गमते मानस उदास.. |लोकसत्ता


विचलित किंवा उद्विग्न मनांची माणसे स्वत:चा विकास घडवू शकत नाहीत आणि अशा माणसांचा समूह देशाचाही विकास घडवू शकत नाही..

मानसिक आरोग्याची समस्या गंभीर आहे, त्यामुळे ती सोडविणे हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असायला हवा. मात्र, अशा मानसिक आरोग्याच्या प्रश्नांनी ग्रस्त समाजघटकांची पुरेशी माहिती सरकारकडे उपलब्ध नाही आणि संपूर्ण देशात मानसिक आजारांवरील उपचारांकरिता जेमतेम ४३ रुग्णालये आहेत..

दृश्य अवयवांपुरता विचार करावयाचा झाला, तर मन ही केवळ एक संकल्पनाच आहे. कारण मन नावाचा अवयव दिसतही नाही आणि दाखविताही येत नाही. परंतु हेच मन मेंदूचा ताबा घेते आणि प्रत्येकाच्या जगण्याचा, जीवनाचा मार्ग आखून देते. म्हणूनच मनावर ताबा असलेला समाज सुसंस्कृत आणि समंजस समजला जातो. असा समाज ज्या देशात असतो, तो देशही वैचारिकदृष्टय़ा संपन्न असतो. विचलित किंवा उद्विग्न मनांची माणसे स्वत:चा विकास घडवू शकत नाहीत; अशा माणसांचा समूह देशाचाही विकास घडवू शकत नाही. म्हणून मनाची मशागत व्हायला हवी. कारण मशागत न झाल्याने बिथरलेल्या मनांचा समाज विनाशास कारणीभूत होऊ शकतो. सध्या आसपास जे काही सातत्याने घडत असते, त्यातील बऱ्याचशा गोष्टी मन विचलित करणाऱ्याच असल्यामुळे मनावर ताबा ठेवणे किंवा मन ताळ्यावर ठेवणे आणि मनाचा विकास घडविणे, ही तारेवरची कसरतच होऊ लागली आहे. आणि तीच साधत नाही अशी कमकुवत मनेच अधिक असल्याने, मानसिक आरोग्याची समस्या उभ्या जगाला भेडसावू लागली आहे.

ही समस्या एवढी गंभीर असेल, तर ती सोडविणे हा सर्वोच्च प्राधान्यक्रम असायला हवा. अगदी सरकार नावाची यंत्रणादेखील या समस्येच्या वाढत्या आक्रमणामुळे चिंतित असल्यासारखी दिसते. कारण भविष्यातील नागरिकांची पिढीदेखील या समस्येच्या विळख्यात सापडली आहे. पाच-सहा वर्षांपासून विशीच्या उंबरठय़ापर्यंतच्या मुलांची मनेही नैराश्य आणि तणावासारख्या समस्यांच्या विळख्यात सापडू लागली आहेत. हे असेच चालत राहिले, तर देशाच्या भावी पिढीच्या अंगी कोणत्याच आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी राहणार नाही, हे स्पष्ट आहे. तरीही, मानसिक आरोग्याची मशागत करण्यासाठीच्या सरकारी योजना मात्र तोकडय़ाच आहेत. मुळात अशा समस्याग्रस्त बालकांचा किंवा समाजघटकांचा कोणताही तपशील केंद्र सरकारकडे नाही, ही बाब वारंवार उघड झालेली आहे. मानव संसाधन विभाग अशी कोणतीच माहिती गोळा करत नाही, हे केंद्र सरकारने लोकसभेत काही चर्चाच्या वेळी स्पष्टपणे नमूद केले आहे. बंगळूरुमधील जवाहरलाल नेहरू नवोदय विद्यालयातील दोन मुलांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले आणि केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या मनांची मशागत करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरविले. मानसिक तणावामुळे आत्मविश्वास हरवलेल्या त्या दोन मुलांना त्या वर्षी परीक्षेस बसता आले नाही, हे ऐकून पंतप्रधानांचे मन कळवळले आणि त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन ‘परीक्षा पे चर्चा’ नावाचा एक ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ मुलांसमवेत घडवून आणला.

