bangadesh gdp: विकासाचा ‘बांगला’ मार्ग – the comparison between india and bangladesh per capita gdp | Maharashtra Times

Clipped from: https://maharashtratimes.com/editorial/the-comparison-between-india-and-bangladesh-per-capita-gdp/articleshow/78704463.cms

बहुतेक भारतीयांना अमेरिकेबद्दल कमालीचे आकर्षण आहे. अमेरिकेची संपन्नता, तेथील प्रगती, ज्ञान-विज्ञानाच्या आविष्काराला तिथे असलेली संधी, मुक्त समाज यांमुळे आकर्षण निर्माण होणे अस्वाभाविक नाही

बहुतेक भारतीयांना अमेरिकेबद्दल कमालीचे आकर्षण आहे. अमेरिकेची संपन्नता, तेथील प्रगती, ज्ञान-विज्ञानाच्या आविष्काराला तिथे असलेली संधी, मुक्त समाज यांमुळे आकर्षण निर्माण होणे अस्वाभाविक नाही. शिवाय, अमेरिका महासत्ताही आहे. भारताचे रूपांतरही अमेरिकेसारख्या प्रगत महासत्तेत व्हावे, अशी आकांक्षाही असते. गेल्या दोन दशकांत येथील राज्यकर्त्यांनी त्याची जाणीवपूर्वक जोपासनाही ती फुलविली आहे. अमेरिकेसारखे होण्याचे उद्दिष्ट असले, तरी देशातील बहुतेक जण भारताची तुलना करतात, ती पाकिस्तानबरोबर. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ हे अन्य शेजारी देश भारतीयांच्या खिजगणतीतही नसतात. बांगलादेश म्हटल्यावर तर कित्येकांना देशात बेकायदा घुसलेल्या बांगलादेशींची आठवण होते. अनेकांसाठी तो एक गरीब शेजारी देश आहे. दरडोई उत्पन्नात बांगलादेश भारताच्या पुढे जाणार असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) भाकीत अशा सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरले असणार. बांगलादेश आपल्यापुढे जात असल्याचा धक्काही काहींना बसल्याचे दिसते. विविध कारणांनी आपल्या अर्थव्यवस्थेची चाके आधीच मंदावली होती; त्यात कोव्हिड-१९चे संकट आणि लॉकडाउन यांमुळे विकासदर उणे २३ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट समोर ठेवलेल्या भारतासमोर विकासदर उंचावण्याचे आव्हान मोठे आहे. या आर्थिक वर्षात हा दर दहा टक्क्यांनी कमी होईल, असा ‘आयएमएफ’चा अंदाज आहे. भारताची ही परिस्थिती असताना बांगलादेशची अर्थव्यवस्था मात्र चार टक्के दराने वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तेथील दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अधिक होणार असल्याचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. यातूनच भारत-बांगलादेश अशी तुलना होत असून, या मुद्द्यावरून राजकारणही होत आहे. असे होण्यात गैर काहीही नाही; उलट यामुळे भारतीय बांगलादेशाकडे गांभीर्याने पाहू शकतील.

