बंदा रुपया : निर्यातक्षम मातबरी |लोकसत्ता

पैसा फिरता राहिला की वाढतो.. अनेक वर्षे आद्योगिक वसाहतीमध्ये हातपाय मारणाऱ्या आयटीआय उत्तीर्ण दिगंबर मुळे यांना या अर्थसल्ल्याचे महत्व तसे उशीरानेच उमगले.

शिक्षण जेमतेमच. उद्योग जगताशी संबंध कसानुसा म्हणावा असाही नव्हता. नोकरीच्या शोधात लातूरमधील जगळपूर या छोटय़ा गावातून औरंगाबाद गाठले होते. नोकरी सापडली नाहीच. मग आयटीआयमधून शिकलेल्या कसबावर छोटासा व्यवसाय सुरू झाला. पुढे स्वत:चे उत्पादन करण्याचा निर्णय तसा उशिरानेच घेतला गेला. पण आता त्यांच्या ‘विजय गीअर’ या कंपनीची वार्षिक उलाढाल आहे १५ कोटी रुपये. कुशल-अकुशल ७० जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारे मुळे यांची औरंगाबादमध्ये लघुउद्योजक म्हणून निर्माण झालेली ओळख प्रेरणादायीच म्हणावी लागेल.

गीअर हे तसे लोखंडी लंबगोलाकार तुकडे आणि दातऱ्याच्या आधारे इंजिन मोटारीच्या वेगावर नियंत्रण करण्याचे उपकरण. ही प्रक्रिया तशी किचकट म्हणता येईल अशी. कारण वेगावर नियंत्रण मिळविताना त्याची चक्राकार गती मात्र वाढते. इंग्रजीत त्याला टॉर्क म्हणतात. औद्योगिक विश्वातील बहुतांश विजेची मोटार साधारणत: प्रति मिनिट १४४० आवर्तने करते. पण प्रत्येक वेळी हा आवर्तन वेग उपयोगाचा नसतो. तो कमी करण्यासाठीचे गीअर ‘विजय गीअर’मध्ये तयार होतात. हा वेग कमीत कमी ३० आवर्तने प्रति मिनिटांपर्यंत खाली आणता येतो किंवा त्यापेक्षा अधिक वेगावर नियंत्रण ठेवता येते. गीअरचे दातरे हे काम करतात. त्यासाठी लागणारे लोखंड आणल्यांनतर त्याला तापवून ठरावीक आकार देणाऱ्या वेगळया कंपन्यातून माल आणला जातो. मग मग वेगवेगळया दंडगोलाकार किंवा चपटय़ा आकाराच्या चकत्यांना दातरे पाडले जातात. त्यासाठी आता अत्याधुनिक यंत्रे आहेत. संगणकाच्या सहाय्याने किती खोलवर लोखंडी चकतीवरील दात कापायचे  हे ठरणारे अभियंते त्याचे आरेखन करतात. त्या चकत्या आणि लोखंडाचे तुकडय़ांचे दात असे गुंतविले जातात की त्यातून गीअर तयार होतो.

हा व्यवसाय मात्र मुळे यांना सहजपणे सूचला आणि सुरू केला असे घडले नाही. आयटीआय पूर्ण झाल्यानंतर टीव्हीसाठी लागणारी ‘पिक्चर टय़ूब’ बनविण्याच्या कारखान्यात त्यांनी आठ महिने नोकरी केली. पण या निमित्ताने वेगवेगळया कंपन्यांमध्ये त्यांचा संपर्क येत असे. त्या कंपन्यांना लागणारे सुटे भाग आणि त्याच्या निर्मितीचा खर्च याचा साधारण त्यांना अंदाज येत होता. ज्यांच्याकडे सोय आहे, त्यांच्याकडून वाहन क्षेत्रासाठी बनविली जाणारी छोटी यंत्रे आपल्याला बनविता येतील, असा त्यांना अंदाज आला. पुढे एका मित्राबरोबर भागीदारीमध्ये व्यावसाय सुरू केला. त्यासाठी वडिलांकडून ३५ हजारांची मदत घेतली.

