निम्मे आकाश काळे –महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/maharashtra-times-editorial-on-crime-against-women-rise-in-india/articleshow/80106608.cms

काही दिवसांनी ‘करोना’ नामक विषाणू आटोक्यात येईल. सगळे तंदुरुस्त होतील. जनजीवन सुरळीत होईल; पण या करोना काळात आणि विशेषत: टाळेबंदीच्या काळात भारतीय समाजातील पुरुषी मनोवृत्तीच्या ‘करोना’ने देशभरात महिलांना जो त्रास दिला आहे, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले आहेतm

काही दिवसांनी ‘करोना’ नामक विषाणू आटोक्यात येईल. सगळे तंदुरुस्त होतील. जनजीवन सुरळीत होईल; पण या करोना काळात आणि विशेषत: टाळेबंदीच्या काळात भारतीय समाजातील पुरुषी मनोवृत्तीच्या ‘करोना’ने देशभरात महिलांना जो त्रास दिला आहे, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत आणि हजारो बायकांना नको जीव करून सोडला आहे, तो नाहीसा होणार का, हा प्रश्नच आहे. आपण सारे एकविसाव्या शतकाच्या बाता कितीही मारत असलो, तरी भारतीय समाजाचे समूहमन दोन बाबतीत अजूनही मध्ययुगातून बाहेर यायला तयार नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, भारतीयांच्या मनाला बसलेला जातीपातीच्या विचारांचा फास आणि दुसरी म्हणजे, केवळ घरातल्याच नव्हे, तर समाजातील कोणत्याही महिलेला दुय्यम, गुलामासारखी किंवा कधी कधी तर एखाद्या जनावराप्रमाणे वागणूक द्यायची मानसिक ठेवण. विशेष म्हणजे, बायकांशी असे वागण्यात भारतीयांची अभूतपूर्व एकजूट आहे. तेथे श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण, कथित उच्चवर्णीय-मागासवर्गीय, सुशिक्षित-निरक्षर असा कोणताही भेदाभेद नाही. आसेतुहिमाचल सर्व प्रकारचे पुरुष साधारणपणे महिलांशी वागताना सारखेच दुष्ट, संशयी, कावेबाज, अनुदार आणि कधी कधी तर गुन्हेगारी मनोवृत्तीचे असतात. ‘राष्ट्रीय महिला आयोगा’ने नुकतीच जी आकडेवारी प्रकाशित केली आहे, ती पाहिल्यास पुरुषांना वर दिलेली दूषणे निष्कारण आणि बिनबुडाची नाहीत, हे लक्षात येईल. करोना काळात या आयोगाकडे आलेल्या तक्रारींमध्ये प्रचंड भर पडली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे तीस हजार महिलांनी या आयोगाकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली. भारतीय महिलांची सोशिक वृत्ती आणि छळ सोसून कुटुंबे मोडू न देण्याची सवय पाहता, खरा आकडा किती मोठा असेल, याची कल्पना करता येते. या तक्रारींची वर्गवारी करण्यात आली आहे. ती आणखीही वाढवता येईल; पण साऱ्यांचा सारांश एकच, की काही ना काही कारणांनी किंवा निमित्तांनी घरातल्या बाईला छळायचे. मारायचे. उपाशी ठेवायचे. तिला घालूनपाडून बोलून सतत अपमानित करायचे आणि जमले तर मारूनच टाकायचे किंवा ती स्वत:हूनच जीव देईल, अशी परिस्थिती आणायची. आज या संपादकीयाच्या शेजारीच प्रकाशित केलेल्या लेखात, भारतात महिला बचत गटांनी काही भागांमध्ये कसे क्रांतिकारी काम केले आहे आणि महिलांनी आर्थिक ताकद स्वबळावर मिळवली आहे, याची मन उल्हसित करणारी उदाहरणे दिली आहेत. महिला ग्रामीण असोत की शहरी, त्या संधी मिळाल्यास शून्यातून विश्व उभे करू शकतात. शिवाय, असे करताना त्यांच्यातील करुणा आणि न्यायबुद्धी सामान्यत: पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात जागी असते; मात्र महिलांना अशी संधी किंवा मोकळीक न देता, त्यांचा छळ करण्यात भारतीय पुरुषांना असा काय मोठा पुरुषार्थ वाटतो, याचे गणित आजवर कुणालाही सोडवता आलेले नाही. करोना काळात नोकरी किंवा धंदा गेल्याचा राग महिलांवर निघाला आणि त्यांचा छळ मांडण्यात आला, असे या अहवालात म्हटले आहे. म्हणजे, ज्या पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या तेही घरात आणि घरातून काम करणारे पुरुषही अहोरात्र घरातच. या काम करणाऱ्या पुरुषांनीही घरातल्या महिलांना अनेक प्रकारे त्रास दिला आहे. आजही ते देत असतील. हे आपल्या समाजाचे खरेखुरे आणि अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे.

टाळेबंदीच्या काळात महिला घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांना घरात होणारा छळ सोसण्यावाचून दुसरा काही पर्यायच राहिला नाही. अशा हजारो महिलांपैकी काहींनी अखेर महिला आयोगाकडे धाव घेतली; पण टाळेबंदी थोडी शिथील होताच बाहेर पडणाऱ्या मुलींचे काय होते, हे काल-परवा मुंबईतल्या घटनेवरून दिसते. मित्राच्या वाढदिवसासाठी रात्री बाहेर पडलेली ही हसतीखेळती पौगंडावस्थेतील मुलगी आपल्या पावलांनी घरी परतू शकली नाही. घरी आला तो तिचा मृतदेह. याचा अर्थ एकच, बाईचा जीव घरी-दारी, शेजारी-पाजारी, मित्र-नातलगांकडे आणि स्वत:च्याही घरी कुठेही सुरक्षित नाही. आपल्या घरातील मुलींना व महिलांना समानतेने वागवणारी घरे नाहीत, असे नाही. आज भारतात सर्व क्षेत्रांत मुली विलक्षण भरारी घेत आहेतच. आई-वडिलांची काठी होत आहेत; पण भारतीय समाजाचा सरासरी स्वभाव हा बाईला समानतेने व आदराने वागविण्याचा आजही बनू शकलेला नाही, हे दु:खद वास्तव या पाहणीतून पुढे आले आहे. महाराष्ट्राला तर ‘पुरोगामी’ म्हणणे आपण आता सोडूनच दिले पाहिजे. या पाहणीत महाराष्ट्र, हरियाणा व उत्तर प्रदेश यांच्या रांगेत जाऊन बसला आहे. ही महिलांवर सर्वाधिक अत्याचार होणारी राज्ये आहेत. ही स्थिती बदलायची, तर महिलांना देवपण न देता त्यांना आधी माणूसपण द्यायला हवे. समाजाचे नेमके कुठे आणि किती चुकते आहे, याचे कठोर आत्मपरीक्षण करणारी चर्चा सर्व व्यासपीठांवरून गंभीरपणे सुरू करायला हवी. निम्मे आकाश असे काळवंडलेले असताना, प्रकाश कसा पडणार आहे?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s