अंदाजपंचे दाहोदरसे ? | लोकसत्ता

Clipped from: https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-corona-crisis-to-be-contained-by-february-2021-claims-committee-of-scientists-abn-97-2305978/

आधी त्रैराशिके मांडायची आणि स्वतःच उत्तर द्यायची ही कोणती नीती?

फेब्रुवारीपर्यंत करोना काढता पाय घेईल असे जाहीर करायचे आणि त्याच दमात ‘पण’ पुस्ती जोडून ‘तेच ते’ खबरदारीचे उपाय सांगायचे, हे तज्ज्ञांना उणेपण आणणारेच..

या साथीत सरकारने जे जे केले ते जर केले नसते तर आणखी किती बळी गेले असते अशी त्रराशिके स्वत:च मांडून स्वत:च त्याची उत्तरे देणे, हे मेल्या म्हशीला खंडीभर दूध या उक्तीप्रमाणे आहे. स्थलांतरित मजुरांचा करोना प्रसारात काहीही हात नाही, तर करोना देशभर पसरला कसा?

अलीकडे आपल्या हवामान खात्याचे भाकीत आणि वास्तव यांच्यातील संबंधांत खूप सुधारणा आहे. म्हणजे या खात्याकडून जो काही अंदाज व्यक्त होतो त्याबरहुकूम प्रत्यक्षात तसे घडते. पण परिस्थिती अशी जेव्हा नव्हती तेव्हा हवामान खात्याचे काम भाकितापेक्षा बरेचसे घटनोत्तर भाष्याचे असे. अचानक पाऊस कोसळला की मग हे खाते त्यामागे कमी दाबाचा पट्टा कसा होता त्याचे स्पष्टीकरण देत असे. गेल्या मार्च महिन्यापासून हवामान खात्याची ही घटनोत्तर भाष्याची जबाबदारी काही प्रमाणात आपल्या आरोग्यविषयक खात्यांनी घेतलेली दिसते. गेल्या दोन आठवडय़ांत करोना प्रसाराचा वेग मंदावल्याचे पाहून करोना साथ आता मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या पाहणीने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे जनतेस जे माहीत असते त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम विविध सरकारी समित्या हिरिरीने करतात. विज्ञान तंत्रज्ञान खात्याच्या विशेष समितीनेही हे काम विशेष चोखपणे केले असे म्हणता येईल. करोना-प्रसाराचे शिखर आपल्याकडे मागे पडले, आता या साथीत उतार असेल आणि आगामी वर्षांच्या फेब्रुवारीपर्यंत करोना-साथ पूर्णपणे मागे पडेल, असेही भाकीत या समितीने वर्तवले आहे. तसे झाले तर आणि होणार असेल तर त्याचे स्वागतच. पण या लक्ष्यपूर्तीच्या मार्गातील अडथळे या समितीनेच नमूद केले असल्याने तिचा अहवाल आणि हे भाकीत यावर भाष्य करणे आवश्यक ठरते.

यापुढे नागरिकांनी किमान आरोग्य-अंतर पाळले, मुखपट्टय़ांचा यथायोग्य वापर केला, गर्दीत जाणे टाळले, हात धुण्याची सवय अंगीकारली तर करोना प्रसाराचा वेग वाढणार नाही, असे भाष्य ही विशेष नियुक्त तज्ज्ञांची समिती करते. त्यावर ‘यात नवीन ते काय’, असा प्रश्न पडल्यास ते किमान चौकस बुद्धी शाबूत असल्याचे निदर्शक असेल. या समितीत विविध विद्याशाखांचे तज्ज्ञ होते आणि तिची नियुक्ती केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने केली होती. आपल्याकडे या साथीचा प्रसार रोखण्याची जबाबदारी प्राधान्याने केंद्रीय गृहखात्याने हाताळली. अजूनही आणीबाणीच्या साथ नियंत्रण कायद्याचा अंमल कायम असल्याने गृहखात्याकडे या विषयाचे नियंत्रण आहेच. तथापि या तज्ज्ञांच्या समितीत गृहखात्याचा समावेश होता किंवा काय, हे कळावयास मार्ग नाही. या तज्ज्ञांच्या समितीने नवे गणिती प्रारूप तयार केले आणि त्याच्या आधारे या साथीचा प्रसार, त्या प्रसाराचा वेग आणि तो रोखण्याची उपाययोजना याचा प्राधान्याने विचार केला. त्याच्या आधारे या समितीची मते विविध माध्यमांत विविध सदस्यांना उद्धृत करून सोमवारी प्रसृत झाली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही रविवारी सायंकाळी या पाहणी निष्कर्षांवर भाष्य केले. त्याअर्थी आरोग्य खात्याचे याबाबत काही दुमत नसावे असे मानण्यास हरकत नाही.

