डरपोकांची डरकाळी |लोकसत्ता

२०१४ ते २०२० या सहा वर्षांत असे काय झाले, की एकेकाळी गळामिठीलायक असलेले ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे मोदी सरकारला खुपू लागले?

भारतात व्यवसायवृद्धीसाठी आले म्हणजे बेझोस आणि त्यांच्या मालकीच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या तालावर नाचायला हवे आणि आपणास नावडते ते टाळायला हवे, असा काहीसा ‘भारतीय’ आग्रह आपल्या सरकारचा असावा. मात्र, यातून दिसून येते ती सरकारची स्वत:विषयीची असुरक्षितताच..

वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, सत्ताधारी भाजपच्या परराष्ट्रविषयक समितीचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याबाबत घेतलेली भूमिका आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दमदार नियतकालिकाने त्यास दिलेले चोख उत्तर, यातून काय दिसून येते?

आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात जेफ बेझोस ही मोठी छछोर व्यक्ती. अ‍ॅमेझॉनचे डोळे दिपवणारे यश हे केवळ त्यांच्या कल्पनाशक्तीची परिणती. त्यामुळे जगातील आघाडीच्या कंपन्यांत अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो आणि बेझोस हे जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती गणले जातात. त्यांचे हे ऐश्वर्य हे कोणत्याही सरकारी धोरणांच्या कृपेने आलेले नाही. म्हणजे बेझोस हे कोणी आपल्या उद्योगपतीप्रमाणे सरकाराधारित-सरकारमान्य धनाढय़ नाहीत. त्याचमुळे २०१४ सालच्या त्यांच्या भारत दौऱ्यात साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढय़ातोरणे उभारली होती. परंतु या वेळी मात्र त्यांच्यावर सरकारची खपामर्जी दिसून आली. हे बेझोस भारतात येण्याआधी आपल्या स्पर्धा आयोगाने त्यांच्या कंपनीविरोधात कारवाई सुरू केली आणि ते भारतात आल्यावर त्यांना कोणी उच्चपदस्थ भेटला नाही. त्यांच्या गतदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास ठसठशीतपणे उठून दिसतो. आपल्या कार्यबाहुल्यामुळे पंतप्रधानांना बेझोस यांच्यासाठी वेळ काढणे दुरापास्त झाले असावे, असे एकवेळ मानता येईल. पण बेझोस यांच्या भारत-गुंतवणूक घोषणेस वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दाखवलेल्या वाकुल्यांस मात्र हे कारण देता येणारे नाही. वाणिज्यमंत्री या नात्याने भारत हा गुंतवणूकदारांसाठी किती आकर्षक आहे, हे जगास सांगणे हे गोयल यांचे काम. पण येथे झाले उलटेच. अ‍ॅमेझॉन भारतात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू इच्छितो, या बेझोस यांच्या विधानावर आपले गोयल- ‘मग काय उपकार करतो काय,’ असे डाफरते झाले. या विधानाचे पडसाद उमटल्यानंतर गोयल नरमले, वरमले आणि भूमिका बदलते झाले. पण प्रश्न असा की, २०१४ ते २०२० या सहा वर्षांत असे काय झाले की एकेकाळी गळामिठीलायक असलेले बेझोस असे आपणास खुपू लागले?

‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे त्याचे उत्तर. २०१३ साली या वर्तमानपत्राची मालकी ही बेझोस यांच्याकडे आली. २०१४ साली ते भारतात आले, तोपर्यंत ‘पोस्ट’ने टीका करावी असे काही मोदी सरकारकडून घडले नव्हते. अर्थातच त्यामुळे बेझोस हे भारत सरकारला हवेहवेसे होते. पण नंतर या सरकारच्या अनेक धोरणांवर ‘पोस्ट’ने चांगलेच टीकेचे आसूड ओढले असून अलीकडे तर या स्वतंत्र आणि निर्भीड वृत्तपत्राने मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विशेषत: या सरकारचे काश्मीर धोरण आणि अलीकडचा नागरिकत्व मुद्दा हे ‘पोस्ट’चे सातत्याने लक्ष्य आहेत. तेव्हा बेझोस हे आपल्या सरकारसाठी तूर्त स्वागतार्ह नाहीत. त्यांच्याविरोधात आपल्या स्पर्धा आयोगास कारवाई करावीशी वाटते आणि त्यांच्या गुंतवणूक प्रस्तावावर आपले वाणिज्यमंत्री नाक मुरडतात, याचा अर्थ हा. पण आपला क्षुद्रपणा येथेच थांबत नाही.

भारतात आल्यावर बेझोस यांनी ‘एकविसावे शतक भारताचे आहे,’ अशा अर्थाचे ट्वीट केले. त्यास विजय चौथाईवाले यांनी उत्तर दिले. भाजपच्या परराष्ट्रविषयक समितीचे प्रमुख या नात्याने तरी चौथाईवाले यांना अमेरिकेतील नियतकालिके कशी चालतात, याची जाण असायला हवी होती. असल्यास त्यांच्या ट्वीटवरून तरी त्याचा आभास होत नाही. या ट्वीटमध्ये त्यांनी बेझोस यांना ‘पोस्ट’च्या भारतविषयक लिखाणाबाबत टोचले. ‘भारत सरकारचे मन जिंकण्यापेक्षा तुमच्या वॉशिंग्टनमधील कर्मचाऱ्यांना योग्य काय ते सांगा. अन्यथा तुमचे हे (भारत सरकारचे मन जिंकण्याचे) प्रयत्न वाया जातील,’ असे या चौथाईवाले यांचे म्हणणे. या वर्तमानपत्राचे भारतविषयक वृत्तांकन हे पूर्वग्रहदूषित आहे, असे त्यांचे मत. ते खरे आहे असे मानले तरी, त्याची आगळीक बेझोस यांच्यापाशी करणे हे अगदीच बालिश. हा बालिशपणा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या संपादकांनी दाखवून दिला. या वर्तमानपत्राचे ज्येष्ठ संपादक एली लोपेझ यांनी चौथाईवाले यांना चोख प्रत्युत्तर दिले. ‘‘एक खुलासा : वॉशिंग्टन पोस्टने काय लिहावे हे आम्हास जेफ बेझोस सांगत नाहीत. स्वतंत्र पत्रकारिता म्हणजे सरकारचे मन जिंकणे नव्हे. आमचे प्रतिनिधी आणि स्तंभलेखक हे भारतीय लोकशाही परंपरेचेच पालन करतात,’’ अशा सणसणीतपणे या संपादकाने चौथाईवाले यांना त्यांची आणि भारतीय मानसिकतेची जागा दाखवून दिली.

भारतात व्यवसायवृद्धीसाठी आले म्हणजे बेझोस आणि त्यांच्या मालकीच्या ‘पोस्ट’ने आपल्या तालावर नाचायला हवे आणि आपणास नावडते ते टाळायला हवे, असा काहीसा ‘भारतीय’ आग्रह आपल्या सरकारचा असावा. तसा तो होण्यामागे स्थानिक काही अनुभव असतीलही. पण म्हणून अमेरिकी व्यवस्थेस हादरवण्याचा गौरवशाली इतिहास असणाऱ्या वर्तमानपत्रानेही आपले आणि आपलेच तेवढे ऐकावे हा भारत सरकारचा आग्रह दिसतो. तो एका ट्वीटच्या फटकाऱ्याने या वर्तमानपत्राच्या संपादकाने भिरकावून दिला. इतकेच नव्हे, तर आपल्या वाणिज्यमंत्र्यांच्या विधानावर बेझोस यांनीदेखील एक चकार शब्दाची प्रतिक्रिया दिली नाही आणि या विधानास अनुल्लेखाने मारले. उलट अ‍ॅमेझॉन भारतात आगामी काळात दहा लाख रोजगारनिर्मिती कशी करू इच्छितो, याची योजना अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर सादर केली.

