विचारवंतांची निष्क्रियता हा कलंक – महाराष्ट्र टाइम्स

विचारवंतांची निष्क्रियता हा कलंक
>> फा. फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद येथे शुक्रवारी उद्घाटन झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या दीर्घ अध्यक्षीय भाषणातील हे निवडक अंश…

‘सह नेते ते साहित्य, अशी साहित्याची एक व्याख्या केली जाते. समाजाला सत्याचे भान देऊन भविष्याचे वेध घेण्याची दृष्टी देणारा एक संस्कार म्हणजे साहित्य. मानवी जीवन हे गूढ आणि रहस्यमय आहे. आपल्या जीवनाला अनेक पदर आहेत. त्यांपैकी साहित्य हा एक पदर आहे. मानवी जीवनातील गूढ जाणून घेण्याची माणसाला सतत उत्सुकता लागलेली असते. माणसाच्या मनात विचारांचे आणि भावनांचे सतत कल्लोळ उठत असतात.

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र व्यासपीठ असते. त्यांचे व्यासपीठ त्या त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते आणि असले पाहिजे. आपण कधी कधी राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर बसवत असतो. उस्मानाबादच्या संमेलनाचे व्यासपीठावर स्थानापन्न न होण्याचा निर्णय राजकारणी मंडळीने मोठ्या मनाने घेतलेला आहे. एक नवीन पायंडा उस्मानाबादच्या संमेलनातून सुरू होत आहे. त्याबद्दल पुढाऱ्यांचे आणि उस्मानाबादकरांचे अभिनंदन! साहित्य संमेलने हे साहित्यिकांचे व्यासपीठ आहे आणि तिथे अग्रपूजेचा मान साहित्यिकांचाच असतो. एक साहित्यप्रेमी म्हणून राजकीय व्यक्तींनी अवश्य संमेलनाला हजर राहावे.

सरकारने आपल्या सांस्कृतिक धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुतळे उभारण्याऐवजी साहित्य संमेलनाला पुरेसे अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागात आणि श्रीमंत भागात जेव्हा संमेलने होतात, तेव्हा शासनाने अनुदान देताना त्याचा विचार करावा. राजकारण ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. एखाद्या देशाचे भवितव्य त्या देशाच्या भल्या-बुऱ्या राजकारणावर अवलंबून असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपले नागरी जीवन राजकारण्यांच्या हवाली करीत असतो. म्हणून साहित्यिक ह्या प्रक्रियेपासून अलिप्त राहू शकत नाही. जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मान राखणे हा भेकडपणा आहे. जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, तेव्हा समाजामध्ये धर्माच्या नावाने भेदाभेद केला जातो आणि समाजाचे वांशिक शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला जातो. जेव्हा एखाद्या प्रदेशाला नजरकैâदेचे स्वरूप येते, जेव्हा दोष नसताना अश्राप नागरिकांची उपासमार होते, त्यांचे उपजिविकेचे साधन हिरावून घेतले जाते तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे, ‘राजा कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आली आहे.’

भारतीय संविधानाला एका रथाची उपमा दिली, तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय ही चार मूल्ये त्या रथाची चार चाके आहेत, सहा मूलभूत हक्क त्या रथाचे सहा अश्व आहेत. ‘सेक्युलर’ ह्या इंग्रजी शब्दाला काही जण आक्षेप घेतात. या इंग्रजी शब्दाचा उगम युरोपमध्ये झालेला आहे. तिथे सेक्युलर म्हणजे केवळ इहवाद किंवा धर्मविहीनता असा केला जातो. आपली सेक्युलर ही कल्पना त्याहून खूप भिन्न आहे. तिचा अर्थ सर्वसमावेशकता म्हणजे सर्वांना समान वागणूक आणि कुठलाही एक धर्म राष्ट्रधर्म नाही, असा आहे. पंडित नेहरूंनी सेक्युलॅरिझमची ही भारतीय संकल्पना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता) हा भारतीय घटनेचा आत्मा आहे. तो रथाचा सारथी आहे. जोपर्यंत सारथी सुरक्षित आहे, तोपर्यंत आपल्या देशाच्या अखंडतेला कुठलाही धोका नाही, असे मला वाटते. म्हणूनच आपल्या एका हातात आपापल्या धर्माचा धर्मग्रंथ असला, तर दुसऱ्या हातात भारतीय संविधानाची प्रत असली पाहिजे.

