आखाती धुमश्चक्रीचा अर्थ –महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम आशियातले सध्याचे हे युद्ध आणखी पेटणार नसले तरी छुपे युद्ध, एकमेकांवर हल्ले पूर्वीसारखेच चालू राहतील. आधीच जागतिक स्तरावर सुरू असलेल्या मंदीत या अस्थिरतेची भर मात्र पडणार आहे..

पश्चिम आशियाच्या भूमीला अशांततेचा शापच आहे. धर्म, पंथ आणि टोळ्यांमधली तेढ, हुकुमशाही राजवटी, आणि तुडुंब भरलेल्या तेलविहिरीमुळे पाश्चात्य देशांची चालणारी लुडबूड अशी इथे सगळी गुंतागुंत आहे. यामुळे या विस्तीर्ण भूमीत सतत घडामोडी चाललेल्या असतात. या वर्षारंभी झालेली घडामोड हा त्यातलाच एक अध्याय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानं इराणच्या कासिम सुलेमानी यांची अमेरिकेच्या लष्करानं हत्या केली आणि या भागातलं वातावरण तापलं. तसं २०११च्या अरब क्रांतीच्या (अरब स्प्रिंग) वादळापासून ते तापलेलंच आहे. त्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून भर पडली आहे. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यावर लगेचच इराणबरोबरच्या आण्विक कराराला कचऱ्याची टोपली दाखवली. बराक ओबामांच्या काळात अनेक वर्ष चर्चा करून निघत आलेल्या तोडग्यावर पाणी फिरवलं. त्यांच्या या निर्णयाला युरोपियन देशांचा विरोध होता, पण आले ट्रम्प यांच्या मनी…

सुलेमानी हे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख होते. १९७९मध्ये इस्लामी क्रांती झाल्यावर इराणच्या धार्मिक राजवटीनं स्थापन केलेली ही लष्करी व्यवस्था. क्रांतीला धक्का पोहोचू नये, याची काळजी घेण्याचं कार्य या गार्डचे. पण या लष्कराचा कारभार फक्त इराणपुरता मर्यादित राहिला नाही. त्याने आसपास हातपाय पसरवले. सुलेमानी यांच्या हत्येमागे ही पार्श्वभूमी आहे. त्यासोबतच या भागातल्या शिया-सुन्नी अशा पंथीय तेढेचीही जोड आहे.

पर्शियन संस्कृतीचा अभिमान बाळगणारा इराण हा अरब देशांमध्ये गणला जात नाही. त्यात तो शियापंथी देश. एकूण अरब जगतामध्ये सुन्नी पंथाचे प्राबल्य असले, तरी काही ठिकाणी शियापंथी आहेत. सौदी अरेबिया हा सुन्नी पंथीय देशांचा म्होरक्या, तर इराण हा शिया पंथीय गटांचा. थोडक्यात, दोन वेगेवेगळ्या पंथाचे नेतृत्व करणाऱ्या दोन तेलसंपन्न देशांमधली ही धुमश्चक्री आहे.

या खेळाच्या एका गटाची सूत्र चेहऱ्यावरून सौम्य भासणाऱ्या कासिम सुलेमानी यांच्याकडे होती. विसाव्या शतकाच्या शेवटी अल कुडस म्हणजे रिव्होल्युशनरी गार्डसचं प्रमुखपद सुलेमानी यांच्याकडे आलं. त्यांच्याकडे प्रमुखपद आल्यावर पहिली उलथापालथ घडली होती होती, ती अमेरिकेनं सद्दाम हुसेन यांची राजवट नष्ट करण्याची.

इराणचा शेजारी असलेल्या इराकमध्ये सुन्नी आणि शिया या दोन्ही पंथाचे प्राबल्य. पण सद्दाम हुसेन यांच्या राजवटीपर्यंत सत्ता कायम सुन्नी पंथियांच्या ताब्यात होती. सद्दाम हुसेन सत्तेवर असेपर्यंत इराण आणि इराक एकमेकांना पाण्यात बघत. दोघांनी १९८० ते १९८८ असं दीर्घकाळ युद्ध खेळून बघितलं. त्यात दोघांनीही काही मिळवण्यापेक्षा गमावलंच जास्त होतं.

२००३ मध्ये अमेरिकेनं इराकवर हल्ला केल्यावर इराणचा सुंठीवाचून खोकला गेला. नंतर दोनच वर्षांनी २००५च्या निवडणुकांमध्ये शिया पंथीयांच्या ताब्यात इराकची सत्ता आली. तेव्हापासून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा इराकमधला हस्तक्षेप वाढला. अलीकडच्या काळात अमेरिकेला सुलेमानी यांचा इराकमधल्या या हस्तक्षेपाचा बंदोबस्त करायचा होता.

