नाइट लाइफ! – -महाराष्ट्र टाइम्स

नाइट लाइफ!

जयंत होवाळ
Jayant.howal@timesgroup.com

नाइट लाइफ हा शब्दच मुळात झिंग आणणारा आहे. पब, बार डिस्कोमध्ये, म्युझिकच्या तालावर बेधुंद थिरकणे, मद्याचा आस्वाद घेत रात्र रंगीन करणे, कॅसिनोमध्ये दौलतजादा करणे, रात्री अपरात्री मद्याच्या अमलाखाली घरी परतणे… …नाइट लाइफ म्हटले की साधारणपणे हेच चित्र डोळ्यासमोर येते. पहाटेपर्यंत रंगलेली बुवांची कीर्तने, कव्वालीचे सामने, रास दांडिया, पुण्यात एकेकाळी रात्रभर चालणारा बालगंधर्व महोत्सव… हेही खऱ्या अर्थाने नाइट लाइफच! पण त्यास सांस्कृतिक बाज असल्याने नाइट लाइफच्या टिपिकल व्याख्येत हे उपक्रम मोडत नाहीत. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाइट लाइफचे बिगुल राज्य सरकारने वाजवल्यापासून पुन्हा एकदा नाइट लाइफची जोरदार चर्चा रंगली आहे. काहींनी स्वागत केले, तर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. थोडक्यात रात्र थोडी सोंगे फार असे नाइट लाइफ संकल्पनेचे झाले आहे.

मुळात मुंबईला नाइट लाइफ हा प्रकार नवीन नाही. रात्री एक वाजता शेवटची लोकल जाईपर्यंत या शहरात निरनिराळ्या प्रकारे नाइट लाइफ सुरूच असते. रात्री उशिरापर्यंत या शहरातील एक वर्ग कष्ट करत असतो. एक वर्ग आठ ते दहाच्या सुमारास कामावरून घरी परततो, तर काही जण श्रमपरिहारासाठी रेंगाळतात. नाइट लाइफची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. उच्चभ्रू वर्गाचे नाइट लाइफ पब डिस्कोमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. फिल्मी पार्ट्या हाही एक भाग आहे. फोरास रोड, कामाठीपुरा हे भाग नाइट लाइफ म्हणूनच ओळखले जातात. नाइट लाइफचे प्रकार वेगवेगळे आहेत.

विदेशात नाइट लाइफ मोठ्या प्रमाणावर असते, असा एक समज आहे. पण सरसकट तेथील लोक रात्र जागवतात, असे अजिबात नाही. ज्या देशात पर्यटक प्रचंड असतात, त्या देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी रात्रभर शॉपिंग मॉल, पब, डिस्को सुरू असतात. ती तेथील पर्यटन व्यवसायाची गरज असते. या नाइट लाइफमध्ये त्या देशातील सगळेच लोक सहभागी नसतात. मुंबईत बाबत बोलायचे तर, गिरण्यांच्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या कमला मिलसारख्या ठिकाणी मनोरंजनाची भरपूर साधने असणारे बार, रेस्टो बार, पब आणि खाद्यपदार्थांची हॉटेले या ठिकाणी उच्चभ्रू, धनिक मंडळींचा वावर दिसतो. याउलट काही सर्वसामान्य, मात्र हौशी मुंबईकर रात्री दीडपर्यंत सुरू असणाऱ्या मदिरालयात दिसतात. कुटुंब वत्सल माणसे पंधरवडा किंवा महिन्यातून एकदा रात्री बारापर्यंत हॉटेलात जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात. काही मंडळी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या खाऊ गल्ल्यांमध्ये क्षुधा शांती करताना दिसतात. काहीजण गेटवेवर रेंगाळतात. काही रात्री उशिरापर्यंत नरिमन पॉईंटवर समुद्राचा गार वारा अंगावर घेताना दिसतात. या सर्व नाइट लाइफला आतापर्यंत वेळेचे बंधन होते.

