पाण्याचाही बाजार – महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/editorial-on-wall-street-begins-trading-water-futures-as-a-commodity/articleshow/79672056.cms

जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असे वारंवार म्हटले जाते. आदिमानवापासून सारे हिंसक संघर्ष हे आपल्याकडे नसलेल्या आणि दुसऱ्याकडे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी होत आले आहेत.

जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असे वारंवार म्हटले जाते. आदिमानवापासून सारे हिंसक संघर्ष हे आपल्याकडे नसलेल्या आणि दुसऱ्याकडे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी होत आले आहेत. या बाबींमध्ये संपत्तीपासून जमिनीपर्यंत आणि पशुधनापासून खनिज संपत्तीपर्यंत सारे आले; पण आता माणूस एकविसाव्या शतकात पोहोचला असल्याने, त्याने या युद्धाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. यातल्या एका स्वरूपाचा सामना सारे जग सध्या करतेच आहे. पाणी हे कमॉडिटी मार्केटवर, म्हणजे वस्तुबाजारात एक वस्तू म्हणून नोंदले जाणे आणि या वस्तूचे भविष्यकालीन सौदे होणे, हे माणसाच्या प्रगतीचे लक्षण नसून, जगात दुर्मीळ होत जाणाऱ्या संसाधनांवर आधीच हक्क सांगून इतरांना त्यापासून केवळ पैशाच्या जोरावर वंचित ठेवण्याची लढाई आहे. मागणी आणि पुरवठा याच नियमाने कमॉडिटी मार्केट चालते. अमेरिकेतील सर्वाधिक धनाढ्य; पण पाण्याबाबत तितकेच कमनशिबी असणाऱ्या कॅलिफोर्निया या राज्यात चार दिवसांपूर्वी पाण्याचे पहिले भविष्यकालीन सौदे झाले असून, त्यावेळी दोन ग्राहक मिळाले आहेत. या ग्राहकांनी १५ फुटबॉल मैदाने एक फूट उंचीच्या पाण्याने भरतील, इतक्या पाण्याची भविष्यातील किंमत निश्चित करून ठेवली आहे. ‘वॉल स्ट्रीट’वर पाण्याचे असे सौदे सुरू होणार, हे सप्टेंबरमध्येच ठरले होते. तसे ते सुरू झाले आहेत. याचा सोपा अर्थ असा, की भविष्यात जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि पाण्याचे भाव गगनाला भिडतील, तेव्हा आज एका ठरावीक किमतीवर सौदे केलेल्यांना पाणी आजच्याच भावात मिळेल. इतरांच्या तुलनेत ते बरेच स्वस्त असेल. अर्थशास्त्राचे नियम लावले, तर यात चूक काही नाही. टंचाई झाली, की पाण्याचे भाव वाढणार आणि त्याच अपेक्षेने आज पाण्यात गुंतवणूक करणारे शहाणे ठरणार.

