महासत्तेतले मस्तवाल –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/us-capitol-hill-violence-donald-trump-and-his-supporter/articleshow/80181078.cms

ऐन मध्यरात्री एखाद्या सरदाराच्या भाडोत्री बाजिंद्यांनी महालात घुसून सुलतानाला ठार करावे आणि पहाटे नव्या सुलतानाच्या नावाची द्वाही फिरवावी, अशा मध्ययुगातल्या कथांप्रमाणे एकविसाव्या शतकातही मावळत्या महासत्तेत घडते आहे.

ऐन मध्यरात्री एखाद्या सरदाराच्या भाडोत्री बाजिंद्यांनी महालात घुसून सुलतानाला ठार करावे आणि पहाटे नव्या सुलतानाच्या नावाची द्वाही फिरवावी, अशा मध्ययुगातल्या कथांप्रमाणे एकविसाव्या शतकातही मावळत्या महासत्तेत घडते आहे. साऱ्या जगाला शिस्त लावण्याचा, जगाचा नकाशा हवा तसा बदलण्याचा ठेका ज्यांच्याकडे आहे; त्यांच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहांच्या परिसरात नुसती बेदिली माजली नाही, तर एका पोलिस अधिकाऱ्यासहित पाच जण मारले गेले आहेत. वॉशिंग्टनमधील ‘कॅपिटॉल‘ या संसदभवनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जो नंगानाच घातला आणि लोकशाहीचे जे धिंडवडे काढले, त्याला सर्वस्वी त्यांचा ‘डॉन’च जबाबदार आहे. अमेरिकेत औपचारिक सत्तांतर होण्यास अजून दहा-अकरा दिवस असले, तरी अमेरिकी प्रतिनिधीगृहांनी आपले विशेष अधिकार वापरून, ट्रम्प यांचे अध्यक्षपद खेचून घेतले पाहिजे. खरे तर, त्यांचे पाठिराखे ज्या प्रकारे हल्ल्याची भाषा करीत होते, ती पाहता ट्रम्प यांच्यावर राजद्रोहाचाच खटला भरला गेला पाहिजे. त्यांची ताबडतोब सार्वजनिक जीवनातून कायमची गच्छन्ती व्हायला हवी. आपल्याच अध्यक्षांचे समर्थक आपल्यावर चालून येतील, अशी कल्पना अमेरिकी संसदेतील सुरक्षा रक्षकांनी स्वप्नातही केली नसेल; त्यामुळे आरंभी त्यांचा प्रतिसादही आंदोलकांना सौम्यपणे हाताळण्याचा होता. हे सशस्त्र हल्लेखोर ‘काँग्रेस’च्या बैठकीत घुसले असते, तर अनवस्था प्रसंग ओढवला असता. अनेकांच्या हातात पिस्तुले होती. ते ती नाचवत होते. सिनेटच्या शंभर सदस्यांपैकी दोन जागांवर जॉर्जियातून डेमॉक्रॅटिक उमेदवार नुकतेच जिंकल्याने, तेथील बलाबल हे रिपब्लिकन ५० आणि डेमॉक्रॅटिक ५० असे समतुल्य झाले. कमला हॅरिस यांच्याकडे सभागृहाच्या सभापती या नात्याने निर्णायक मत आहे. याचा अर्थ, प्रतिनिधी गृह आणि सिनेट या ‘काँग्रेस’च्या दोन्ही सभागृहांमध्ये नव्या अध्यक्षीय नावावर शिक्कामोर्तब होणे, ही औपचारिकता बनली होती. ट्रम्प यांचे डोके जॉर्जियातील निकालांमुळे फिरलेले दिसते. अध्यक्षीय निकाल जाहीर झाल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने जो बायडेन यांना विजयी घोषित केल्यानंतर, एका निसरड्या निवेदनाचा अपवाद वगळता डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदाही आपला पराभव खिलाडूपणे मान्य केला नाही. आता इतका तमाशा झाल्यानंतर मात्र ट्रम्प सत्तांतर शांततेत होईल, असे शहाजोगपणे सांगत आहेत.

लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणाऱ्या नेत्यांची लोकशाहीची प्रक्रिया आणि लोकशाहीतील सर्वोच्च संस्था यांच्याबद्दलची आस्था किती ठिसूळ व विसविशीत असू शकते, याचे उद्विग्न करणारे चित्र ट्रम्प यांच्या वर्तनाने जगासमोर आले आहे. केवळ लोकशाही असणाऱ्याच नव्हे, तर लोकशाही असावी असे वाटणाऱ्या देशांमधील समाजांचेही डोळे अमेरिकेकडे लागलेले असतात. गेली चार शतके तेथील लोकशाही विकसित होत आली आणि जोडीने अभूतपूर्व आर्थिक विकास होत राहिला. या साऱ्या पुण्याईवर ट्रम्प यांच्या निवडीनेच शिंतोडे उडायला सुरुवात झाली होती. चार वर्षे बेबंद, बेछूट आणि मस्तवाल वर्तन करून, ट्रम्प यांनी स्वत:च्या कारकिर्दीची अखेरही तितकीच घृणास्पद करून घेतली आहे. अध्यक्षीय निकाल लागल्यानंतर ट्रम्प समर्थकांनी विविध राज्यांच्या मुख्य न्यायालयांमध्ये आधी दाद मागितली. त्या सर्व याचिका फेटाळून लावल्या गेल्या. शेवटी, सर्वोच्च न्यायालयातही ट्रम्प यांची याचिका टिकली नाही. इतके होऊनही, ‘कॅपिटॉल’मधील हिंसाचार होण्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भाषण केले, ते अमेरिकेतील एकाही संस्थेवर म्हणजे, संसद, न्यायालये, निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास व्यक्त करणारे नव्हते. सुदैवाने, ट्रम्प हे वेडाचार करीत असले, तरी रिपब्लिकन पक्षातील इतर प्रमुख नेत्यांनी अक्कल गहाण टाकली नाही आणि ‘काँग्रेस’च्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यात आले; मात्र उद्या बायडेन यांनी शपथ घेतल्यावर लगेच ट्रम्प यांचा प्रभाव संपणार नाही. ट्रम्प यांनी गेली चार वर्षे सातत्याने अमेरिकी समाजात विविध निमित्तांनी आणि वेगवेगळे काल्पनिक शत्रू उभे करून विषपेरणी केली आहे. वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प समर्थकांचा उन्माद त्यातूनच आला होता. या उन्मादाला कृष्णद्वेषापासून गैर अमेरिकींच्या तिरस्कारापर्यंत अनेक रंग आहेत. ते यापुढच्या काळात दिसत राहिले, अमेरिकेत जागोजाग छोटे-मोठे विद्वेषी उद्रेक होत राहिले, तर आश्चर्य वाटायला नको. तितके सुरुंग तर ट्रम्प यांनी नक्कीच पेरले आहेत. या देशाचा आणि समाजाचा भाग्यविधाता मी सोडून दुसरा कुणीही असूच शकत नाही, ही मनोरुग्णता असते. याच मनोरुग्णतेने हिटलरसहित साऱ्या हुकूमशहांना ग्रासले होते. देखावा लोकशाहीचा असला, तरी ट्रम्प हेही याच मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. थोड्या दिवसांनी त्यांचा कार्यकाळ संपेल; मात्र ट्रम्प यांनी केवळ अमेरिकेवर नव्हे, तर साऱ्या जगातील लोकशाहीवर खोल घाव घातले आहेत. असे आपल्याकडे कधीही होऊ नये, याची चिंता आता जगातील सगळ्यांत मोठ्या लोकशाही देशाने करायला हवी. ट्रम्पासुराचा खरा धडा तो आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s