पुन्हा गरिबी हटाओ! -अग्रलेख -महाराष्ट्र टाइम्स

पुन्हा गरिबी हटाओ!
एक धनादेश दोनवेळा वठविला जाऊ शकत नाही. ‘गरिबी हटाओ‘ ही घोषणा मात्र जुनेच स्वप्न लेऊन दुसऱ्यांदा पुढे आली आहे. कर्तव्यकठोर म्हणून ओळख असलेल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याच घोषणेचा पुनरुच्चार नातू राहुल गांधी यांनी केला आहे. गरिबांना किमान ७२ हजार रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचे जाहीर आश्वासन त्यांनी दिले. आम्ही आणलेली योजना जगाच्या पाठीवर कुठेही नाही, असा त्यांचा दावा आहे. मागच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या स्वप्नांनुसार, प्रत्येक बँक खात्यात १५ लाखांची रक्कम येऊ शकत होती. काँग्रेसचे सरकार आल्यास प्रत्येकी ७२ हजार रुपयांचे वार्षिक अर्थसाह्य गरिबांच्या खात्यात जमा होणार आहे. २५ कोटी लोकांना जगण्याची हमी देणारी ही महत्त्वाकांक्षी घोषणा आहे. त्याची अंमलबजावणी अर्थातच नव्या सरकारच्या स्थापनेवर अवलंबून असेल.

हा देश राकट आहे की कणखर? कनवाळू आहे की करारी? यावर अनेकदा साहित्यिकांच्या चर्चा होतात. हा देश स्वप्नांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचा आहे ही वास्तविकता मात्र सर्वांना पटावी. स्वप्नांच्या सौद्यांची भारतात मुळीच टंचाई नाही. निवडणुका हा स्वप्नांच्या घाऊक विक्रीचा काळ. देशात पन्नास टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली होती तेव्हाही हे सौदे चालत. तुलनेने आता जनता समजूतदार झाली आहे. विचार करू लागली आहे. जाणिवांचा दुष्काळ संपला नसला तरी प्रतिक्रियांचा पाऊस सदोदित सुरू असतो. नेत्यांच्या नियोजनातून आणि मतदारांच्या मनातून कधीही हद्दपार न होणारा घटक म्हणजे गरीब. सामान्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याची आवाहने, आश्वासने या देशाने अनेकदा बघितली. ती पूर्ण न झाल्याने सामान्यांच्या पंचवार्षिक आकान्तालाही आता अपरिचित ठरविता येणार नाही. प्रत्येक निवडणुकीत घोषणा येतात. नावात थोडाफार बदल असतो. देशात अंदाजे २२ टक्के नागरिक गरिबीच्या रेषेखाली आहेत. ‘न्यूनतम आय योजना’ लागू झाली तर खऱ्या अर्थाने गरिबांना ‘न्याय’ मिळेल. ही दूरगामी योजना राबविण्यासाठी वार्षिक साडेतीन लाख कोटी रुपयांची तजवीज मात्र करावी लागेल. अम्मा कॅण्टिन, माध्यान्ह भोजनासारख्या योजनांनी गरीब मतदारांना आकर्षित करण्याचे काम केले. भूकबळीच्या बातम्या थांबविणाऱ्या विकासाच्या आलेखाची मात्र अद्यापही प्रतीक्षा आहे. इंदिरा गांधीच्या काळात अधिक आव्हाने होती. स्वपक्ष फुटीने ग्रासला असताना १९७१ च्या निवडणुका ‘गरिबी हटाओ’ ही घोषणा देऊन त्यांनी जिंकल्या. तेव्हा गाय-वासरू हे चिन्हही नवे होते. घोषणांसोबत घाम गाळण्याची तयारी हवी असते. अंदाजे तीनशे सभा घेऊन तेव्हा इंदिरा गांधींनी देश पिंजून काढला. तेव्हा महागाईचा धोषाही वाढला होता. आंदोलने सुरू होती. गरिबी हटविण्याचे तीन मुख्य कार्यक्रम घेऊन पाचव्या पंचवार्षिक योजनांमध्ये गरिबीच्या निर्मूलनाचे स्वप्न दाखविण्यात आले. या सत्ताकाळाचा शेवट पुढे आणीबाणीने झाला हा भाग वेगळा. गरिबांना गळ घालणे त्यानंतरही थांबले नाही. पुन्हा सत्तेत आलेल्या काँग्रेसने वीस कलमी कार्यक्रम आणला. ‘इंदिरांना गरिबी हटवायचीय की गरीब’ हा सवाल विरोधी नेते वारंवार करीत राहिले. ना गरिबी हटली, ना गरीब!

अलीकडे २०२२ पर्यंत गरिबी हटविण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार मोदी सरकारनेही केला. या देशातील अन्नधान्याचा काळाबाजार आपण आजही थांबवू शकलेलो नाही. स्वस्त धान्य दुकानांची यंत्रणा भ्रष्टाचाराने गिळंकृत केली आहे. विविध लोकानुनयी योजनांद्वारे गरिबांपुढे दोन वेळच्या भोजनाची ददात मिटविण्याचे ताट वाढण्यात आले. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने कष्टकरी, कामागारांची रोजच्या जगण्याची त्रेधा संपलेली नाही. एकीकडे विपुल धान्यनिर्मितीचे ईप्सित गाठू शकलेलो नसताना, अन्नधान्यांच्या गोदामांमधील नासाडीवरही अंकुश लागलेला नाही. योजनांच्या भाऊगर्दीनंतरही विविध समित्यांची स्थापना आणि नियोजनातील फेररचनांचा क्रम धडाक्यात सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या नव्या घोषणेने काम साधले जाईल, असे नाही. त्यांना आजीसारखी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. आज तीनशे सभा घेण्याची इच्छाशक्ती कोणकोणत्या काँग्रेसजनांमध्ये आहे, हे एकदा तपासावे लागेल. आभासी प्रचाराच्या भरवशावर गरिबीची अपेक्षित मात्रा कामी येईल, या भ्रमात राहता येणार नाही. तसाही अद्याप ना ‘जात पर ना पात पर’चा उद्‌घोष संपला, ना प्रचारातील विद्वेष. सरकारे बदलली तरी बलाढ्य उद्योजकांचे काम अडत नाही. नवनव्या योजनांची श्रीमंती वाढते आहे. ‘गरिबी हा अलंकार आहे, स्वाभिमान जोपासा’ हा संदेश मतदारांनी मनात जपायला हवा. मतदानाचा टक्का वाढला तरच गरिबीचा टक्का कमी होईल, हे तथ्य कदापि विसरून चालणार नाही.

via Editorial News: पुन्हा गरिबी हटाओ! – congress for garibi hatao | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s