परंपरा नि आधुनिकतेचा दुवा –महाराष्ट्र टाइम्स

परंपरा नि आधुनिकतेचा दुवा
महिलांनी त्यांच्याकडे असलेली भावनिक ताकद लक्षात घेऊन आयुष्याच्या पन्नाशीनंतरच्या टप्प्याचा विचार करायला हवा. वयाच्या, नात्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जबाबदाऱ्या समथर्पणे पेलल्यानंतर आता सगळ्याच नातेसंबंधांकडे प्रगल्भतेने पाहायला हवे. कुटुंबातील स्थान, भूमिका बदलणार असते. कुटुंबातील सत्तास्थानाला बसणारे हादरे पेलण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी स्वत:ला तयार करण्याची गरज असते. कुटुंबातील आपल्या सत्तेला चिकटून राहणे निरर्थक आहे, हे उमगले तर जगणे अधिक सहज-सुंदर होऊ शकते.

ज्येष्ठांच्या मनमेंदू संवर्धन केंद्रामध्ये वेगवेगळे प्रयोग, उपक्रम करत असताना अनेक महत्त्वपूर्ण बाबी लक्षात आल्या. यातील प्रमुख बाब म्हणजे त्याची नवे शिकण्याची प्रेरणा. करिअर आणि रोजच्या जगण्यात मेंदूच्या ज्या वाटा आजवर उत्तेजितच झालेल्या नव्हत्या, त्याकडे लक्ष दिल्यास अधिक सकारात्मक फरक दिसत असल्याचे आढळले. या नव्या वाटा उत्तेजित केल्या तर त्याचा परिणाम मेंदूच्या स्वास्थ्यावर होतो. त्यातून वृद्धपणात मेंदूवर होणारे परिणामही टाळता येऊ शकतात, हे अभ्यासाअंती आढळले. पुरुषांपेक्षा पन्नाशीनंतरही स्त्रियांचा उत्साह हा अधिक असतो, हे बऱ्याचदा दिसून येते. याउलट पुरुषांची सामाजिक नात्यांची ओढ मर्यादित असतेच. वयोमानानुसार ती अधिक मर्यादित होत जाते. पण महिलांची नाती ही वयाच्या या टप्प्यावरही वेगवेगळ्या पातळ्यांवर टिकून राहतात. बहरतात. हीच पन्नाशीनंतरच्या काळातील स्त्रियांच्या आयुष्याची गुरूकिल्ली ठरते.

मूळातच स्त्रियांना प्रोसेस कम्युनिकेशन आवडते. पुरुषांना रिझल्ट कम्युनिकेशन. नात्याबाबतचे, दुसऱ्यांच्या आयुष्याबाबतचे औत्स्युक्य महिलांमध्ये अधिक दिसते. स्त्रिया या भावनिक बाजूने कमकुवत वाटत असल्या तरी नकारात्मक परिस्थितीत भावनांचा आवेग पेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये अधिक असते, हे संशोधनात दिसले आहे. एखाद्या जोडप्यातील पुरुषाचे निधन आधी झाल्यास महिला त्यांचे आयुष्य अधिक काळ, सकारात्मकतेने जगू शकतात. याउलट जोडीदाराच्या वियोगानंतर अशा पुरुषांचा आयुष्य काळ तुलनेने कमी असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे पुरुषांची जीवनइच्छा सहचराशी अधिक निगडित असते. तर महिलांची जीवनइच्छा ही तुलनेने अधिक स्वतंत्र असते. तिची जगण्याबाबत विजिगिषू वृत्ती जाणवते. भावनिक अभिव्यक्ती अधिक स्पष्ट असते. तिच्या डोळ्यात पाणी येते. ती रडतेही. पण म्हणून ती अधिक खंबीर होत जाते. याउलट पुरुष भावना उघडपणे व्यक्त करत नसल्याने त्यांची भावनिक ताकद तुलनेने कमी होते.