पण अशा एखाद्या सरकारी सोहळ्याने ही समस्या मिटणारी नाही. कारण मानसिक आरोग्य ही समस्या झालेली आहे, हे स्वीकारण्याएवढी मनांची मशागतच झालेली नाही. परिस्थितीचा रेटा एवढा भयंकर आहे, की त्याला तोंड देताना पालकवर्ग मेटाकुटीस येतो आणि त्यातच एवढा गुंतून पडतो की मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास त्याला वेळही नाही. बिघडलेले मन:स्वास्थ्य हा मुलांचा आजार आहे व त्यावर उपचारांची गरज आहे, हे लक्षात येईपर्यंत आजार बळावलेला असतो आणि हाच आजार पुढे समस्या म्हणून डोके वर काढतो. ताणतणाव, औदासीन्य आणि उद्विग्नता या गोष्टी आपोआप मनाचा ताबा घेत नसतात. आर्थिक विवंचना, असुरक्षिततेची भावना, अपुरेपणाची खंत, नाकारलेपणा, गरिबीचा गंड आणि सामाजिक स्तर अशा अनेक बाबींमुळे मनाची मशागत खुंटते, आत्मविश्वासाला तडे जातात, आणि वैफल्य वाढते. त्याचा परिणाम थेट मुलांच्या मनांवर होतो, आणि पुढच्या पिढीला कवेत घेण्यासाठी ही समस्या आपले हातपाय पसरू लागते. तरीही, मानसिक विकाराने आपल्याला ग्रासले आहे, हे सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी होत नाही. मुळातच या समस्येवरील उपायांची आपल्याकडे वानवा आहे. केंद्र सरकारकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाहीच; पण जी काही माहिती सरकारकडून दिली जाते, त्यानुसार संपूर्ण देशात अशा आजारांवरील उपचाराकरिता जेमतेम ४३ रुग्णालये आहेत. मानसिक आरोग्याची मशागत करणाऱ्या तज्ज्ञांचा तुटवडा, अभ्यासपूर्ण उपचार पद्धतीचा अभाव, आजाराचे निदान करण्याची तोकडी यंत्रणा अशा अनेक बाबींमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या थोपविण्याचे उपाय तोकडे पडले आहेत.

ज्या दीर्घकालीन अवस्थेत व्यक्तीस एकंदर समाधानी वा सुखी जगण्याचा अनुभव येत असतो, त्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य उत्तम आहे असे मानले जाते. तशी अवस्था कोणत्याही समाजात कधीच नसते. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारें मना तूचि शोधूनि पाहे’ असे म्हणणारे समर्थही शेवटी सुखी माणसाचा शोध घेण्याची जबाबदारी मनावरच टाकतात, आणि विचलित मनांना सुखाचा शोध घेणे शक्यच होत नाही. ती सुखाच्या शोधात भिरभिरत राहतात. सैरभैर होऊन अधिक विचलित होतात. मग अशा मनांच्या माणसांचा आत्मविश्वास हरवतो. स्वत:तील उणिवा शोधण्याची, संकटे किंवा आव्हानांना तोंड देण्याची उमेदही संपते; आणि सगळ्याच्या परिणामी जीवनमूल्ये हरवतात. मग जीवनशैली भरकटते, आणि अशा भरकटलेल्या जीवनशैलीने भारलेला समाज हीच एक व्यापक समस्या होऊन जाते. कौटुंबिक नातेसंबंधांवरही याचा विपरीत परिणाम होतो. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास तर त्याच्या नातेसंबंधांतून, संवादातून घडत असतो. तोच खुंटतो, आणि मुले औदासीन्याच्या गर्तेत भरकटू लागतात. मग दीर्घ असंतुष्टता, सामाजिक वर्तनातील सभ्यतेचा अभाव, अनिवार्य अशा वाईट सवयी, व्यसने असे विकार बळावतात आणि अविश्वासाचे वातावरण तयार होते.

मात्र, आपल्याकडे अजूनही या विकाराच्या भीषणतेची जाणीव पूर्णपणे समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पसरलेली नाही. ग्रामीण भागात अशा आजारांची चिन्हे दिसू लागली, की भुताने झपाटले, करणी केली, जादूटोणा झाला असे आजही समजले जाते. मग आजारांवर योग्य उपचार होतच नाहीत. तणाव, नैराश्य किंवा मानसिक अस्थिरता यांच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तीवर औषधांच्या उपचारापेक्षा माणुसकीपूर्ण व्यवहारांची मात्रा अधिक जलद लागू होते, हे उमगण्यात आपल्या उपचार पद्धतीस विलंब झाला आहेच; पण माणुसकीपूर्ण व्यवहार ही संकल्पनादेखील आजकाल महाग होत चालली आहे. अफाट गर्दी आसपास असूनही एकटेपणाचे भय मनामनांवर दाटलेले असणे ही नवी समस्या निर्माण होऊ  पाहात आहे. सोबतीची भावना, दिलाशाचा स्पर्श आणि प्रगतीसाठीचे उत्तेजन यांचा अभाव वाढू लागला आणि नैराश्याच्या भावनेस खतपाणी मिळत गेले. ही ‘गमते मानस उदास’ अशी परिस्थिती होण्यास जबाबदार कोण, हे शोधण्याचीही तयारी नसलेला समाज हे या समस्येचे मूळ आहे. ते उपटून टाकण्यासाठी आधी वास्तवाची जाणीव व्हायला हवी.

उदास.. | Loksatta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s