भारत सरकारातील गोयल यांच्यासारखे मंत्री वा चौथाईवाले यांच्या राष्ट्रवादी प्रेमापेक्षा बेझोस यांचे हे रोजगारनिर्मितीचे आश्वासन या देशातील लाखो तरुणांना अधिक आश्वासक आणि अधिक विश्वासार्ह वाटले असणार, यात तिळमात्रही शंका नाही. याचे कारण या बेझोस यांनी ‘आधी केले आणि मग सांगितले.’ याउलट आपल्या सरकारने बरेच काही सांगितले, पण प्रत्यक्षात त्यातील किती आले हे आपल्या अर्थव्यवस्थेचे वास्तव दाखवून देते. आज आपल्या देशाचा कानाकोपरा अ‍ॅमेझॉनने जोडलेला आहे आणि त्यांच्या विक्रयतंत्र तसेच उद्यमशीलतेने अनेकांचे भले झाले आहे. आपल्या ताज्या भारतभेटीत बेझोस यांनी भारतातील लहानमोठय़ा किराणा दुकानांना सामावून घेणारी नवी योजनाही सादर केली. तीदेखील महत्त्वाची. याचे कारण पारंपरिक किराणा दुकानांचे रक्षणकत्रे असल्याचे दाखवत आपले सरकार भारतीय ग्राहकांच्या हिताकडे पूर्ण काणाडोळा करताना दिसते. त्याचमुळे अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्ट-चलित फ्लिपकार्ट अशांना रोखण्याचे धोरणात्मक प्रयत्न होतात आणि त्याच वेळी असा प्रयत्न करणारा तोच स्पर्धा आयोग ‘दुनिया मुठ्ठी में’ घेऊ पाहणाऱ्या भारतीय कंपनीच्या उद्योगांकडे मात्र निवांत काणाडोळा करतो. ही स्वत:विषयीची असुरक्षितता.

व्यापारउदिमात परदेशी कंपन्यांना ‘दरवाजे बंद करा’ या धोरणातून तीच दिसून येते. म्हणून परदेशी वृत्त आणि वृत्ती या दोन्हीविरोधात आपण आक्रमक. तथापि आक्रमकतेच्या मुळाशी अनेकदा सामर्थ्य आणि शौर्य यापेक्षा भीतीच अधिक असते. यास ‘फीअर इंडय़ुस्ड अ‍ॅग्रेशन’, म्हणजे भीतीपोटी आलेली आक्रमकता, असे म्हणतात. हत्ती, वाघ वा सिंह हे खरे सामर्थ्यवान उगा येताजाता कोणावर डाफरत नाहीत आणि उगा शड्ड ठोकत, आपल्या दंडबेटकुळ्या दाखवत हिंडत नाहीत. याउलट स्वत:च्या सामर्थ्यांविषयी साशंक असलेले अधिकाधिक आक्रमकतेचे प्रदर्शन करतात. हे वैज्ञानिक वास्तव प्राण्यांइतकेच मनुष्यप्राण्यास आणि त्यांच्या समुदायासही लागू पडते. अलीकडे अमेरिकेसारख्या देशाने चीन आदींबाबत घेतलेली व्यापार भूमिका आणि गोयल, चौथाईवाले यांची अ‍ॅमेझॉन तसेच बेझोस यांच्याविषयीची भूमिका याच सत्याची निदर्शक. पण डरपोकांची डरकाळी तात्पुरते लक्ष वेधून घेते. पुढे त्यातून काही साध्य होत नाही. हा इतिहास आहे आणि तेच भविष्यही असेल.

via Editorial on Washington Post’s riposte to BJP leader over Bezos jibe abn 97 | डरपोकांची डरकाळी | Loksatta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s