एक मशीन विकत घेतली. पुढे पंतप्रधान रोजगार योजनेतून १ लाख ८० हजाराचे कर्ज घेतले. पण भागीदारीमध्ये व्यवसाय काही बहरला नाही. भागिदारी थांबविली. कर्ज डोक्यावर घेतले. सोबत मशीन मात्र ठेवली आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. कर्ज एकमुश्त परत करू, असे ठरवून बँकेत गेले. तेथे बँकेचा अधिकारी व त्यांच्याशी झालेला सहज संवाद त्यांच्यासाठी मोलाचा अर्थसल्लाच ठरला. त्यांनी सांगितले, ‘पैसे असतील तर त्याचे हप्ते करून ते परत करा. उरलेल्या पैशातून आणखी काही यंत्रे विकत घ्या आणि व्यवसाय वाढवा.’ पुढे स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या व्यवस्थापकाने ५० हजार रुपयांचे रोकड सहाय्य उपलब्ध करून दिले. पैसा फिरला की तो वाढतो असे कळत गेले. याच काळात औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड विकत घेता आला. देशात तेव्हा तेजीचा काळ होता. उद्योजकांसाठी ‘लँड मार्क’ तर्फे प्रशिक्षण घेतले जात होते. तेथे दिगंबर मुळे यांना कळले की, जगायचे कसे? आपले स्वत:चे काही तरी उत्पादन असायला हवे. तोपर्यंत दुसऱ्या कंपन्यांना हव्या तशा वस्तू पुरविण्याचा पुरेसा अनुभव मुळे यांनी घेतला होता. आता स्वत:चे उत्पादन कसे असावे असा त्यांचा शोध सुरू झाला.

गीअर बनविणाऱ्यांची संख्या तशी कमी होती म्हणून हा व्यावसाय निवडला. बँकांचे हप्ते वेळेवर परत करण्यामुळे विश्वास निर्माण झालेला होता. औद्यागिक वसाहतीमध्ये भूखंड घेण्यापर्यंतचे भांडवल पूर्वीच निर्माण करण्यात यश आल्याने गीअर बनविण्यासाठीची यंत्रसामग्री घेण्यात आली. आता २२ राज्यात ८० वितरक नेमता येईल, अशी मजल त्यांच्या कंपनीने मारली आहे. पुढच्या काळात उलाढालाची टप्पा ६० कोटी असावा, असे त्यांनी ठरविले आहे.

समोरच्या व्यक्तीला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आणि ती व्यक्ती आपल्या बाजूनेच उभी आहे, असा विश्वास टाकावा लागतो. याच गुणांमुळे कधी आपोआप तर कधी विश्वासू माणसांच्या मदतीने थोडे फार निर्माण करू शकलो. त्यामुळे कमी शिक्षणाचा तसा कधी अडथळा आला नाही, असे मुळे आवर्जून नमूद करतात.

निर्यातक्षम गीअरचे निर्माण

गीअर बॉक्समध्ये साधारणत: ३३ सुटे भाग असतात. त्याला लागणारे स्टील म्हणजे लोखंडाचे भाव अलीकडच्या काळात बरेच कमी-अधिक होत राहिले. असे असले तरी कच्चा माल कोणत्या काळात घ्यावा, यावर बरेच काही अवलंबून आहे. आता निर्यातक्षम गीअर बनविण्यातही दिगंबर मुळे यांना यश मिळाले आहे. ब्राझीलमध्ये त्यांनी गीअरची विक्री केली आहे. पण आता भरारी घेऊ शकू, असा त्यांना विश्वास वाटतो आहे.

३५ हजार ते १५ कोटी सोबतीला मेहनत

कमी भांडवलामध्ये शिकत आणि चुकत उभे राहिलेल्या मुळे यांच्या मते आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. बँकेचा एकही हप्ता कधी चुकविला नाही. कर भरण्याचा हप्ताही कधी प्रलंबित ठेवला नाही. तसे केले तरच व्यवसाय पुढे जातो. पण असे करताना विश्वासू माणसांची फळी उभी करावी लागते.

दोन माणसे आणि एक मशीन या भांडवलावरचा व्यवसाय आता ७० जणांना रोजगार देत आहे. गावी असणारी शेतीत झटणारी माणसे आता कौतुक करीत आहेत. पण नवे काही करायचे असेल तर परदेशातील काम करण्याची शिकवण आत्मसात केली पाहिजे, असे मुळे यांचे मत आहे.

दिगंबर मुळे (विजय गीअर्स)

* उत्पादन : वाहन क्षेत्रासाठी गीअर्सची निर्मिती

* मूळ गुंतवणूक  : २.५० लाख रु.

* स्व-भांडवल  : ३५,००० रु.

* सरकारी योजनेचा फायदा? : पंतप्रधान रोजगार योजना

* सध्याची उलाढाल : १५ कोटी रु.

* रोजगार निर्मिती : ७०

* शिक्षण-प्रशिक्षण : आयटीआय उत्तीर्ण

* डिजिटल सक्षमता : संकेतस्थळ :

सुहास सरदेशमुख

* लेखक ‘लोकसत्ता’चे औरंगाबादचे प्रतिनिधी

suhas.sardeshmukh@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल : arthmanas@expressindia.comवर कळविता येईल.

via article on Exportable power Digambar Mule abn 97 | बंदा रुपया : निर्यातक्षम मातबरी | Loksatta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s