महासत्तेची नाकाबंदी – -महाराष्ट्र टाइम्स

महासत्तेची नाकाबंदी
करोना विषाणूचा अतिशय वेगात होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देश कंबर कसून उभे ठाकले असताना दहशत निर्माण केलेल्या या साथीने अमेरिकेसारख्या महासत्तेला आणीबाणी घोषित करण्यास भाग पाडले आहे. शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या या साथीची सुमारे एक लाख ३० हजारहून अधिक लोकांना बाधा झाली आहे. स्पेनमध्ये करोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी पुढील दोन आठवड्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कारण, इटलीनंतर या विषाणूची सर्वाधिक लागण स्पेनमध्ये आहे. सध्या येथे चार हजारहून अधिक रुग्ण आढळले असून आठवडाभरात तेथील रुग्णांच्या संख्येत सातपट वाढ झाली आहे आणि १२० जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील भीषण परिस्थिती सर्वांना धक्का देऊन गेली आहे. युरोपनंतर आखाती देशांनीही खंबीर पावले उचण्याचा इरादा व्यक्त केला आहे. ‘करोना’ने हाहाकार उडवलेल्या इराणच्या जवळ असलेल्या सौदी अरेबियाने देशात येणाऱ्या विमान सेवांना स्थगिती दिली आहे. इराणमध्ये ११ हजारहून अधिक लोकांना संसर्ग होऊन ५००हून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे लोकांनी घराबाहेर पडू नये आणि कार्यालयीन कामदेखील घरूनच करावे, अशा सूचना संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये देण्यात आल्या आहेत. तर अबूधाबीमध्ये मार्च महिनाअखेरपर्यंत नाइट क्लब, रेस्तराँसारखी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. जगात सुमारे पाच हजारहून अधिक जणांचा ‘करोना’चा संसर्ग झाल्याने बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आणि कल्पनेपेक्षा अधिक वेगाने पसरणाऱ्या या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी सुमारे ५० अब्ज डॉलरच्या निधीची तरतूदही केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल खुलासा केला की ‘ही परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. येते आठ आठवडे कळीचे आहेत. या कालावधीत ‘सरकारच्या सर्व यंत्रणांना आपल्या संपूर्ण शक्तींनिशी कार्य करता यावे यासाठी आपण राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी संस्थांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करीत ट्रम्प यांनी अल्प दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आणीबाणी घोषित केल्याने अशा स्वरूपाच्या राष्ट्रव्यापी आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी अमेरिकेतील ‘फेडरल इमर्जन्सी एजन्सी’ला विविध राज्यांशी समन्वय साधता येतो आणि स्थानिक सरकारांना मदत करता येते.

अमेरिकेतील ५० पैकी ४६ राज्यांत ‘करोना’ ने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. तेथे अन्य युरोपीयन देशांच्या तुलनेत कमी म्हणजे सुमारे दोन हजार ‘करोना’बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र ही परिस्थिती चिघळू नये म्हणून वेळीच त्याबाबतचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय हा आततायीपणाचा अथवा अनावश्यक भीती निर्माण करणारा वाटू शकतो. परंतु अमेरिकन जनतेच्या स्वभावप्रवृत्तीकडे पाहता ही आवश्यक बाब ठरते. कारण, आपल्याला वाटते तसे अमेरिकन हे अजिबात जागतिक घडामोडींशी संबंधित नसतात. त्यांचे अमेरिकाव्यतिरिक्त जगाबद्दलचे भान अगाध असते. तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे दहापैकी अकरा अमेरिकन लोकांना सांगूनही कळत नाही, असे तेथे गमतीने म्हटले जाते. कारण त्यांना जगाची माहिती करून घेण्याची गरज नाही. बाकीचे जग अमेरिकेवर अवलंबून आहे, ते जगावर अवलंबून नाहीत. मात्र रोगाच्या साथी आणि ‘करोना’ ने ज्या वेगात जगभरात उच्छाद मांडला आहे ते पाहता तेथील निद्रिस्त जनतेला जागे करण्यासाठी आणीबाणी घोषित करणे ट्रम्प प्रशासनाला आवश्यक वाटले. तसेच आरोग्याच्या बाबतीत जागरूक आणि काहीशा अतिजागरूक आणि भयग्रस्त असणाऱ्या अमेरिकनांसाठी आजाराचे गांभीर्य दाखवून देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी मोठ्या निधीची तरतूद करणेही तितकेच आवयश्क होते. या घोषणेनंतर तेथे या रोगाच्या प्रसारास आळा बसण्यास मदत होऊ शकते. युरोप, अमेरिका आणि आखाताव्यतिरिक्त अन्य देशही कोणतेही अघटित घडू नये साठी तातडीने पावले उचलत आहेत. रशियाने नॉर्वे आणि पोलंडला जोडणाऱ्या सीमा बंद केल्या आहेत. खासगी, व्यावसायिक दौरे, अभ्यास दौरे आणि पर्यटन अशा कोणत्याही कारणांसाठी प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. व्हेनेझुएलात करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर कोलंबियाने व्हेनेझुएलाकडची सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. नेपाळनेही पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने घोषित केलेल्या आणीबाणीने तेथील जनतेबरोबर अन्य देशही या साथीच्या प्रसाराला रोखण्यासाठीच्या प्रयत्नाना वेग देतील, यात शंका नाही.

via Donald Trump : महासत्तेची नाकाबंदी – trump declares coronavirus outbreak a national emergency | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s