खोटारडेपणाला चपराक – महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/twitter-tags-amit-malviyas-tweet-as-manipulated/articleshow/79557022.cms

भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे (आयटी सेल) प्रमुख अमित मालवीय यांच्या संदेशातील चित्रफितीवर फेरफार केल्याचे शिक्कामोर्तब करून, ट्विटरने त्यांचा खोटारडेपणा तर उघड केलाच आहे;

भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे (आयटी सेल) प्रमुख अमित मालवीय यांच्या संदेशातील चित्रफितीवर फेरफार केल्याचे शिक्कामोर्तब करून, ट्विटरने त्यांचा खोटारडेपणा तर उघड केलाच आहे; परंतु त्याचबरोबर दिशाभूल करणाऱ्या अशा संदेशांची दखल घेत पुढचे पाऊलही टाकले आहे. संपूर्ण खोटे किंवा अर्धसत्य सांगणाऱ्या संदेशांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्याचे प्रमाण वाढत असताना आणि त्याद्वारे समाजातील विविध घटकांत द्वेषमूलक भावना निर्माण होत असताना, अशा संदेशांची शहानिशा खुद्द संबंधित माध्यमांकडून होणे गरजेचे आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अॅप यांसह अन्य सोशल मीडियाकडून याबाबत सातत्याने अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याची पूर्तता पूर्णांशाने होताना दिसत नसली, तरी त्या दिशेने प्रयत्न होत असल्याचे मालवीय प्रकरणातून समोर आले आहे. मतपेढीच्या आणि आपल्या पक्षाच्या प्रचाराबरोबरच अन्य पक्षांच्या नेत्यांच्या बदनामीचे षड्‌यंत्र रचणारे आयटी सेल अनेक पक्षांमध्ये आता निर्माण झाले आहेत. त्यांमध्ये भाजपचा आयटी सेल प्रमुख आहे. या सेलद्वारे होत असलेल्या कारवायांची, ट्रोलिंगची उदाहरणे वेळोवेळी समोर आली आहेत. केंद्राने अलीकडेच मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रामुख्याने पंजाब, हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले असून, ते दिल्लीच्या वेशीवर आले आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून झालेल्या कारवाईबाबत राहुल गांधी यांनी छायाचित्रासह केलेले ट्विट खोटे ठरविण्यासाठी, मालवीय यांनी खोट्या व्हिडिओचा आधार घेतला. गांधी यांनी वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने टिपलेले छायाचित्र ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देण्यासाठी मालवीय यांनी वापरलेला व्हिडिओ फेरफार केला असल्याचे पडताळणीतून दिसले आहे; त्यामुळे ट्विटरने त्यावर ‘मॅन्युप्युलेटेड मीडिया’ असा ठपका ठेवून मालवीय यांची चलाखी उघड केली. एवढ्यावरच न थांबता ट्विटरसह अन्य सोशल मीडियांनी मोठ्या प्रमाणावर दिशाभूल करणाऱ्या आणि द्वेषभावना निर्माण करणाऱ्या संदेशांबाबत; तसेच खोट्या बातम्यांबाबत सदैव सतर्क राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर या माध्यमांवर वावरणाऱ्यांनीही खऱ्या-खोट्याची शहानिशा करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s