२० लाख कोटींच्या मदतीपलीकडे उपाययोजना हव्यात! श्री गडकरी यांची मुलाखत –लोकसत्ता

टाळेबंदी लवकरात लवकर उठवणे आणि २० लाख कोटींच्या मदतीपलीकडे आणखी उपाययोजना आखणे हाच अर्थव्यवस्थेला गती देण्याचा पर्याय असू शकतो. या आजारावर दीर्घकाळ टाळेबंदी हा काही पर्याय नाही, असे परखड मत केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या ऑनलाइन उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी झाला. यात गडकरी बोलत होते. या ‘वेबिनार’मध्ये गडकरींनी त्यांच्या बालपणाच्या आठवणींपासून यशस्वी राजकीय कारकीर्दीपर्यंत आणि माणसे जोडण्याच्या कलेपासून  देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रयत्नांपर्यंत अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. या उपक्रमाचे सहप्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड’ आहे.

गडकरी म्हणाले, करोना अगदी अनपेक्षितपणे आपल्या सर्वाच्याच आयुष्यात उभा ठाकला अन् त्याने देशाच्याच नव्हे अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेचे गणित बिघडवून टाकले. आज समोर जे चित्र आहे ते फारच भयावह आहे. पण म्हणून जगणे सोडता येणार नाही. हे मान्य की आज अर्थव्यवस्थेचे चाक खूप खोलवर रुतलेले आहे. त्याला बाहेर काढायचे तर केवळ सरकारी प्रयत्नांवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी सर्वानी सहकार्य करायला हवे, असे आवाहन गडकरी यांनी केले. करोनामुळे विस्कटलेली देशाची आर्थिक घडी नव्याने बसवण्यासाठी काय करावे लागेल हे सांगताना गडकरी म्हणाले, बाजारात रोख तरलता वाढवणे गरजेचे आहे. २० लाख कोटींचे अर्थसाहाय केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु देशाची लोकसंख्या बघता ते पुरेसे नाही. त्यात नवीन आर्थिक प्रयत्नांची भर पडली पाहिजे. या क्रमात लघू व मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. यासाठी मी माझ्या भूपृष्ठ वाहतूक खात्यातर्फे येत्या दोन वर्षांत १५ लाख कोटींची कामे सुरू करणार आहे. यासाठी मला सरकारच्या एक नव्या रुपयाची गरज नाही. यासाठी आवश्यक निधी मी विदेशी बँका आणि सार्वजनिक गुंतवणुकीतून उभा करणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचीही मदत घेणार आहे. रेल्वे, हवाई व सागरी वाहतूक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. या प्रयत्नातून आपण नक्कीच सकल उत्पादनाचा दर ५ ते ६ टक्क्यांपर्यंत गाठू शकू, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ व लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी गडकरींना  बोलते केले.  प्रास्ताविक सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी केले.

.. अन् क्लिंटन यांचा धीरूभाईंना फोन आला!

धीरूभाई अंबानींच्या कार्यक्र मात एकदा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आले होते. धीरूभाईंनी मला बोलावले आणि त्यांच्याशी परिचय करून दिला. त्यादरम्यान धीरूभाईंनी क्लिंटन यांना एक विनंती केली. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा जीव धोक्यात आहे. शरीफ आणि मी एकाच गावचे. या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की शरीफांना कसेही करून पाकिस्तानातून बाहेर काढा. त्यानंतर रात्री क्लिंटन यांचा धीरूभाईंना फोन आला. मी तुमचे काम केलेय. त्यांना पाकिस्तानातून मी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.

अमिताभ बच्चन यांना म्हटले, नाटक मत कर!

ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचे कित्येक चित्रपट मी चित्रपटगृहाच्या ‘थर्ड क्लास’मध्ये बसून पाहिलेले. त्यामुळे ही व्यक्ती मला कधी कॉल करेल, याचा स्वप्नातही मी विचार के ला नव्हता. एकदा त्यांचा फोन आला आणि म्हणाले, ‘मै अमिताभ बच्चन बोल रहा हू’. मी त्यांना म्हटले, ‘नाटक मत कर, चल फोन रख’ दुसऱ्यांदा पुन्हा फोन वाजला आणि तेव्हा माझा विश्वास बसला. मी त्यांची माफी मागितली. त्यांनी फोन करून मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसाठी त्यांनी मला धन्यवाद दिले. मी या महामार्गावरून जात आहे आणि इतका चांगला महामार्ग पाहून मी भारावलो आणि तुम्हाला फोन केला, असे अमिताभ यांनी सांगितले.

