उत्तरदायित्व आणि पारदर्शकता – महाराष्ट्र टाइम्स

उत्तरदायित्व आणि पारदर्शकता
सहकारी बँकांचे व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या हेतूने आणि त्यात उत्तरदायित्वाची व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ठराविक बँकांसाठी नवीन नियम बंधनकारक केले आहेत. ज्या सहकारी बँकांकडे १०० कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत, त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेमताना रिझर्व्ह बँकेची मंजुरी आवश्यक असणार आहे. सहकारी बँकांना संचालक मंडळासोबतच व्यवस्थापन मंडळाचीही नेमणूक करावी लागणार आहे. या आधी कर्ज वाटपाबाबत निर्बंध घालणारे नियम लागू केले होते. सध्या काही सहकारी बँकांच्या कारभाराविषयी ज्या चर्चा सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर या नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांमुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व निर्माण होईल का आणि भविष्यात सहकारी बँकांतील ठेवीदारांचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहील का, हा प्रश्न आहे. सहकारी बँका असोत वा अन्य वित्तीय संस्था, त्यातील पारदर्शकता फसवी असते आणि उत्तरदायित्वाबाबत काय बोलावे आणि काय नाही अशी परिस्थिती असते. ज्या रिझर्व्ह बँकेकडून लेखापरीक्षण केले जाते, त्याच्या परीक्षकांनाच जर ‘न दाखवलेले कर्ज’ दिसत नसेल, तर मग ते कोणाला दिसणार? आणि लेखापरीक्षणात ते दिसणार नसेल तर कुठे दिसणार? लेखापरीक्षणाचे कामच या छुप्या गोष्टी स्पष्ट करणे, त्रुटी उघड्यावर आणणे आणि ताळमेळ पुराव्यासह वास्तवदर्शी बनवणे हे असते. त्यामुळे मूळ प्रश्न वेगळा आहे आणि या निर्बंधामुळे तो किती सुटेल ही शंका आहे. इथे माहितीच्या असमानतेचा प्रश्न आहे. संचालक मंडळ कसे काम करते आणि ते आपल्या वित्तीय संस्थेला सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने काय काळजी घेते याची माहिती ठेवीदाराला हवी. तशी सोय सध्या नाही. कितीही पारदर्शकता आणली आणि तशी जाहिरात केली तरी ज्यांना आपण पारदर्शक किंवा परिपूर्ण माहितीने युक्त अशी वित्त अथवा बाजार व्यवस्था आणली तरी प्रत्यक्षात ती धूळफेक असते. कारण अशा कोणत्याही वित्तीय अथवा बाजार रचनेमध्ये कुठल्या तरी एका बाजूचा वरचष्मा असतो, असे अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. अशा व्यवस्था नेहमीच माहितीच्या, पारदर्शकेतच्या पातळीवर असमान असतात.

२००१ साली जॉर्ज एकरलॉफ, ए. मायकेल स्पेन्स आणि जोसेफ स्टिग्लीज यांना त्याबद्दल नोबेल पारितोषक मिळाले. यातून कामकाजातील पारदर्शकतेचा विषय ऐरणीवर आला तरी ते वास्तव बदलले नाही. जसा वाहन विक्रेता हा ग्राहकापेक्षा नेहमीच अधिक माहिती असलेला असतो, तीच गत आज सहकारी बँकांच्या ठेवीदारांची झालेली आहे. बँकांचे संचालक आणि ठेवीदार यांच्यातील नाते, त्यांच्यात होणारी माहितीची देवाणघेवाण आणि त्या बँकेच्या आरोग्याबाबत असलेली माहिती ही असमतोल आणि असमानच असणार आहे, असतेच. त्यावर ही माहिती सर्वत्र पोहोचवणे हा एक मार्ग आहे असे कितीही म्हटले तरी पीएमसी बँकेच्या निमित्ताने जे वास्तव पुढे येत आहे, ते पाहता या समस्येवर मार्ग कसा काढणार ही मोठी समस्या आहे. त्याबाबतीत हे नवनवीन निर्बंध सहकारी बँकांवर लादणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेलाही अद्याप सांगता आलेले नाही. पीएमसी बँकेचे प्रकरण याबाबत ठळकपणे चर्चेला घ्यायला हवे. कारण, आताची ही सगळी कायद्याने संरक्षण देण्याच्या नावाखाली आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी जी धावपळ सुरू आहे, ती केवळ पीएमसी बँकेच्या प्रकरणामुळे सुरू झाली आहे हे नाकारता येत नाही. याच्याही आधी अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या आणि ठेवीदार उघड्यावर पडले, पण त्यांचा कोणी वालीही नव्हता की त्याची चर्चाही नव्हती. त्यावर नियंत्रण ठेवणारी रिझर्व्ह बँकही त्यातून दिलासा देऊ शकली नाही की सहकार खातेही त्यांना वाचवू शकले नाही. ही असमान आणि एकतर्फी उद्ध्वस्तता अनेक वर्षे सुरू आहे. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आपला आंदोलन आणि न्यायालयीन लढाईद्वारे दबाव टिकवून धरलेला असल्यानेच या प्रश्नाची तड लावण्याची निकड निर्माण झाली आहे. त्यामुळे पारदर्शकता निर्माण करता येत नसेल तर निदान आपण उत्तरदायित्व तरी निर्माण करावे, असा विचार झालेला दिसतो. मात्र मानवी स्खलनशीलतेतून मोहाला बळी पडण्यापासून परावृत्त करण्यास असमर्थ असलेली कायदा व्यवस्था, संरचनात्मक त्रुटी, खोटी लेखापरीक्षणे अथवा भ्रष्ट लेखा आचार याने वेढलेल्या या क्षेत्राला लागू केलेले निर्बंध जनतेच्या ठेवींचे संरक्षण किती करू शकतील, याबद्दल म्हणूनच शंका आहेत.

via Editorial News: उत्तरदायित्व आणि पारदर्शकता – accountability and transparency | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s