आपल्याकडे संविधानासारखे धन आहे. त्यानुसार आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुभवत आहोत. ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही’ अशा शब्दांत आपण आपलीच पाठ थोपटून घेत आहोत, हे सगळे खरे आहे. परंतु दुर्दैवाने अधूनमधून आपल्याकडे विचारांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागते. आपला प्रवास सहिष्णुतेतून असहिष्णुतेकडे, विशालतेकडून संकुचितपणाकडे आणि अहिंसेकडून हिंसेकडे होऊ लागतो. काहींच्या भावना अतिशय हळव्या असतात. त्या पटकन दुखावल्या जातात. धर्म, जात, भाषा, प्रांत, ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याविषयी चिकित्सक भाष्य केले की, संबंधित गट उसळून उठतात. कायदा हाती घेतात, प्रसंगी हिंसाचाराचा अवलंब करतात. अहिंसेकडून हिंसेकडे चाललेल्या अशा प्रवासाची अलीकडची उदाहरणे म्हणजे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या झालेल्या भेकड हत्या.

कुणाच्या ताटात काय आहे? कुणाच्या वाटीत काय आहे? ह्यावर एखाद्याचे जगणे किंवा मरणे अवलंबून असावे ही अतिशय दु:खद बाब आहे. काही ठिकाणी जमावाकडून गायीच्या नावाने विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ह्यांनी गायीविषयीची केलेली चिकित्सा अतिशय पुरोगामी आहे. गाय जगली पाहिजे, तसा माणूसही जगला पाहिजे. म्हणून गायीच्या नावाने केलेल्या हत्या हा सावरकरांच्या विचारांचा केलेला पराभव आहे. देशभरात झालेल्या इतर २०८ पत्रकारांच्या हत्यासुद्धा तशा निषेधार्ह आहेत. विचारवंतांची निष्क्रियता हा विसाव्या शतकावरील एक लाजिरवाणा कलंक आहे. रोगाचे अचूक निदान झाले की, त्यावर जालीम इलाज करता येतात. आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही तर बेकारी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी ह्यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधता व त्यामुळे होणारे उत्पात इ. आहेत. आर्थिक क्षेत्रातील घसरण, बंद होत चाललेले उद्योगधंदे, लघुउद्योगांवर आलेली संक्रांत, त्यामुळे निर्माण झालेले बेकारांचे तांडे व त्यांचे उद्ध्वस्त होत चाललेले संसार ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजाच्या सहनशीलतेची हद्द होत आहे.

मायबोली मराठीवर आपले आतड्यापासून प्रेम आहे का? हा खरा प्रश्न आहे. ज्याच्यावर आपले प्रेम असते, त्याच्यासाठी आपण कुठलाही त्याग करण्यास, दिव्य करण्यास, अगदी प्राण द्यायला सुद्धा तयार असतो. सगळा न्यूनगंड दूर सारून, आपल्या ओठांनी नव्हे, तर आत्म्याने मराठीत बोलू या आणि मुला-नातवंडांशी मराठीत संभाषण करू या. त्यामुळेच त्यांना मायबोलीची गोडी लागेल.

२१व्या शतकात आपले धरतीबरोबरचे नाते बिघडले आहे, कारण आपण ह्या वसुंधरेचे विश्वस्त नाही, मालक आहोत, असे आपण समजू लागलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला पृथ्वीवरच्या साधनसामुग्रीचा मनमानी विध्वंस करण्याचा जणू हक्कच प्राप्त झाला आहे. ‘सबका मालिक एक आहे’ अशा परमेश्वराबरोबरचा संवाद तुटण्याचे एक कारण आहे. वसुंधरेला मन मानेल तसे लुटण्याचा जणू काही आपल्याला हक्क मिळालेला आहे. कारण आपण आपल्याला विश्वाचे राजे समजतो.

कर्ब वायूमुळे होणारे प्रदूषण, निसर्गाचे बदललेले चक्र, पाण्याची बिघडलेली गुणवत्ता, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, मानवी जीवनाची होणारी हानी अशा अनेक कारणांमुळे आजचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत ह्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आर्थिक विकास आणि फसवे विज्ञान ह्यांच्या नावाखाली हवा, पाणी आणि मानवी जीवन धोक्यात आलेले आहे.

माझ्या बोलण्यात आणि लेखनात बायबलप्रमाणे संत-साहित्यातील संदर्भ सहजपणे येत असतात. त्याचे कारण मला संतांच्या साहित्यामध्ये सापडते. संत तुकारामांचे अंभग अभ्यासत असताना मी तुकारामांच्या प्रेमात पडलो. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीचे अत्यंत उदार अंत:करणाने स्वागत केले आणि गेल्या तीन चार महिन्यांपासून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

via father francis debrito : विचारवंतांची निष्क्रियता हा कलंक – thinkers inaction is a stigma | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s