सुलेमानी यांनी २००८पासून पलेस्टाईनच्या लढ्यातल्या गटांना मदत करण्याचं कामही जोरात सुरू केलं. लेबनॉनमधल्या हेजबुल्ला आणि गाझा पट्टीतल्या हमास या प्रभावशाली गटांना इराणची मदत मिळू लागल्यावर इस्रायलची डोकेदुखी वाढली. त्यामुळेही सुलेमानी अमेरिकेच्या रडारवर होतेच.

२०११ मध्ये सुरू झालेल्या अरब क्रांतीच्या वादळापासून इराणचा पश्चिम आशियातल्या राजकरणातला सहभाग अधिकच वाढला. सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद हे शिया पंथातल्या अलवित या उपपंथातले. त्यांना क्रांती चिरडून टाकण्यासाठी इराणचा पूर्ण पाठिंबा मिळाला. त्या सहकार्याचेही शिल्पकार सुलेमानी होते. सिरियात आयसिसने धुमाकूळ सुरू केल्यावर तिच्या विरोधात सुरुवातीला सुलेमानीनी आघाडी उघडली होती.

सुलेमानी यांच्या कामांची यादी इथेच संपत नाही. त्यांनी अलीकडे अजून एक मोठं काम चालवलं होतं. तेही अरब जगतातल्या बलाढ्य अशा आणि अमेरिकेचा मित्र असलेल्या सौदी अरेबियाच्या विरोधात. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातलं छुपं युद्ध गेली चार वर्ष येमेनमध्ये चालू आहे. अरब क्रांतीचे वारे येमेनमध्ये पोहोचल्यावर २०१२ मध्ये अध्यक्ष सलेह यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. यानंतर मात्र येमेनमध्ये यादवीला प्रारंभ झाला.

या यादवीत सौदी अरेबियानं हूथी गटाच्या विरोधात युद्ध सुरू केलं. येमेनच्या उत्तर भागात प्रबळ असलेला हा गट शियापंथी. त्यामुळे त्याला सौदी अरेबियाचा कट्टर विरोध. पण गेली चार वर्ष युद्ध करूनही सौदी अरेबियाला म्हणावे तसे यश येत नाहीये. लाखो लोकांचा बळी जाऊनही परिस्थिति जैसे थे. याला कारण या हूथी गटाला इराणकडून मिळत असलेली भक्कम रसद. यामागेही सुलेमानी यांचेच कर्तुत्व.

२०१९ च्या सप्टेंबरात सौदी अरेबियाच्या अराम्को या जगातल्या मोठ्या तेलकंपनीवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यावर जगभरात खळबळ उडाली. या हल्ल्याची खरी सूत्र इराणनेच हलवली असल्याचा आरोप आखाती देश आणि अमेरिकेनं केला. यानंतर अमेरिकेकडून प्रत्युत्तर दिलं जाणार, अशी चिन्हं होतीच. पण इराण हा इराक किंवा लिबिया नव्हे. तो तेलसंपन्न तर आहेच, शिवाय त्याच्याकडे लष्करी सामर्थ्यही आहे. मुख्य म्हणजे, त्याच्या पाठीशी रशिया उभा आहे. इतकंच काय, त्याच्याशी युद्ध करायला युरोपीय देशांचा विरोध आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी सुलेमानी यांची हत्या करून इराणला इशारा देण्याचं कर्तब गाजवलं आहे.

सुलेमानी यांच्या हत्येनं सुन्नी राजवटीना हायस झालं असलं तरी शिया पंथीयातला रोष वाढला आहे. अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये घुसून ओसमा बिन लादेन याची हत्या केली. अलीकडे आयसिसचा प्रमुख बगदादीची हत्या केली. पण त्यांना जगानं दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. त्यांच्याच पंक्तीत अमेरिकेनं सुलेमानी यांना बसवलं, याचा संताप इराणला आणि पश्चिम आशियातल्या शिया पंथीयांना येणं साहजिक आहे.

सुलेमानी यांच्या हत्येनंतर आम्ही गप्प बसणार नाही, असं इराणनं जाहीर केलंच आहे. त्यावर ट्रम्प यांनीही त्यांच्या पद्धतीनं इराणला दम भरला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, युद्ध कुणालाच नको आहे. याच ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात जगाची देखरेख करण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही, असे सांगत मते पदरात पाडून घेतली होती. इराक आणि अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं.

पश्चिम आशियातले हे युद्ध पेटणार नसले तरी छुपे युद्ध, एकमेकांवर हल्ले पूर्वीसारखेच चालू राहतील. आधीच जागतिक स्तरावर सुरू असलेल्या मंदीत या अस्थिरतेची भर. असे काही झाले की खनिज तेलाचे भाव उसळी घेतात. त्यात आपल्यासारखे देश पोळतात. वेळोवेळी अशा भाववाढीला तोंड देणं, त्यासाठी उपाययोजना करणं हेच आपल्या देशाच्या हातात असतं.

(लेखिकेचे ‘धागे अरब जगाचे’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

via Qasem Soleimani Death : आखाती धुमश्चक्रीचा अर्थ – unrest in the middle east and qasem soleimani death | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s