| उदार आणि उदात्त –अबू धाबीत झालेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेतील सुषमा स्वराज यांचा सहभाग हा बौद्धिक आनंद देणारा होता.–लोकसत्ता

गेल्या आठवडय़ात पाकिस्तानच्या नाजायज आणि नतद्रष्ट उद्योगांमुळे एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेकडे आपले दुर्लक्ष झाले. भारतीय वैमानिक अभिनंदन यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका होणार होती त्याच दिवशी तिकडे संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे ही घटना घडत होती. ती म्हणजे इस्लामिक देशांची परिषद आणि तीमधील भारताचा सहभाग. या परिषदेत काय घडले याचा ऊहापोह करण्याआधी या परिषदेच्या दृश्य परिणामांचा विचार करायला हवा.

इस्लामबहुल असे ५७ देश या परिषदेचे सदस्य. त्यातील ५६ जणांची अबू धाबीत या परिषदेसाठी हजेरी. त्यात अनेक अरब आणि मुख्य म्हणजे बव्हश: पुरुषच. या सर्व देशांची सामाजिक स्थिती पाहता त्या देशात स्त्री-पुरुष समानतेस किती महत्त्व असेल हे सांगावयाची गरज नाही. तेव्हा अशा या पुरुषप्रधान, पुरुषकेंद्री, पौरुषी परिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची उपस्थिती, त्यांचे भाषण आणि त्यातील संदेश हे सारेच भारताचे मोठेपण अधोरेखित करणारे. दुर्दैवाने ते तसे झाले नाही. कारण भारतीय वैमानिकाची सुटका अपेक्षेपेक्षा लांबली. त्यात नाटय़ होते आणि चिंताही होती. पाकिस्तान खरोखरच अभिनंदनची सुटका करेल किंवा काय, ही हुरहुरदेखील होती. त्यातील नाटय़पूर्णतेमुळे वाघा सीमेवर कॅमेरे रोखून बसलेल्या वाहिन्यांकडे आणि निवेदकांच्या बाष्कळ बडबडीकडे समस्त देश नजर ठेवून होता. युद्धस्य कथा रम्या असल्यामुळे अनेक देशप्रेमींना ते अधिक आकर्षक वाटले असल्यास आश्चर्य नाही. परंतु वाघा सीमेइतकी नाही तरी त्याखालोखाल उत्कटता अबू धाबी येथील परिषदेतील घडामोडींत होती. संपूर्ण पुरुषधार्जिण्या, धार्मिक अतिरेकासाठी ओळखल्या जाणाऱ्या देश प्रतिनिधींच्या गराडय़ात भारतीय वेशात आणि आभूषणांत स्वत:स सादर करणाऱ्या सुषमा स्वराज या अन्य पुरुष प्रतिनिधींचे लहानपण दाखवून गेल्या. त्यातही पुन्हा हिंदुत्ववादी विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाचे सरकार असताना पन्नास वर्षांनंतर भारताला इस्लामधार्जिण्यांच्या परिषदेत सहभागी व्हायची संधी मिळावी ही बाबदेखील आवर्जून लक्षात घ्यावी अशी. ती लक्षात घ्यावयाची याचे कारण तीमधून भारताचे खरे मोठेपण ठसठशीतपणे समोर येते.

त्याचबरोबर पाकिस्तानचे छोटेपणही त्यातूनच दिसते. वास्तविक पाकिस्तान या परिषदेचा संस्थापक सदस्य. पन्नास वर्षांपूर्वी या परिषदेने जेव्हा भारतास सहभागाचे निमंत्रण दिले त्या वेळी पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल याह्य़ा खान यांनी थयथयाट केला. आजच्याप्रमाणे त्याही वेळी भारतात वास्तव्यास असणाऱ्या मुसलमानांची संख्या लक्षणीय होती आणि या परिषदेस भारताने हजेरी लावल्याने त्यांच्या हितास काहीही बाधा येणार नव्हती. तरीही पाकिस्तानने भारताच्या सहभागाविषयी आक्षेप नोंदवला. त्या वेळी खरे तर पाकिस्तान अखंड होता. बांगलादेश युद्ध व्हावयाचे होते. पण तरीही भारताने या परिषदेस हजेरी लावणे पाकिस्तानला मंजूर नव्हते. तो जगातील सगळ्यात मोठा इस्लामी देश. तेव्हा त्या परिषदेत पाकिस्तानच्या भूमिकेस महत्त्व असणे साहजिकच. त्याचमुळे याह्य़ा खान यांनी घेतलेल्या हरकतीमुळे या परिषदेतून भारतास अंग काढून घ्यावे लागले. त्यानंतर आजतागायत या इस्लामी देशांच्या मंचावर भारतास स्थान नव्हते.

