‘अमेझॉन’ची गुंतवणूक खेळी –महाराष्ट्र टाइम्स

‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या ई कॉमर्समधील बड्या कंपन्यांच्या विरोधात देशातील छोटे व्यापाऱ्यांकडून निदर्शने होत असताना आणि या कंपन्यांच्या धोरणांबद्दल केंद्राच्या स्पर्धा आयोगामार्फत (सीसीआय) चौकशी सुरू असताना ‘अमेझॉन’चे प्रमुख जेफ बेझॉस भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. राजधानीत बुधवारी बेझॉस यांनी एक अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली. देशातील एक कोटी छोटे आणि मध्यम उत्पादक आणि व्यापाऱ्यांना यामुळे मदत होईल, असा दावाही त्यांनी केला. भारतात उत्पादन झालेल्या वस्तूंच्या निर्यातीसाठी २०२५पर्यंत दहा अब्ज डॉलरचे लक्ष्य ‘अमेझॉन’ने ठेवले आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बेझॉस यांच्या या घोषणांनंतर म्हणाव्या तशा उत्साही प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत. या कार्यक्रमापासून मोदी सरकारमधील मंत्री कटाक्षाने दूर राहिले. इतकेच नव्हे, तर पंतप्रधान मोदी त्यांना भेटणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. बेझॉस यांनी यापूर्वी २०१४मध्ये मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर २०१६मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाही उभयतांची भेट झाली होती. यावेळी मात्र बेझॉस यांच्या दौऱ्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले जात आहे. याचे तातडीचे कारण दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आहे; आणि दुसरे कारण म्हणजे छोटे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते ‘अमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’वर थेट आरोप करीत रस्त्यावर उतरले आहेत. या ऑनलाइन पोर्टलमुळे आपल्या व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याची भावना त्यांच्यात प्रबळ आहेच; परंतु या कंपन्या फसवणूक करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. परकी गुंतवणुकीचे नियम धाब्यावर बसवून आणि करसवलतीचा लाभ घेऊन या कंपन्या व्यवहार करतात, असा आरोप ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियन ट्रेडर्स’ (सीएआयटी) या त्यांच्या संघटनेने केला आहे. ऑनलाइन विक्री करताना प्रचंड सवलत दिली जात असल्याने या बड्या कंपन्यांबरोबर स्पर्धा करणे अवघड बनल्याची या संघटनेची तक्रार असून, सरकारने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहेच. ‘अमेझॉन’ने आरोप फेटाळले असले, तरी याप्रकरणी ‘सीसीआय’मार्फत चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बेझॉस आले आहेत. त्याचा राजकीय फटका बसू नये म्हणून सरकार या दौऱ्यापासून दूर आहे. बेझॉस मात्र भारतातील विस्ताराबद्दल, येथील छोट्या उत्पादकांना सबळ करण्याबद्दल, तसेच देशातील शंभर शहरांत डिजिटल बाजारपेठ (डिजिटल हाट) उभारण्याबद्दल बरेच आश्वासक बोलले आहेत. ऑनलाइन माध्यमातून भारतीय उत्पादक आणि विक्रेत्यांची भरभराट होत असल्याचा दावा करून २०२३पर्यंत पाच अब्ज डॉलर मूल्याच्या निर्यातीचे उद्दिष्ट ‘अमेझॉन’ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांना वाटतो आहे. आजवर देशात पाच अब्ज डॉलर गुंतवणूक केलेल्या ‘अमेझॉन’च्या पुढील वाटचालीचा आढावाही त्यांनी घेतला. या निमित्ताने ऑनलाइन व्यापार आणि किरकोळ विक्रेत्यांमार्फत होणारा व्यापार यांबाबत व्यापक व सर्वसमावेशक विचार करण्याची गरज आहे. इंटरनेटच्या आगमनानंतर ई कॉमर्सचे क्षितिज खुले झाल्यापासून त्याला छोटे-मोठे विक्रेते आणि व्यापारी विरोध करत आहेत. उत्पादकांना मोठा लाभ होईल, त्यांच्या मालांना चांगला उठाव मिळेल आणि जागतिक बाजारपेठ खुली होईल, असे चित्र रंगविले गेले; तसेच छोट्या व्यापाऱ्यांवरही विपरीत परिणाम होणार नसल्याचे सुरुवातीला म्हटले गेले. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान क्रांतीबरोबर वाढलेल्या तरुण पिढीने ई कॉमर्सचा अगदी सहज स्वीकार केला. त्यामुळे ऑनलाइन व्यापाराची बाजारपेठ विस्तारत गेली. तंत्रज्ञानावर आधारलेल्या या बाजारपेठेने हातपाय पसरतानाच उत्पादक, छोटे विक्रेते यांपासून ग्राहकांपर्यंत थेट वस्तू नेणारे एक जाळे विणले. ‘अमेझॉन’बरोबरच देशी ‘फ्लिपकार्ट’नेही हातपाय पसरले. भारतात येऊ पाहत असलेल्या ‘वॉलमार्ट’ने अखेर ‘फ्लिपकार्ट’ विकत घेऊन देशातील ऑनलाइन बाजारपेठेतील चित्र पूर्णत: बदलले. ई कॉमर्समुळे पारंपरिक व्यापारावर परिणाम झाला असला, तरी ग्राहकांना स्वस्तातील पर्याय मिळला. तसेच, रोजगारासह काही लाभदायक गोष्टीही आकाराला आल्या. यामुळे दैनंदिन व्यवहारातील किरकोळ वस्तूंपर्यंत औषधांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून कपड्यांपर्यंत बहुतेक सर्व वस्तू ऑनलाइन मिळत गेल्या. त्यांवर सवलतींचा वर्षाव करून बड्या कंपन्यांनी ऑनलाइन बाजारपेठेचा विस्तार केला. याचा मोठा फटका छोट्या विक्रेत्यांना बसत असल्याकडे ‘सीएआयटी’ लक्ष वेधत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आणि काळानुसार बदलून कात टाकणे हा नियम विक्रेत्यांना लागू आहे. बड्या कंपन्यांसमोर टिकाव धरण्याची क्षमता त्यांच्यात येण्यासाठी प्रयत्न करतानाच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे.

via Editorial News: ‘अमेझॉन’ची गुंतवणूक खेळी – amazon’s business strategy, announces billions investment in india | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s