आता मात्र वेळेचे बंधन शिथिल होणार आहे. पण तेही सगळ्याच ठिकाणी नाही. मुळात सरकारच्या संकल्पनेतील नाइट लाइफमध्ये बार किंवा पब सरसकट पहाटेपर्यंत सुरू राहणार नाहीत. त्यामुळे हा मुद्दा सध्या तरी निकालात निघतो. मॉल्स, नरिमन पॉईंटचा एक पट्टा व वांद्रे कुर्ला संकुलातील काही भाग, ही तीन ठिकाणे नाइट लाइफसाठी प्रायोगिक तत्त्वावर निश्चित करण्यात आली आहेत. आपली आस्थापने एक तास सुरू ठेवायची की रात्रभर सुरू ठेवायची, हे त्या आस्थापनांच्या मालकांनाच ठरवायचे आहे. रात्रभर मॉल सुरू ठेवणे, हे वाटते तितके सोपे नाही. मुळात पश्चिम उपनगर वगळता पूर्व उपनगरातील अनेक मॉल गेल्या काही वर्षात डबघाईला येऊन बंद पडलेत. त्या तुलनेत पश्चिम उपनगरातील मॉल गजबजलेले असतात. नाइट लाइफमुळे रात्रभर हे मॉल गजबजलेले राहतील, अशी शक्यता फारच कमी आहे. व्यस्त दिनक्रमातून घर गाठण्याची धडपड करणारे मुंबईकर रोजच रात्री उशिरापर्यंत मॉलमध्ये टाइमपास करतील, हेही शक्य नाही. मॉल, हॉटेले रात्रभर सुरू राहिल्यास रोजगार वाढेल, असा युक्तिवाद आहे. त्यासाठी या आस्थापनांना आधी कामगार वर्ग वाढवावा लागेल. कामगार कायद्यानुसार तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागेल. मॉलमधील गाळ्यात एसी सतत सुरू असतो, दिव्यांचा झगमगाट असतो. त्यासाठी जादा बिल मोजावे लागेल. त्याकरिता मोठी गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीचा परतावा मिळेल, एवढ्या प्रमाणात ग्राहक आले तरच मॉल रात्रभर सुरू ठेवणे परवडणार आहे.

सुरक्षेचे काय हा महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर येणार असल्याने पोलिसांनी तर नकारात्मक सूर लावला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची कमी संख्या, दहशतवादी कारवायांची टांगती तलवार, व्हीआयपींचा बंदोबस्त, मोर्चे, मिरवणुका, सभा त्यासाठीचा बंदोबस्त, दिवसभर आरोपींची कोर्टात ने -आण करणे अशी असंख्य कामे पोलिसांना करावी लागतात. रात्री हे प्रमाण कमी असते. साहजिकच रात्री प्रत्येक पोलिस ठाण्यात स्टाफही कमी असतो. नाइट लाइफमुळे रात्रीची गस्त वाढवावी लागू शकते. त्यामुळे कामाचा अतिरिक्त भार पडू शकतो. नाइट लाइफ एन्जॉय करणाऱ्यांसाठी वाहतूक सेवेचा प्रश्नही आहे. मध्यरात्री ट्रेन, बस सेवा बंद झाल्यानंतर घरी कसे जायचे असा प्रश्न मालकीचे वाहन नसणाऱ्यांपुढे असेल. अन्य वाहनांतून घरी जाताना निर्जन रस्त्यावर सुरक्षेची धास्ती असू शकते. नाइट लाइफमुळे गुन्हेगारी वाढेल असाही आक्षेप घेतला जातो.

सध्या पब, बार, ऑर्केस्ट्रा बार यांना वेळेचे बंधन आहे. तरीही अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत धुमाकुळ सुरू असतो. त्यासाठी उत्पादन शुल्क, पोलिस तसेच पालिका अधिकाऱ्यांचे हात ओले करावे लागतात, असे सर्रास बोलले जाते. भविष्यात नाइट लाइफच्या नियमावलीतून या आस्थापनांवरील वेळेचे बंधन शिथिल झाले तर या कटकटी संपतील. या आस्थापनांमध्ये काहींची गुंतवणूक असल्याने नाइट लाइफचा घाट घातला गेला आहे, अशीही चर्चा आहे. रात्री अपरात्री खरेदी करता यावी, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, हे दोन मुद्दे तूर्तास तरी नाइट लाइफच्या प्रस्तावावर अग्रणी आहेत. बार, पबला वेळेचे बंधन असल्याने पहिल्या टप्प्यात तरी फार मोठा गदारोळ उडेल असे दिसत नाही. राहिला प्रश्न की, किती लोक फक्त खरेदीसाठी किंवा खादाडीसाठी संबंध रात्र या आस्थापनांमध्ये व्यतित करतील आणि त्यांची संख्या किती असेल? एकूणच होणारी गुंतवणूक, ग्राहकांची संख्या, त्या प्रमाणात मिळणारा नफा, पर्यटकांचे प्रमाण या सगळ्या आर्थिक बाबी नाइट लाइफशी निगडीत आहेत. त्यामुळे लगेचच नाइट लाइफची झिंग चढावी असे काही नाही.

via government permit for night life in mumbai : नाइट लाइफ! – nightlife! | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s