यंदा ते मिळाले. याही वेळी पाकिस्तानने हरकत घेतली. पन्नास वर्षांपूर्वी केले त्याप्रमाणे याही वेळेस भारत सहभागी झाला तर आपण बहिष्कार घालू अशी भूमिका पाकिस्तानने घेतली. त्या वेळी पाकिस्तानच्या ताठरतेमागे होते भारताचे एकूणच मोठेपण. ते पाकिस्तानला कधीच पाहवले नाही. अशा वेळी स्वत: मोठे होण्याचा मोठा मार्ग पत्करण्याऐवजी भारताला लहान लेखण्याच्या क्षुद्र प्रयत्नात पाकिस्तान राहिला. याही वेळी तेच घडले. पुलवामातील दहशतकांड आणि त्यानंतर भारताने दिलेले बालाकोट प्रत्युत्तर यामुळे पाकिस्तान अस्वस्थ असणे साहजिक होते. पण ही स्वनिर्मित अस्वस्थता. तिचा संबंध इस्लामी परिषदेतील भारताच्या सहभागाशी जोडण्याचे काहीच कारण नव्हते. पण तरीही पाकिस्तानने हा उद्योग केला. पन्नास वर्षांपूर्वीप्रमाणे याही वेळी भारताच्या सहभागाविरोधात बहिष्काराची धमकी दिली. तथापि पन्नास वर्षांपूर्वी घातली गेली तशी भीक या वेळी इस्लामी परिषदेने पाकिस्तानला घातली नाही. ही बाब आपले मोठेपण अणि पाकिस्तानचे लघुत्व दाखवून देणारी. संस्थापक सदस्य असूनही पाकिस्तानच्या त्राग्याविरोधात कणखर भूमिका या परिषदेने घेतली. पाकिस्तानचे म्हणणे होते या परिषदेसाठी भारतास दिलेले निमंत्रण मागे घेतले जावे. तसे ते घेतले नाही तर आपण बहिष्कार घालू अशी पाकिस्तानची धमकी. निमंत्रण मागे घेतले जाणे तसे आपणास नवीन नाही. तरीही आपल्या पावलावर पाऊल न टाकता, पाकिस्तानच्या धमकीस बळी न पडता संयुक्त अरब अमिरातीने भारताला दिलेले निमंत्रण मागे घेतले नाही. परिणामी पाकिस्तानने या परिषदेवर बहिष्कार घातला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महंमद कुरेशी या परिषदेस आले नाहीत. आणि आपल्या सुषमा स्वराज यांनी मोठय़ा झोकात, पाकिस्तानचा उल्लेखही न करता भारताचे मोठेपण सप्रमाण दाखवून दिले.

त्यासाठी त्यांनी आधार घेतला तो इस्लामला पवित्र असलेल्या कुराण या धर्मग्रंथाचा. त्यातील शांततेची शिकवण, इस्लाम या शब्दाचा अर्थच शांतता असा असणे आणि त्यास त्या धर्माच्या अनुयायांकडून फासला जाणारा हरताळ हा स्वराज यांच्या भाषणाचा गाभा. त्याआधारे विवेचन करताना त्यात कोठेही आक्रस्ताळेपणा नव्हता की नाटय़पूर्णता नव्हती. महत्त्वाची बाब म्हणजे या परिषदेचा मंच आपली वक्तृत्व कला सिद्ध करण्यासाठी नाही, याची पूर्ण जाणीव त्यांना होती आणि संपूर्ण परिषदेत ती कोठेही सुटली नाही. ही बाब फारच महत्त्वाची. तिच्या अभावी ‘पायलट प्रोजेक्ट’सदृश वाक्चातुर्याचा मोह होतो. तो अप्रस्तुत आणि अस्थानी आहे याचीही जाणीव राहत नाही. सुषमा स्वराज यांचे तसे काही झाले नाही. संथ लयीत, पूर्ण अदबीने त्यांनी आपले लिखित भाषण सादर केले आणि अत्यंत अभ्यासूपणे पाकिस्तानच्या तंगडय़ा त्याच देशाच्या गळ्यात अडकवल्या. भारतात १८.५ कोटी मुसलमान आनंदाने राहत असून भारताच्या समाजजीवनात ते पूर्णपणे मिसळलेले आहेत, हे त्यांनी आपल्या भाषणात सोदाहरण स्पष्ट केले. या साडेअठरा कोटी मुसलमानांतील जेमतेम १०० जण आयसिससारख्या इस्लामी दहशतवादी संघटनांत सहभागी झाले, हे त्यांचे प्रतिपादन मुसलमानांची या देशातील अविभाज्यता दाखवते. अल्लाच्या ९९ नावांत कोठेही हिंसेस स्थान नाही, हा मुद्दा बसताउठता अल्लातालाची नावे घेत आपले असहिष्णू निर्णय दामटणाऱ्या इस्लामी देशांच्या परिषदेसमोर मांडणे हा स्वराज यांचा राजनैतिक चौकार म्हणायला हवा. असे असताना इस्लामच्या नावे राज्यशकट हाकणारा एखादा देश हिंसाचाराचा आधार घेत असेल, दहशतवादास सक्रिय मदत करत असेल तर इस्लामी देशांच्या संघटनेने त्याची दखल घ्यायला हवी हे स्वराज यांचे प्रतिपादन. ते त्यांनी अत्यंत प्रामाणिक संयतपणे केले. त्याचमुळे भारताचा लढा हा इस्लाम वा एका कोणा धर्माविरोधात नाही तर त्या धर्माचा आधार घेत हिंसेचे निर्घृण आणि निलाजरे समर्थन करणाऱ्यांच्या, अश्रापांचे जीव घेणाऱ्यांविरोधात तो आहे, हे त्यांचे म्हणणे अमान्य करणे परिषदेस अशक्य ठरले.

स्वराज यांचा या परिषदेतील सहभाग हा बौद्धिक आनंद देणारा होता. त्याच वेळी आपल्याकडे अन्यत्र भावनांना हात घालून क्षुद्र राजकारण करणारे मैदान मारत असताना आणि विचारशून्य जन तितक्याच क्षुद्रपणे त्या आनंदात सहभागी होत असताना सुषमा स्वराज यांचे इस्लामी परिषदेतील वागणे आणि सादरीकरण हे भारताची उदात्तता आणि उदारता दाखवून देणारे होते. आपले मोठेपण काय हे आपल्याला माहीत हवे. इस्लामी परिषद त्यासाठी महत्त्वाची. म्हणून तिचे स्वागत.

via Sushma Swaraj speech at OIC meet | उदार आणि उदात्त | Loksatta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s