या सर्व तज्ज्ञांच्या मते सप्टेंबरात आपल्याकडे या साथीच्या प्रसाराची परिसीमा गाठली गेली. हे तेव्हाही जाणवत होतेच. कारण दरदिवशी करोना-बाधितांची संख्या त्या काळात चांगलीच चढी होती आणि एकूण रुग्णसंख्याही दहा लाखांपेक्षा अधिक झाली होती. त्यानंतर या साथीचा वेग मंदावला. त्या पार्श्वभूमीवर आपण या रोगाचे शिखर पार केल्याचा ‘अंदाज’ हा तज्ज्ञांचा पाहणी अहवाल सांगतो. पण त्यावर विश्वास ठेवून समाधानाचा सुस्कारा सोडण्याची सोय नाही. कारण, ‘‘याचा अर्थ ही साथ पुन्हा बळावणारच नाही असे नाही,’’ असे लगेच हेच तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी आगामी हिवाळ्याकडेही हे तज्ज्ञ अंगुलीनिर्देश करतात. फेब्रुवारीपर्यंत करोना काढता पाय घेईल असे सांगायचे आणि त्याच दमात ‘पण’ पुस्ती जोडत थंडीच्या हुडहुडीत करोना सोकावणारच नाही असे नव्हे, असेही सांगायचे हे तज्ज्ञपणास उणे आणणारे. म्हणून मग ही साथ बळावू नये म्हणून मग आरोग्य अंतर, मुखपट्टी आदी पथ्यपालनाचा सल्ला. पण हे पथ्यपालन जेव्हा करोना ऐन भरात होता तेव्हाही आवश्यक होतेच. मग साथीचा वेग मंदावला ही द्वाही फिरवण्याचा वेगळा असा अर्थ काय? एरवीही ‘लवकर निजे, लवकर उठे’ छाप आरोग्यसवयी, स्वच्छता, व्यसनशून्यता, योग्य ताजा आहार/ विहार आदींनी आरोग्य राखले जातेच. ते सांगण्यास तज्ज्ञ कशास हवेत? दुसरा मुद्दा या तज्ज्ञांच्या गणिती प्रारूपाचा.

करोना-विषाणूने जगातील जवळपास सर्व गणिती प्रारूपे आणि ते रचणारे तज्ज्ञ यांना घाऊक पातळीवर बाराच्या भावात काढले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत जगातील हे सर्व गणिती प्रारूपकार मौन बाळगून आहेत. कोणीही नवे काही प्रारूप आणि या साथीच्या प्रसार-प्रचाराचे भाकीत अलीकडच्या काळात केलेले नाही. अनेक चुकीची भाकिते केल्याने जगाचे हात पोळले गेल्यानंतर आता आपल्याकडे हा गणिती प्रारूपांचा खेळ सुरू झाला आहे. या प्रारूपांची पंचाईत अशी की हे आकडे वाकवावे तसे वाकतात आणि तज्ज्ञ सरकारसमोर किती वाकावयास तयार आहे त्यावर त्याची लवचीकता ठरते. त्यामुळे या साथीत सरकारने जे जे केले ते जर केले नसते तर आणखी किती बळी गेले असते अशी त्रराशिके स्वत:च मांडून स्वत:च त्याची उत्तरे देणे हे मेल्या म्हशीला खंडीभर दूध या उक्तीप्रमाणे आहे. किंबहुना त्या दुधासाठी रांगा लावण्यासारखे आहे. त्याची आता गरज नाही आणि त्यासाठी या तज्ज्ञांची अजिबात आवश्यकता नाही. मग या तज्ज्ञांनी काय करायला हवे होते?

तज्ज्ञांचे तज्ज्ञपण ठरते ते आपले कोठे चुकले ते सांगण्यात आणि चुकांची पुनरावृत्ती कशी होणार नाही यासाठी रास्त उपाययोजना सुचवण्यात. त्याबाबत हे आपले तज्ज्ञ अगदीच मौन पाळताना दिसतात. सरकार किती उत्तम काम करीत आहे हेच सांगावयाचे तर त्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय पुरे. गुणगौरवासाठी विशिष्ट विषय तज्ज्ञ असण्याची गरज नसते. बुद्धिमत्ता लागते ती विश्लेषण करताना. पण तेच करावयाचे नसेल आणि आपली आपण स्तुतीच करून घ्यावयाची असेल तर त्यासाठी आपल्याकडे स्वयंसेवकांची कमतरता नाही. आताही हे तज्ज्ञ सांगून सांगून सांगतात काय? तर स्थलांतरित मजुरांचा करोना प्रसारात काहीही हात नाही, हे. असे जर असेल तर रेल्वे बंद, मोटारप्रवास बंद, विमानसेवा बंद असे असताना हा विषाणू भारतभर काय तज्ज्ञांच्या मनातून प्रवास करता झाला काय? ‘‘या हृदयीचे त्या हृदयी वोतलें’’ या आध्यात्मिक स्थितीतून विषाणूने प्रवास केला काय? याचे कोणतेही स्पष्टीकरण हे तज्ज्ञ देत नाहीत.

त्यामुळे हेच या समितीचे प्रयोजन असावे असे मानण्यास जागा आहे. सरकारने जे काही केले ते योग्य आणि उत्तमच, असा तटस्थ-भासी निर्वाळा देता यावा यासाठी ही समिती असावी. हे सरकारसाठी आवश्यक प्रशस्तीपत्र सोडल्यास या तज्ज्ञांकडून काहीही हातास लागत नाही. या पार्श्वभूमीवर प्रा. गगनदीप कांग यांचे उद्गार प्रामाणिक ठरतात. ‘‘या विषाणूच्या प्रवासाविषयी भाष्य करावे असे बरेच काही आहे. पण त्यासाठी आवश्यक विदा (डेटा) अद्याप उपलब्ध नाही,’’ असे या विख्यात साथरोगतज्ज्ञ प्रांजळपणे सांगतात. ते लक्षात घेतल्यास बाकीचे हे तज्ज्ञ भाकीत म्हणजे अंदाजपंचे दाहोदरसे ठरते. ते फारसे मनावर घेण्याचे कारण नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s