आभाळ फाटले – महाराष्ट्र टाइम्स

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/flood-like-situation-in-maharashtra-telangana-karnataka-andhra-pradesh/articleshow/78682494.cms

ऑक्टोबरमध्ये होणारा पाऊस धडकी भरविणारा असतो, याची प्रचिती यंदाही येत आहे. कमी कालावधीत मुसळधार कोसळत झोडपून काढणारा परतीचा पाऊस आपत्तीकारक ठरत असल्याचा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे.

ऑक्टोबरमध्ये होणारा पाऊस धडकी भरविणारा असतो, याची प्रचिती यंदाही येत आहे. कमी कालावधीत मुसळधार कोसळत झोडपून काढणारा परतीचा पाऊस आपत्तीकारक ठरत असल्याचा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली यांसह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत; तसेच मराठवाडा आणि तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत बुधवारी अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला असून, तेथील बहुतेक ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. तुडुंब भरलेल्या धरणांतून विसर्ग सुरू झाला असून, अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. रस्ते वाहून जाण्याचा, पूल पाण्याखाली जाण्याचा, अन्य भागांशी संपर्क तुटण्याचा प्रकार घडला आहे. आंध्र, तेलंगणमध्ये २९ जण मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्रातही पंढरपूरमध्ये घाटाची भिंत कोसळून सहा जण ठार झाले आहेत. पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये चार जण वाहून गेले आहेत. या सर्व भागांत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी डाळिंब आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आंध्र, तेलंगण, महाराष्ट्र या दिशेने सरकल्याने ही अतिवृष्टी झाली. हवामान विभागाने याचा अंदाज दोन दिवस आधीच दिला होता. चक्रीवादळाच्या अंदाजानंतर त्याची दखल घेऊन, पूर्वतयारी करण्याची यंत्रणा देशात आता विकसित झाली आहे; त्यामुळे चक्रीवादळाच्या संकटाची तीव्रता कमी झाली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर अशा प्रकारे पूर्वतयारी करणारी यंत्रणा मात्र विकसित झालेली नाही. परिणामी, आधी कल्पना येऊनही संकटाची तीव्रता कायम राहिल्याने मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टीचे प्रमाण वाढूनही आणि रस्ते वाहून जाण्यापासून भिंत कोसळून जीवितहानी होण्याच्या दुर्घटना होत असूनही, त्यांपासून कोणताही धडा घेतला गेलेला नाही. नद्या-नाल्यांतील अतिक्रमणे हटविली नसल्याने धोका कायम आहे.

पुण्यात बुधवारी रात्री साडेनऊपासून दोन तास भीतिदायक पाऊस झाला. गेल्या वर्षी २५ सप्टेंबरच्या रात्रीही असाच आभाळ फाटल्यासारखा पाऊस होता. एरवी पुणेकरांच्या खिजगणतीतही नसलेल्या आंबिल ओढ्याने त्यावेळी अक्राळ-विक्राळ रूप धारण केल्याने मोठे नुकसान झाले होते. बुधवारची रात्रही अशीच काळरात्र ठरते की काय, अशी भीती वाटत होती. अवघ्या दोन तासांत सरासरी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याने कात्रज, सहकारनगर, सिंहगड रोड, शिवाजीनगर, हडपसर अशा पुण्याच्या सर्वच भागांत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. पाणी साठण्याची ठिकाणे माहीत असूनही, तिथून निचरा करणारी यंत्रणा स्थानिक प्रशासन निर्माण करू शकलेले नाही. सिंहगड रस्त्यावर गेल्या वर्षी जो पूल वाहून गेला होता; तो नव्याने बांधून काही महिनेही झालेले नसताना तोही बुधवारी वाहून गेला. तो कच्चा पूल होता, असा युक्तिवाद आता केला जात असला, तरी या महत्त्वाच्या विषयाबाबत महापालिका किती गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होते. भिंती कोसळण्याच्या; तसेच अनेक सोसायट्यांत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. पावसाने रुद्रावतार धारण केल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि पूरस्थिती असलेल्या ठिकाणाहून स्थलांतराचे प्रयत्न झाले. हवामान खात्याने पूर्वकल्पना देऊनही ही बाब उशिरा का करण्यात आली, असा प्रश्न आहे. पुण्याच्या ग्रामीण भागांतही बिकट स्थिती होती. इंदापूर, दौंड, बारामती या भागांत अतिवृष्टी झाली. दौंडमध्ये ओढ्यांना आलेल्या पुरात चार जण वाहून गेले. बारामती-फलटण रस्ता वाहून गेला. तेथील १८ गावे पूरग्रस्त असून, तिथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. या सर्व भागांत बुधवारी काही तासांत सरासरी १३० मिलिमीटर पाऊस झाला.

सोलापूर आणि लातूर-उस्मानाबाद हे एरवी दुष्काळी म्हणून ओळखले जाणारे जिल्हे. त्यांना या पावसाचा सर्वांत मोठा फटका बसला. सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचे तलावात असलेल्या मंदिरात पाणी शिरले. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावरील कुंभारघाटावर नव्याने बांधण्यात आलेल्या घाटाची भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी पडले. तुळजापुरात दरड कोसळली, उस्मानाबादमध्ये १७ शेतकरी अडकले. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांनाही पावसाने झोडपले. यामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. भुईमुग, सोयाबीन यांच्यावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहेत. ही पिके आणखी काही दिवस पाण्यात राहिल्यास ती वाया जाण्याची भीती आहे. कणसात पाणी साठल्याने ज्वारी काळी पडण्याचीही भीती आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान नेमके किती आहे, याचा नेमका अंदाज पंचनामे केल्यानंतरच येईल. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवरील संकट या वादळी पावसामुळे आणखी गडद झाले. अशा आपत्तीनंतर सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले जाते. कधीतरी पथक तपासाला जाते. नुकसानीचा आकडा काढला जातो आणि टप्प्याटप्प्याने थोडीफार मदत दिली जाते; मात्र प्रचंड मेहनत करून हाताशी येत असलेले पीक काही तासांच्या पावसाने वाहून जाण्याने शेतकऱ्यांना होणारी व्यथा अशा मदतीने मोजता येत नाही. तापमानातील बदलामुळे टोकाचे हवामान अनुभवण्यास मिळेल, अतिवृष्टीच्या-दुष्काळाच्या घटना वाढतील अशा इशारा शास्त्रज्ञ गेल्या दोन दशकांपासून देत आहेत. त्याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज असून, आतापर्यंतच्या संकटापासून धडे घेत, सर्व नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठीची यंत्रणा विकसित करायला हवी, तरच संकटाची तीव्रता कमी होऊ शकेल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s