बांगलादेशाची प्रगती काही अचानक समोर आलेली नाही. गेल्या काही वर्षांत अनेक निकषांवर तो सातत्याने चांगली कामगिरी करतो आहे. याचमुळे त्याने पाकिस्तानला मागे टाकले आहे. दरडोई उत्पन्नात त्याने यापूर्वीही म्हणजे १९९१ ते १९९३ या काळात भारताला मागे टाकले होते. जन्मदर, आयुर्मान, बालमृत्युदर, लोकसंख्यावाढीचा दर, महिलांचा रोजगार आदी निकषांत बांगलादेश गेल्या अनेक वर्षांपासून भारतापेक्षा चांगली कामगिरी करीत आहे. तेथील आयुर्मान ७२ वर्षे आहे, तर आपल्याकडे ६९ आहे. १९६०मध्येही याबाबत तो भारताच्या पुढे होता. त्यावेळी आपल्याकडील आयुर्मान ४१ वर्षे होते, तर तत्कालीन पूर्व पाकिस्तानात ते ४५ वर्षे होते. जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान, स्त्रियांतील जननदर, बालमृत्युदर आदी निकष सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचे असतात; आणि त्यांमध्ये बांगलादेशची कामगिरी भारताहून चांगली होत आली आहे. गेल्या काही वर्षांत बांगलादेश वस्त्रोद्योगात जोमाने कामगिरी करतो आहे. साक्षरता, उद्योग, रोजगारनिर्मिती, त्यांमधील महिलांचा सहभाग, सार्वजनिक स्वच्छता, शेतीवरील अवलंबित्व कमी करणे आदींबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असून, त्यात त्याला चांगले यश आले आहे. गारमेंट उद्योगामुळे तर त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली असून, त्याच्या निर्यातीत तो अग्रेसर आहे. बांगलादेशाच्या ‘जीडीपी’मध्ये उत्पादन उद्योगाचा क्रमांक पहिला असून, सेवाउद्योग दुसऱ्या स्थानी आहे. या दोहोंमुळे तिथे रोजगारनिर्मिती वाढत आहे. त्यामुळे तिथे शेतीवरील अवलंबित्व तुलनेने कमी आहे. याचा सकारात्मक परिणाम बांगलादेशाच्या विकासदरावर होतो आहे. भारतात उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांत सध्या अडचणीची स्थिती आहे. परिणामी शेतीवरील अवलंबित्व कमी होत नाही आणि विकासदर आकुंचित होतो आहे.

दरडोई उत्पन्नात बांगलादेश पुढे गेला, तरी नंतर भारत पुढे जाईल, असेही ‘आयएमएफ’ने म्हटले आहे. लोकसंख्या, विकासदर आणि करोनाचा फटका यांमुळे भारताच्या याबाबतच्या कामगिरीवर परिणाम होतो आहे. एकूण जीडीपीच्या बाबतीत भारत स्वाभाविकपणे बांगलादेशाच्या पुढे आहे. बांगलादेशाचा जीडीपी भारताच्या जीडीपीच्या तुलनेत केवळ अकरा टक्के आहे. त्यामुळे याबाबत दोन्ही देशांची तुलना होऊ शकत नाही. बांगलादेशाच्या समोरही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. गरिबी ही सर्वांत मोठी समस्या असून, गरिबी रेषेच्या आंतरराष्ट्रीय निकषाच्या खाली असणाऱ्या तेथील लोकसंख्येचे प्रमाण २१.४ टक्के आहे; भारतात हे प्रमाण दहा टक्के आहे. शिक्षणातही तो भारताच्या मागे असून, मानवी विकास निर्देशांकातही तो खाली आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश वाटचाल करीत असला, तरी तेथील राजकारणात कमालीचे वैमनस्य असून, राजकीय कार्यकर्त्यांमधील हिंसाचार चिंताजनक आहे. भ्रष्टाचाराची कीड तिथेही असून, त्यामुळे तो पोखरला गेला आहे. पारदर्शकतेत बांगलादेशाचा क्रमांक १४६वा आहे आणि भारत ऐंशीव्या स्थानी आहे. धार्मिक कट्टरतावाद तेथेही वाढत असून, त्याचाही दुष्परिणाम जाणवत आहे. बांगलादेशाशी होणारी तुलना सध्या ऐरणीवर असली, तरी सामाजिक प्रगतीच्या निकषांवर श्रीलंका आणि भूतान हे देशही भारताच्या पुढे आहेत. दरडोई उत्पन्नातही हे देश भारताच्या पुढे आहेत. पाकिस्तानही एकेकाळी भारताच्या पुढे होतो; परंतु आता तो भारताच्या खूप मागे आहे. यातच काहींना समाधान वाटू शकेल. वास्तविक या निमित्ताने सामाजिक आणि भौतिक प्रगतीचे निकष ऐरणीवर यायला हवेत. अस्मितेच्या मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणाऐवजी आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार यांसारखे विकासाच्या मूलभूत मुद्द्यांसाठी आग्रह धरला गेला तर तो सर्वांच्याच हिताचा ठरेल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s