बेजबाबदार हाताळणी–महाराष्ट्र टाइम्स

बेजबाबदार हाताळणी
कोलकाता येथून आठवड्यापूर्वी सुरू झालेले कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन हळुहळू विस्तारत देशभर पोहोचले असून त्यामुळे रुग्णसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. वैद्यकीय सेवेतील कोणत्याही एका घटकाने आंदोलन सुरू केले तरी रुग्णसेवेचा बोजवारा उडतो, त्यासाठी सगळ्यांनीच संप करण्याची आवश्यकता नसते. परिचारिकांचा संपही रुग्णसेवा कोलमडण्यास पुरेसा ठरत असतो. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील लोकांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांनी अधिक काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असते. त्यातही पुन्हा ज्या राज्याचा केंद्र सरकारशी राजकीय संघर्ष सुरु आहे, ज्या राज्यात आधीच कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर असल्याचे भासवले जात आहे अशा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी छोट्या छोट्या प्रश्नांबाबत अधिक सजग आणि संवेदनशील असायला हवे. सतत त्रागा आणि थयथयाट करून काही साध्य होत नाही आणि सत्तेचा अमर्याद वापर करून सगळे प्रश्न सुटत नाहीत, हे एव्हाना ममता बॅनर्जी यांना कळायला हवे होते. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे विचलित झाल्यामुळे त्यांचा आक्रस्ताळेपणा वाढल्याचे चित्र गेल्या काही दिवसांमध्ये दिसत आहे. खरेतर अशा परिस्थितीत अत्यंत शांतपणे आणि थंड डोक्याने विचार करून परिस्थितीचा मुकाबला करण्याची गरज असताना त्या अधिक आक्रमकपणे वागून विरोधकांना संधी उपलब्ध करून देत आहेत. डॉक्टरांचा चिघळलेला आणि देशभर पसरलेला संप हा त्यांच्या चुकीच्या हाताळणीचाच परिपाक आहे. आठवडा उलटत आला तरी त्यापासून काही धडा घेण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेल्या ममता बॅनर्जी यांचा पाय अधिकच खोलात चालला आहे. डॉक्टरांच्या या आंदोलनाला सुरुवात झाली गेल्या सोमवारी. कोलकाता येथील नील रतन सरकार मेडिकल कॉलेज हॉस्पिटपासून (एनआरएस) आंदोलन सुरू झाले. एनआरएस हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर दोन ट्रकभरून लोक आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एका कनिष्ठ डॉक्टरला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांना मारहाणीच्या घटना यापूर्वीही अनेकदा देशाच्या विविध भागात घडल्या आहेत आणि त्या त्यावेळी संबंधित घटकांनी आंदोनाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एनआरएस हॉस्पिटलमधील घटनेनंतर त्याठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण शहरातील अन्य हॉस्पिटलमध्ये, नंतर राज्यात आणि पुढे संपूर्ण देशभर फैलावले. मुंबईसह बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, चंदीगडमध्येही डॉक्टरांनी काम बंद आणि निदर्शने केली. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी डॉक्टरांचा देशव्यापी बंद पुकारला आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्याची दखल न घेता डॉक्टरांना कामावर हजर न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला त्यामुळे आंदोलन अधिक चिघळले. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधले वातावरण तापवायला सुरूवात केली होती, त्याचा लाभ त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आहे. आता त्यांचे लक्ष्य विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचे असून त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. रोज नव्या विषयाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील वातावरण चिघळत ठेवण्यात भारतीय जनता पक्षाला अर्थातच रस आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या संपाबद्दलच्या ममता बॅनर्जी यांच्या ताठर भूमिकेच्या निमित्ताने भाजपला आयती संधी मिळाली. डॉक्टरांवर कारवाईचा इशारा देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विनाअट माफी मागावी, अशी मागणी संपकरी डॉक्टरांनी केली. यातील आणखी एक नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे ज्या लोकांनी डॉक्टरांना मारहाण केली, ते मुस्लिम समुदायाचे होते, त्यामुळे त्याचे राजकीय भांडवल करण्याची आयतीच संधी मिळाली. ममता बॅनर्जी यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि सध्याचे भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी आगीत तेल ओतण्याची संधी घेतली नसती तरच नवल ! तृणमूल काँग्रेसचे समर्थक असलेल्या विशिष्ट समुदायाच्या लोकांनी हा हल्ला केला असल्याचे विधान करून त्यांनी प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला. असे प्रयत्न होत राहणार हे लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनी संबंधित घटकांशी सौहार्दपूर्ण चर्चा करून प्रश्न सोडवणे आवश्यक होते. परंतु तेवढी प्रगल्भता त्यांनी दाखवली नाही त्यामुळे आंदोलन चिघळत चालले आहे. डॉक्टरांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षितता पुरवायलाच पाहिजे. डॉक्टरांना मारहाणीचा गुन्हा अजामीनपात्र करण्याबरोबरच संबंधितांना कठोर शिक्षेचा कायदाही करायला पाहिजेच. परंतु त्यासाठी रुग्णसेवा वेठीला धरण्याचे आणि संपाच्या निमित्ताने राजकारणाचा भाग बनण्याचे समर्थन मात्र करता येणार नाही.

via Editorial News: बेजबाबदार हाताळणी – irresponsible handling of doctors’ agitation against an incident of assault on an intern | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s