स्थलांतरित आणि राष्ट्रवाद –महाराष्ट्र टाइम्स

करोना संक्रमण आणि बाधितांची संख्या अत्यल्प असतानाच श्रमिकांना त्यांच्या गावी नेण्याची जबाबदारी सरकारने का घेतली नाही? मग आजची स्थिती आली नसती; पण …

स्थलांतरित आणि राष्ट्रवाद
करोना संक्रमण आणि बाधितांची संख्या अत्यल्प असतानाच श्रमिकांना त्यांच्या गावी नेण्याची जबाबदारी सरकारने का घेतली नाही? मग आजची स्थिती आली नसती; पण उन्मादी राष्ट्रवादात हे कोण विचारणार? राष्ट्रवाद ही वाईट गोष्ट नाही. देशातील लोकांमध्ये बंधुभाव जोपासणारा राष्ट्रवाद असू शकतो; पण उन्मादी राष्ट्रवाद तसा नसतो. तो वास्तवाकडे डोळेझाक करायला लावतो.

मिलिंद मुरुगकर

स्थलांतरित श्रमिकांच्या हृदयद्रावक कहाण्या सारा देश पाहतो आहे. शेकडो किलोमीटर उन्हात चालणाऱ्या भारतातील श्रमिकांचे फोटो जगभरातील वृत्तपत्रांत छापून येत आहेत. पंतप्रधानांच्या मंगळवारच्या भाषणात या श्रमिक भारतीय नागरिकांबद्दल सहानुभूतीचा एक शब्दही का नसावा? नरेंद्र मोदी हे आज देशातील सर्वाधिक चाणाक्ष नेते आहेत. अशी सहानुभूती व्यक्त केली असती, तर त्यांची लोकप्रियता अधिकच वाढली असती, हे त्यांना कळत नाही असे थोडेच आहे? तरीही त्यांनी तसे बोलायचे नाकारले. त्याची कारणे काय असतील, याचा विचार करायला हवा.

एक कारण असे असू शकते, की या प्रश्नाला स्पर्श करणे म्हणजे एकप्रकारे लॉकडाउन पुरेसे परिणामकारक न ठरल्याची कबुली असेल. हे त्यांना करायचे नाही. नोटाबंदीचा अतर्क्य निर्णय फसला हे सिद्ध झाल्यावर आणि त्याची जबर किंमत असंघटित क्षेत्राला मोजावी लागली, तेव्हाही मोदींनी त्यांच्या वेदनांबद्दल एक चकार शब्द कधी काढला नाही. गेल्या आठवड्यात गावाकडे जाणारे काही श्रमिक रेल्वेखाली चिरडले गेले, तेव्हा मोदींना प्रतिक्रिया देणे भागच पडले; पण ते त्या घटनेपुरते सीमित होते.

मोदींच्या या ‘तटस्थपणाचे’ दुसरे एक महत्त्वाचे कारण त्यांच्या मंगळवारच्या भाषणात दिसते. खरे तर नोटाबंदीपासूनच अर्थव्यवस्था घसरणीला लागली आणि आता करोनानंतर ती कमालीच्या संकटात आहे. पंतप्रधान मात्र ‘भारत कसा विश्वगुरू आहे आणि हे शतक कसे भारताचे असणार आहे,’ हेच रंगवून सांगत होते खूप वेळ; कारण भारतातील उच्च आणि ‘अतिउच्च’ मध्यम वर्गाला असे ऐकायला आवडते. या वर्गाचा उन्मादी राष्ट्रवाद आज प्रभावशाली आहे. तो अनुभवायलाही येतो आहे. हा वर्ग अत्यल्प असला, तरी मोदींना या वर्गाची ताकद माहीत आहे. त्यांना ‘अपबीट मूडमध्ये’ ठेवणे ही मोदींची राजकीय गरज आहे आणि या वर्गाची ती तृष्णा आहे. त्यांना वास्तव चर्चेमध्ये आणायचेच नाही. या मानसिकतेचा थोडा तपशिलात व सखोल विचार करू.

स्थलांतरित श्रमिकांच्या रेल्वे दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर काहींनी विचारले, की घटना दुर्दैवी आहे; पण लोकांनी रेल्वेच्या रुळावर झोपणे हा बेजबाबदारपणा नाही का? या लोकांच्या मते ‘असंवेदनशील असल्याचा शिक्का मारला जाण्याचा धोका पत्करून’ ते असा प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या मते ते परखड बोलत आहेत. स्पष्ट मत मांडत आहेत. असेही गृहित धरू, की असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असणार; पण त्यांनी तो मनातच ठेवला. तेव्हा आपण हा प्रश्न खुलेपणाने चर्चेला घेतला पाहिजे; कारण हा प्रश्न या मानसिकतेबद्दल बरेच काही सांगतो.

