्याचा विचार शिक्षण पद्धतीत वेगाने होताना दिसत नाही. डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी नेमकी ही गरज ओळखून एक अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकले. त्याला मोठा प्रतिसाद मिळणे स्वाभाविकच होते. याचे कारण उद्योगांना नेमके  काय हवे, याची चाचपणी ते अध्यापन करत असतानाच करत राहिले. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची स्थापनाही नेमक्या त्याच हेतूने झाली होती. तो उद्देश पुढे नेत डॉ. शेजवलकरांनी ‘व्यवस्थापन’ या विषयासाठी नव्या अभ्यासक्रमाची आखणी केली. उद्योगांनी शिक्षणसंस्थांच्या आवारात जाऊन तेथील गुणवान विद्यार्थ्यांना नोकरी देणे सुरू केले, तेही शेजवलकर यांच्या  पाठपुराव्यामुळे. त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या व्यवस्थापनशास्त्र संस्थेत प्रवेश घेतलेल्या अनेकांना सुरुवातीपासूनच थेट नोकऱ्या मिळू लागल्या. उद्योगांची गरज ओळखून मनुष्यबळ तयार करण्याची ही कल्पना म्हणूनच अतिशय महत्त्वाची आणि शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणणारी होती. सहा दशकांहून अधिक काळ शेजवलकर अध्यापन करीत होते. त्या काळात त्यांनी लिहिलेली पाठय़पुस्तके  विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ांसाठी अत्यावश्यक ठरली. उत्तम शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होताच, पण विद्यार्थ्यांच्या हितासाठी अभ्यासक्रमाबाहेर जाऊन जे जे करता येईल, तेही  त्यांनी आत्मीयतेने के ले. त्यामुळे निवृत्ती ही त्यांच्यासाठी के वळ औपचारिकता होती. प्रत्यक्ष निवृत्तीनंतरही ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. उद्योगपतींशी जवळीक साधून, त्यांच्या गरजा शोधून अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यात काळानुसार लवचीकपणा ठेवणे, हे त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे अंग. अठरा वेळा जीवनगौरव पुरस्कार मिळवणारे डॉ. शेजवलकर यांना शेवटपर्यंत विद्यार्थ्यांचे जे प्रेम मिळाले, ते त्यांच्या स्नेहशील स्वभावामुळे. विद्वत्ता आणि पद यांची झूल अंगावर चढू न देता ते काम करत राहिले. त्याचा त्यांना, विद्यार्थ्यांना आणि उद्योगांनाही निश्चितच उपयोग झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी संपादन करणाऱ्या स्नातकांची संख्या ब्याऐंशी एवढी प्रचंड आहे.  वाणिज्य हा विषय मराठीतून शिकवण्याचे श्रेय त्यांचेच. मराठीतून पाठय़पुस्तके  तयार करण्याबरोबरच त्यांनी सुमारे पंधरा पुस्तके  लिहिली. लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यवस्थापनतज्ज्ञ ही बिरुदे मिरवतानाच त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली. अध्ययन,अध्यापन,मार्गदर्शन, चिंतन, मनन ही त्यांच्या जीवनाची सूत्रे. त्यांच्या निधनाने एक निष्णात अध्यापक, मार्गदर्शक हरपला आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s