त्यांच्या हातातला अमाप पैसा त्यांना इतरांपेक्षा शहाणे ठरविणार. कॅलिफोर्निया गेली अनेक वर्षे दुष्काळाचा सामना करीत आहे आणि जगही पाण्याच्या टंचाईच्या दिशेने निश्चितच प्रवास करीत आहे. ‘नासा’ने अनेक निकष लावून, वर्षानुवर्षांचा अपार डेटा संकलित करून आणि अनेक उपग्रहांना कामाला लावून पृथ्वीवरचे गोड पाणी झपाट्याने संपत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. दुर्दैवाने, नासाने केलेला हा अभ्यास जगातील धोरणकर्त्यांच्या उपयोगाचा ठरणार नसून, तो शेवटी बाजार नियंत्यांनाच मार्गदर्शक ठरणार असे दिसते आहे. एव्हाना, या अभ्यासाचे पृथक्करण करून जगातील कोणकोणत्या महानगरांमध्ये पाण्याचे भविष्यकालीन सौदे करता येतील, याचे ठोकताळे तयारही झाले असतील. पाण्याच्या या व्यापारात अनेक मुद्दे आहेत आणि त्यातला सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा, माणूस म्हणून जन्माला आलेल्या पृथ्वीवरच्या प्रत्येक जिवाला असणाऱ्या मूलभूत मानवी हक्कांचा आहे. प्रत्येक माणसालाच नव्हे, तर सजीवाला पाणी, अन्न, प्रकाश यांचा मूलभूत आणि निरपवाद हक्क आहे. पाण्याची केवळ एक वस्तू म्हणून कमॉडिटी मार्केटवर नोंदणी होणे आणि त्याचे वायदे सुरू होणे, हे मूलभूत मानवी अधिकारांचे सरळ सरळ खच्चीकरण आहे. ते कोणत्याही स्थितीत होऊ देता कामा नये. भारताने यासाठी स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तशी ती घेतली नाही, तर उद्या राजस्थानात किंवा पाण्याची सदोदित टंचाई असणाऱ्या चेन्नईत असे सौदे सुरू झाल्याशिवाय राहणार नाहीत. काही वर्षांपूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री अजित जोगी यांनी शिवनाथ या नदीची विक्री करून, याच प्रकारचा एक देशी चमत्कार करून दाखविलाच होता. या नदीच्या पाण्याचा कुणी व किती वापर करायचा याचा सारा अधिकार या कंपनीकडे या कराराने जाणार होता. तेव्हा देशभर ओरड झाल्यावर अजित जोगी दोन पावले मागे गेले होते.

आताही अर्थशास्त्र शिकविणारे पुढे येतील आणि ‘पाणी’ ही जर वस्तू असेल, आपण जर ती नळातून, बाटलीतून किंवा टँकरमधून विकत घेत असू, तर तिचे कमॉडिटी मार्केटमध्ये सौदे झाले तर काय बिघडले, असे म्हणतीलच. याही पुढे जाऊन पाण्याची खरी किंमत समाजाला कळण्यासाठी हे आवश्यकच कसे आहे, हेही सांगतील; पण यात खरा प्रश्न पाण्याच्या किमतीचा नसून, पाणी या नैसर्गिक संसाधनाचे तत्त्वत: विनिमय होणाऱ्या वस्तूत होणाऱ्या रूपांतराचा आहे. जगाच्या उरावर आज थयथया नाचणाऱ्या बेबंद भांडवलशाही विचारांमधून जन्म घेणाऱ्या ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या एकमेव सूत्राचा आविष्कार म्हणजे, ‘आज पैसे मोजून आपले उद्याचे आपल्यापुरते पाणी सुरक्षित करणे’. भारतात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते मानली जातात. ती पूजलीही जातात. भारतीय आज या पाचही महाभूतांचे मोल विसरून गेले असले आणि त्यांना बेछूटपणे नासवत असले, तरी याचा अर्थ त्यांना निव्वळ बाजारात नेऊन बसविण्याचे कोणत्याही स्थितीत समर्थन करता येणारे नाही. जगातली पाण्याची टंचाई पाहता, खरे तर साऱ्या जगातील शहाण्यांनी एकत्र येऊन अवर्षण, पाणीटंचाई आणि पाण्याचे समन्यायी वाटप यांच्यासाठी संघर्ष करायला हवा. आज जगाचा प्रवास उलटाच होत असून, ‘पैसा वापरून तुमच्यासाठी आजच पाणी ओरबाडून ठेवा’, असे सांगितले जाते आहे. जगात जेव्हा खरोखर पाण्याची टंचाई होईल, तेव्हा आशिया व आफ्रिका खंडातील पाणी पळवून ते पैसे टाकणाऱ्यांच्या ओंजळीत नेऊन टाकायचे आणि कोट्यवधी माणसे पाण्याविना तडफडली, तरी त्यांच्या या मूलभूत हक्काकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हेच चित्र दिसणार आहे. निदान भारतात तरी असे होता कामा नये. पाण्याचा रंग जीवनाचा आहे; कमॉडिटीचा नाही!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s