अर्थव्यवस्थेला संजीवनी – महाराष्ट्र टाइम्स

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, देशातील सर्वाधिक चिंतेची बाब असलेली आर्थिक मंदी सावरण्यासाठी नव्याने संजीवनी गुटी पाजण्याचा इरादा स्पष्ट करीत नवीन वर्षाच्या शुभेच्छाच दिल्या. तब्बल एक लाख दोन कोटी रुपयांच्या महागुंतवणूक योजनांची घोषणा करत त्यांनी आर्थिक स्थिती बदलण्याबाबत आत्मविश्वास दाखवला. ही गुंतवणूक पाच वर्षांत करावयाची आहे. या गुंतवणुकीचे अद्याप बरेच तपशील यायचे बाकी असले तरी या घोषणेनुसार निदान सरकार देशात आर्थिक मंदी आहे हे मान्य झाले आहे, हेही नसे थोडके. कोणत्याही समस्येवर मार्ग काढायचा असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे ती समस्या मान्य व जाहीर करणे होय. सध्याच्या मंदीचा अंदाज घेता आणि देशातील आणि परदेशातील अर्थशास्त्रज्ञांनी वर्तवलेले ही आर्थिक मंदी अजून भीषण रूप धारण करेल, हे अंदाज पाहता अशी भरीव गुंतवणूक आवश्यक ठरते. पायाभूत सुविधांतून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतून अनेक प्रकारचे लाभ होतात. या गुंतवणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या स्वप्नांना अधोरेखित करण्यासाठी वापरले जात असले तरी सध्याच्या चटके देणाऱ्या परिस्थितीपुढे श्रेयाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणेच योग्य. कारण काळाची गरज देशाची आर्थिक स्थिती कोमात जाण्यापासून वाचवण्याची आहे. आणि अशा विशाल गुंतवणूक योजनांतून, पायाभूत सुविधा निर्माण करण्यातूनच देश मोदींच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या तरी आताची असह्य परिस्थिती काही अंशी तरी सुसह्य करण्याची गरज आहे, ते या गुंतवणूक योजनेच्या अंमलबजावणीतून साध्य होईल. अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते देशातील मंदीवर हाच खरा उपाय असतो. या पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीतून अनेक रीतींनी आर्थिक आघाड्यांवर देश पुढे जाऊ शकतो. एकतर असे प्रकल्प रोजगाराच्या निर्मितीच्या संदर्भात अत्यंत भरवशाचे असतातच, शिवाय त्यांचे दीर्घकालीन स्वरूप पाहता त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या दर्जाचे आणि बहुविधतेचेही समांतर लाभ मिळतात. केवळ या कारणास्तव अर्थमंत्र्यांच्या या गुंतवणूक योजनांचे कौतुक मर्यादित नाही. या घोषणेचा सर्वप्रथम लाभ आहे तो गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास वाढण्याचा. अर्थव्यवस्थेत सहभागी होण्याची मानसिकता त्यातून तयार होईल. तसेच, योग्य त्या क्षेत्रांवर या गुंतवणुकीचा भर देण्यात आल्याने या योजनांचे अल्पकालीन तसेच दीर्घकालीन फायदेही मिळतील. बांधकाम उद्योग हा आर्थिक घडामोडींत जान आणतो. त्यात मोठ्या प्रमाणात हालचाली व्हायला सुरुवात होईल.

येत्या पाच वर्षांत या क्षेत्रातील मरगळ पूर्णपणे दूर होऊन त्याला सुगीचे दिवस येऊ शकतात. राष्ट्रीय पाईपलाईन योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तिची आवश्यकता आणि दीर्घकालीन फायदे पाहता, त्यातून सरकारला आपले ध्येय साधेलच. शिवाय, ती योजना गुंतवणूकदारांसाठीही आकर्षक आहे. रस्तेबांधणी हेही क्षेत्र या नवीन घोषणेच्या माध्यमातून अधिक विस्तारू शकेल. या गुंतवणुकीमुळे आर्थिक घडामोडींना चालना मिळेल, पैसा खेळू लागेल, रोजगार निर्माण झाल्याने वस्तू व सेवांची मागणी वाढेल. त्यातून आर्थिक घडामोड अधिक वेग धारण करू लागेल आणि दर वर्षगणिक हा वेग वाढून अर्थव्यवस्था दोन-तीन वर्षांत धावू शकेल. या महत्त्वाकांक्षी योजनांच्या घोषणेचे स्वागत करतानाच त्याच्या अंमलबजावणी आणि त्यासाठीच्या निधी उभारणीच्या दृष्टीने असेलेली आव्हानेही लक्षात घ्यायला हवीत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला धोरणांत सुस्पष्टता आणायला लागेल आणि सातत्य ठेवावे लागेल. तसेच, गेल्या तीन दशकांत वापरलेल्या बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर काम करण्यास खासगी क्षेत्र पूर्वीप्रमाणे उत्सुक नाही, या वास्तवाची दखल घेत त्यावर पर्यायी मार्ग निर्माण करावे लागतील. अशा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा पैसा हा खासगी क्षेत्रातून उभा करावा लागेल. त्यात कर्ज आणि भागीदारी या दोन्ही पातळीवर सहभागी होण्याची क्षमता परदेशी कंपन्यांमध्ये असल्याने त्यांना राजी करावे लागेल. कारण, खासगी क्षेत्राला गुंतवणुकीचा २२ टक्के एवढाच हिस्सा असला तरी उरलेल्या गुंतवणुकीतही त्यांना सहभागी करून घ्यावे लागेल. कारण, विविध राज्यांनी उर्वरीत ७८ टक्के गुंतवणुकीपैकी निम्मा आर्थिक बोजा केंद्रासोबत उचलायला हवा, हे त्यात गृहित आहे. केंद्र सरकारला त्यासाठी राज्य सरकारांना सोबत घ्यावे लागेल. बँकांची नाजूक स्थिती पाहता हे सातत्यपूर्ण निधीपुरवठ्याचे आव्हान सोपे नाही.

via Editorial News: अर्थव्यवस्थेला संजीवनी – revitalizing the economy | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s