साठी उलटल्यानंतर स्त्रीमध्ये होणारे बदल

महिलांनी त्यांच्याकडे असलेली भावनिक ताकद लक्षात घेऊन आयुष्याच्या पन्नाशीनंतरच्या टप्प्याचा विचार करायला हवा. वयाच्या, नात्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जबाबदाऱ्या समथर्पणे पेलल्यानंतर आता सगळ्याच नातेसंबंधांकडे प्रगल्भतेने पाहायला हवे. कुटुंबातील स्थान, भूमिका बदलणार असते. कुटुंबातील सत्तास्थानाला बसणारे हादरे पेलण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी स्वत:ला तयार करण्याची गरज असते. कुटुंबातील आपल्या सत्तेला चिकटून राहणे निरर्थक आहे, हे उमगले तर जगणे अधिक सहज-सुंदर होऊ शकते. आपल्याभोवतालची नातीगोती ही गुंतण्यासाठी आहेत, गुंता करण्यासाठी नाही हे लक्षात घ्यायला हवे. नात्याकडे सत्ता म्हणून पाहिले की गुंता अटळ असतो. मुळातच स्त्रीचा स्वभाव गुंतण्याचा असतो. स्त्रीची सत्ताप्रेरणा ही जवळच्या नातेसंबंधांमध्ये असते. त्यामुळेच त्यातून होणारा गुंता नि कटुता टाळण्यासाठी अलगद बाहेर पडण्याची तयारी केली तर नात्यातील गोडवाही टिकतो नि स्वत:चा नव्याने शोधही घेता येतो. आपल्या जवळच्या नातेसंबंधांचे उदात्तीकरण करण्याचे योग्य वय म्हणजे पन्नाशीनंतरचा काळ. आजवरच्या काळात कुणाची तरी मुलगी, बहीण, सून, आई, करिअरमधील ती अशी नात्यावरून असलेली ओळख बदलता येऊ शकते. त्यापलीकडे स्वत:लाच व्यक्ती म्हणून गवसू शकते. पती, मुलगा, सून, मुलगी नातवंडे हे स्वत:च्या आयुष्याच्या शोधातील साथीदार आहेत, हे एकदा ध्यानात घेतले की सारे काही सोपे होऊ शकते. इंटरनेट शिकताना मुलगा सहचर आहे, युरोप ट्रिप प्लॅन करताना सून-मुलगा सहचर आहेत तर ज्येष्ठांच्या सभेला जाताना नवरा हा सहचर आहे, हे ओळखता यायला हवे. आयुष्याच्या या टप्प्यावर भोवताली असलेली ही नातीगोती सहचराच्या रूपात आहेत, असे सगळ्याच नात्याकडे पाहता आले तर गुंत्यातून अलगद बाहेर पडता येऊ शकेल. आयुष्य शोधण्याच्या प्रवासातील साथीदार म्हणून या नात्यांकडे बघता येऊ शकेल. स्वत:ला आनंद देण्याऱ्या गोष्टी करणे, राहणीमान जपणे, वय अधिक डौलाने सांभाळणे, ज्येष्ठपणातील नवेपण शोधणे हे स्वत:साठी साध्य होऊ शकेल. पण त्यासाठी नात्यातून स्वतंत्र व्हायला हवे. सत्ताप्रेरणा सोडून गुंता टाळायला हवा.

आयुष्यभर कुणा ना कुणासाठी हक्काने, हट्टाने करतच राहण्यापेक्षा आता निरपेक्षपणे मदत करण्याचा प्रयत्न केला तर तो आनंद वेगळा ठरू शकतो. मर्यादित स्वच्या पलिकडे जाण्याची संधी म्हणून या काळाकडे बघता येऊ शकते. कोणत्याही नात्यात, भावनेत किती गुंतायचे, अपेक्षा सोडून द्यायच्या, जे आहे ते देण्यासाठी आहे हे लक्षात घेऊन वावरायचे, हा विचार स्वत:मध्ये पेरायला हवा. स्त्री नाते चांगले देऊ शकते. आस्था तिची ताकद आहे. त्यामुळेच नात्याच्या गुंत्यातून बाहेर येत ती सर्व पिढ्यांना आस्था देत राहिली तर सत्ता नसतानाही कुटुंब तिच्याभोवती फिरत राहते आणि तिच्यातील आस्था तिलाच मिळाली तर स्वच्या पलिकडे जाण्याच्या प्रवासाकडे मार्गक्रमणा करता येते. हाच तर अध्यात्माचा खरा बोध आहे. त्यातूनच ही स्त्री मग परंपरा आणि आधुनिकतेचा दुवा होऊ शकते. आधुनिक जीवनशैली जगतानाही परंपरेतील आस्था, स्वपलिकडे जाणे हे अनुभवता येऊ शकते. अधिक सोपे सांगायचे तर ती पिझ्झा खाऊ शकते, अँड्रॉइड फोन वापरू शकते, सोशल मीडियावर वावरू शकते आणि तरीही ती स्वत:पलिकडे जाऊन काम करणे साध्य करू शकते. हा समतोल तिला राखता आला तर ती आधीच्या टप्प्यांवरच्या महिलांसाठीही रोल मॉडेल ठरेल. भूतकाळातून नीरक्षीरविवेक घेतला तर तिचे असणेही घरातील तरुणांसाठी महत्त्वाचे ठरेल आणि यातच तिच्या जीवनाचेही सार्थक असेल.

-डॉ. आनंद नाडकर्णी
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत)
(शब्दांकन : यामिनी सप्रे)

‘स्वत:ला शोधताना…’ या लेख आणि विश्लेषणात्मक व्हिडीओ मालिकेतून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी संवाद साधत जगण्याच्या पद्धतीची उकल केली. या मालिकेला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. वेबसाइट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तीन लाखांहून अधिक वाचक, दर्शकांपर्यंत ही लेखमाला पोहोचली. याशिवाय वृत्तपत्र वाचकांनीही पसंतीची पावती दिली. या मालिकेतील सर्व लेख आणि व्हिडीओ वेबसाइटवर ‘नारीशक्ती’च्या माध्यमातून पाहता, वाचता येतील.

via Article News: परंपरा नि आधुनिकतेचा दुवा – changes in women after age of 60 | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s