हे प्रश्नकर्ते एक गोष्ट विसरत आहेत, की स्थलांतरित श्रमिक रेल्वेखाली चिरडून मरण्याच्या घटनेमुळे देश जो हळहळला, तो त्यांचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्यामुळे होता. अन्यथा अशा दुर्घटना घडत असतातच. त्या सर्व देशाचे लक्ष वेधत नाहीत; पण जेव्हा डोक्यावर ओझे घेऊन, खिशात किरकोळ पैसे आणि पोटातली भूक मारत शेकडो मैल उन्हात देशाचे श्रमिक नागरिक चालायला लागतात आणि अशी दुर्घटना होते, तेव्हा ती हृदय हेलावून टाकते. हा संदर्भ हे लोक लक्षात घेत नाहीत. हा संदर्भ दुर्लक्षिला जातो, याचे कारण या श्रमिकांना असे चालावे लागणे, हा या लोकांना अन्यायच वाटत नाही. लॉकडाउन जाहीर झालाय ना? आणि तो सर्वांच्या हिताचा आहे ना, मग सर्वांनी तो पाळला पाहिजे आणि तो जे पाळत नाहीत ते बेजबाबदार आहेत. रुळावर झोपणे तर आणखीच बेजबाबदारपणा. अशी ती भूमिका असते. सोशल मीडियावरच्या प्रश्नात तीच व्यक्त झाली.

भारत हा एक विकसनशील देश आहे आणि अशा ठिकाणी स्थलांतरित श्रमिक हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो. हे स्थलांतर बऱ्याचदा विशिष्ट काळात होत असते. तेही मोठ्या प्रमाणात होत असते.

देशाच्या कोणत्या भागातून किती लोक, किती काळासाठी कुठे जात असतात, याची सर्व आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे. यावर एक प्रकरण २०१६-१७च्या इकनॉमिक सर्व्हेमध्ये आहे. शहरी किंवा अर्धनागरी श्रमिक अत्यंत छोट्या जागेत कसे जगतात, हेही सरकारला माहीत आहे. मग, लॉकडाउनचा निर्णय जाहीर करताना हे लक्षात घेतले होते का? मुळात लॉकडाउनमुळे करोनाच्या संक्रमणाची साखळी तुटते, हा समज सरकारने का पसरवला? सर्व जगात कोणीही असे म्हणत नाही. लॉकडाउनचा उद्देश संक्रमणाचा वेग कमी करणे हा होता. तो वेग कमी का करायचा, तर वेग कमी झाल्यामुळे एकाचवेळी खूप रुग्ण इस्पितळात भरती होऊ नयेत आणि आपली आरोग्यसेवा कोलमडून पडू नये, हा त्यामागील उद्देश होता. (असे इटलीत झाले. त्यांची आरोग्यव्यवस्था कोलमडून गेली.) जगभरचे वैद्यकतज्ज्ञ एकमुखाने हे सांगत आहेत; पण आपल्याला संक्रमण साखळी तोडणे, हा उद्देश सांगितला गेला आणि स्वाभाविकच टाळेबंदीचा विचार मनात आला रे आला, की सर्वांनी जिथे आहोत तिथे थांबणे हाच पर्याय उरतो. मग स्थलांतरित श्रमिक अनिश्चिततेच्या वातावरणात, त्यांच्या त्यांच्या खुराड्यात किती काळ जगू शकतात, हे प्रश्न विचारात घ्यायची गरजच कुठे निर्माण होते?

स्थलांतरित श्रमिक पहिल्यांदा दिल्लीकडून गावाकडे निघाले, तेव्हा या वर्गाने या लोकांवर या ‘बेजबाबदार वर्तनाबद्दल’ किती टीका केली, हे समाज माध्यमांमध्ये दिसलेच. थाळी वाजवणे, दिवे लावणे यात एक गृहित होते, की देशातील आपण सर्व लोक एकाच पातळीवर आहोत आणि एकाच संकटाचा सामना करत आहोत; पण वास्तव तसे नव्हते. आपल्या घरात बसून राहण्याची ‘चैन’ ही सर्वांना परवडणारी नव्हती, हे विसरले गेले. शेकडो मैल उन्हात चालायला निघालेल्या श्रमिकांनी थाळी वाजवणे, दीपप्रज्वलन करणे, यातील भारलेपणाला मोठा छेद दिला आणि जळजळीत वास्तव आपल्यासमोर धरले. हे वास्तव उन्मादी राष्ट्रवादाला पाहायचे नाही; त्यामुळे संक्रमणाचा वेग मंद असताना लॉकडाउनची घोषणा आणि संक्रमणाचा वेग वाढला असताना लॉकडाउनमध्ये शिथिलता, ही घनघोर विसंगती दिसते.

करोना संक्रमणाचा वेग आणि बाधितांची संख्या अत्यल्प असताना, श्रमिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने का नाही घेतली, असा प्रश्न सरकारला विचारावा, असे त्यांना वाटत नाही. त्याऐवजी आता चीनमधील कंपन्या भारताकडे निघाल्या, भारत आर्थिक महासत्ता होणार, (विश्वगुरू तर आहेच) अशा घोषणा ऐकणे या वर्गाला आवडते. राष्ट्रवाद ही वाईट गोष्ट नाही. देशातील लोकांमध्ये बंधुभाव जोपासणारा राष्ट्रवाद असू शकतो; पण उन्मादी राष्ट्रवाद तसा नसतो. तो वास्तवाकडे डोळेझाक करायला लावतो. तसे नाही केले, तर त्यांचा ‘अपबीट’ मूड ओसरतो. आज अशा राष्ट्रवादाची पकड आहे. अर्थव्यवस्था कमालीची घसरणीला लागली असताना, हा राष्ट्रवाद अजून किती काळ प्रभावशाली राहील, हे पाहायचे.

(लेखक कृषिअर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

via Article News : स्थलांतरित आणि राष्ट्रवाद – immigrants and nationalism | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s