आयुष्य म्हणजे मिळणाऱ्या संधीचा खेळ

पंतप्रधान पदाच्या मुद्दय़ावरून गडकरींना अनेक प्रश्न विचारले गेले. त्यावर त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तरे देत या कार्यक्रमात रंग भरला. बरेचदा पदावर गेल्यावर माणसे मोठी होतात. तर काही ठिकाणी माणसे त्या पदावर गेल्यावर पदाला महत्त्व मिळते. त्यामुळे आपण आपले काम करत राहिले पाहिजे. सामान्यातला सामान्य माणूस होऊन जगण्यात आणि फुटपाथवरची पाणीपुरी खाण्यात मला अधिक समाधान आहे. जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या वर जाऊन विचार करता आला पाहिजे. महाराष्ट्रात मी माझे मराठीपण जपले आहे. गुजराती म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही, तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी के लेल्या कामामुळे ते या पदावर पोहोचले. मी पोस्टर चिटकवणारा, रिक्षात बसून घोषणा करणारा पक्षाचा साधा कार्यकर्ता. माझ्या घरात राजकीय पाश्र्वभूमी नसताना मी येथवर येऊन पोहोचलो. नशीब आणि कर्तृत्वाचा सारा खेळ. तेव्हा जे काम मिळते ते करत राहावे. आयुष्य हा मिळणाऱ्या संधीचा एक खेळ आहे, असे म्हणत गडकरी महालच्या वाडय़ात रमतात. पुण्यातला जसा शनिवारवाडा, तसाच नागपुरात महालचा गडकरी वाडा. याच परिसरात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे महालशी, महालमधील गर्दीशी आणि तिथल्या प्रत्येक गोष्टीशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत.  महालमधला तो वाडा आता पडला आणि नवी इमारत त्या ठिकाणी उभी होत आहे. त्यामुळे ती पूर्ण झाल्यावर मी पुन्हा आपल्या घरटय़ात परत जाणार आहे. शेवटी घर म्हणजे काय असते? महागडय़ा सुखवस्तूंनी घर तयार होत नाही. त्या घरातली माणसे महत्त्वाची असतात. हजारो कोटींच्या संपत्तीत सुख मिळत नाही. कुटुंबीयांचे एकमेकांशी असणाऱ्या भावनिक नात्यांनी घर तयार होते. गडकरींच्या दिलखुलासपणाचे अनेक किस्से आहेत, तो दिलखुलासपणा या मुलाखतीतही रंगला. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगतो. लोक काय म्हणतील हे मी पाहात नाही. कारण मी महत्त्वाकांक्षी नाही, असे ते म्हणाले.

.. तर मासेमारी व्यवसाय पाच लाख कोटींपर्यंत

देशातील लघू व मध्यम उद्योगांना गती देण्यासोबतच मासेमारीच्या व्यवसायाला बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी कोचीच्या पोर्ट ट्रस्टने एक नवीन नाव विकसित केली असून ती देशभरातील कोळी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात जाता येणे शक्य आहे. हे घडले तर हा व्यवसाय पाच लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो.

यशवंतराव, शरद पवार मोठेच आहेत

यशवंतराव चव्हाण व शरद पवार हीसुद्धा राजकारणातील मोठी नावे आहेत. मात्र, योग्यता असूनही चव्हाण पंतप्रधान होऊ शकले नाहीत. शरद पवारांच्या बाबतीतसुद्धा तेच घडले. हे दोघेही त्या पदावर पोहोचले नाहीत, याचा अर्थ ते लहान आहेत असा होत नाही.

आईच्या संस्कारांनी परोपकार शिकवले

आईचे संस्कार हीच आमची पुंजी. एकदा मित्र सोबत असताना मी घरात एकटय़ाने लाडू खाल्ला. तेव्हा ती रागावली आणि तेव्हापासून वाटून खाण्याची सवय लागली. आजही मी सर्वासोबत जेवतो. कुणाला मदत केली तर ती विसरायला शिक, ही शिकवण देखील तिचीच.

वास्तू पूजनाला कविता भेट देतो..

कला आणि कवितेवर माझे नितांत प्रेम आहे. आयुष्याचा सार कवितेत मांडणाऱ्या काही कवींशी जुळलेले ऋणानुबंध मी आयुष्यभर जपले. यात एक कवी विमल लिमये होते. त्यांची…

घर असावे घरासारखे,

घर असावे घरासारखे

नकोत नुसत्या भिंती,

नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम-जिव्हाळा,

इथे असावा प्रेम-जिव्हाळा

नकोत नुसती नाती,

नकोत नुसती नाती..

ही कविता मला फार आवडते. मला कुणाकडे वास्तू पूजनाला जायचे असेल तर ही कविता मी छान फ्रेम करून त्या यजमानांना भेट देतो. घरातल्या वैभवशाली वस्तूंनी घर आनंदी होत नाही. त्या घरातील लोकांचे परस्परांशी नाते आनंदी असले पाहिजे, हे सांगण्यासाठी मी या कवितेचा आधार घेतो. आणखी एका कवीच्या कवितेने मला आंतर्बाह्य़ हादरवून सोडले. ते म्हणजे, कवी अनिल कांबळे.

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी

पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही

नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी..

ही त्यांची कविता वारांगनांच्या  स्थितीची मांडणी करणारी होती.  नागपूरचे कवी सुरेश भट हे संघाचे कट्टर विरोधक होते. परंतु त्यांच्या कवितांवर मी भरभरून प्रेम केले. लताजी, आशाताई, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर यांच्या रचना मी कायम ऐकत असतो.

राष्ट्रपती भवन नको रे बाबा

सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे माझे चांगले परिचित आहेत. आम्ही दोघांनी मिळून संघटनेत काम केले आहे. ते राष्ट्रपती झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. त्या भवनातील शिस्त, थाटमाट बघितला आणि हबकून गेलो. तिथून बाहेर पडताना काहीही झाले तरी ‘राष्ट्रपती भवन नको रे बाबा’ असाच विचार डोक्यात आला.

श्रेष्ठत्व आणि गुणवत्तेचा संबंध भाषेशी नाही

मराठी माणूस सर्वोच्च पदावर का पोहोचला नाही, असा प्रश्न कायम विचारला जातो. मात्र, श्रेष्ठत्व आणि गुणवत्तेचा संबंध भाषेशी नसतो, असे माझे ठाम मत आहे. राजकारणात पद मिळवण्यासाठी मेहनतीसोबतच नशीबही जोरावर असावे लागते. त्याशिवाय सर्वमान्यता मिळणेसुद्धा गरजेचे असते. माझे म्हणाल तर आजवर मला जे मिळाले, त्यात मी पूर्ण समाधानी आहे. मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे गडकरी म्हणाले.

via Measures are needed beyond Rs 20 lakh crore Opinion of Nitin Gadkari abn 97 | २० लाख कोटींच्या मदतीपलीकडे उपाययोजना हव्यात! | Loksatta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s