देशांतर्गत शांतता महत्त्वाची ! | अग्रलेख महाराष्ट्र टाइम्स

देशांतर्गत शांतता महत्त्वाची !
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभर शोकसंतप्त वातावरण आहे आणि ठिकठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देशावर एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या भावना तीव्र स्वरूपाच्याच असू शकतात आणि त्या असायलाच हव्यात. भावना तीव्र असणे म्हणजे घडलेल्या घटनेचे अतिव दु:ख होणे आणि त्याचवेळी हल्लेखोरांचा संताप येणे. सगळ्यांनाच सगळ्या भावना व्यक्त करता येतात असे नाही. संताप तर अनेकांच्या आतल्या आतच लाव्हारसासारखा खदखदत असतो. अलीकडच्या काळात अनेकजण सोशल मीडियावर संतापाला वाट करून देतात. काहींना टीव्हीच्या बूमसमोर संधी मिळत असते. आधीच्या काळात वृत्तपत्रांतील वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये पत्र लिहून भावना व्यक्त करणारी संवेदनशील माणसेही होती, आणि विवेकाने वागणाऱ्या माणसांचे ठरलेले मार्ग असतात त्यानुसार ते प्रतिक्रिया व्यक्त करीत असत. माध्यमे बदलली तशा व्यक्त होण्याच्या पद्धती बदलल्या. भाषा बदलली. सरकार शांततेची बोलणी करीत असले तरी वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर युद्धसृश्य वातावरण असते, त्यामुळे तिथे तशाच प्रतिक्रिया प्राधान्याने दाखवल्या जातात. या शाब्दिक प्रतिक्रियांबरोबरच ठिकठिकाणी लोक वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसताहेत. कुठे निदर्शने सुरू आहेत, कुठे हुतात्मा जवानांना आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको आणि रेल्वे रोकोसारखी आंदोलनेही झाली. सामान्य माणसांच्या पातळीवरच्या या सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत, कारण घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाने आपला मार्ग निवडला आहे. परंतु हे सगळ्याच मार्गांचे समर्थन करणे आजच्या घडीला धोकादायक आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भेट दिल्यानंतर म्हटले होते, की या काळात देशांतर्गत सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि सोशल मीडियावर राष्ट्रभक्तीच्या नावाखाली शिवराळपणा करणाऱ्या लोकांना त्याचे भान आहे, असे म्हणता येणार नाही. घडलेल्या घटनेमागे पाकिस्तानचा हात आहे, हेही खरे आहे. परंतु पाकिस्तानविरोधातला संताप इथे रस्त्यावर, रेल्वे रुळांवर व्यक्त करण्यात शहाणपणा नाही. संवेदनशील काळाचा फायदा घेऊन केलेली हुल्लडबाजी असेच त्याला म्हणता येईल. हुल्लडबाजी करून, जनजीवन विस्कळित करून आणि व्यवहार बंद करून देशभक्ती सिद्ध होत नसते. एवढी मोठी घटना घडली असतानाही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतलीच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपले सगळे नियोजित कार्यक्रम नीट सुरू ठेवले आहेत. त्यांच्याविरुद्ध कुणाला संताप व्यक्त करावा असे वाटत असेल तर त्याचाही मार्ग लोकशाहीने आखून दिला आहे. त्यामुळे संताप सरकारविरुद्ध व्यक्त करायचा असेल किंवा दहशतवादी आणि त्यांच्या पुरस्कर्त्या पाकिस्तानविरोधात व्यक्त करायचा असेल तरी तो करताना विवेक महत्त्वाचा आहे. ज्यांना राजकारण करायचे असते आणि बिघडलेल्या वातावरणाचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजून घ्यायची असते, त्यांना असले काही पटत नसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये घुसून बदला घ्यायला पाहिजे. हीच भाषा २०१४च्या आधी आता पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी बोलत होते आणि टाळ्या घेत होते. सत्तेत असणाऱ्यांना विरोधकांसारखे बेजबाबदार वागता येत नाही. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष सत्तेतही आहे, परंतु सत्तेची कोणतीही जबाबदारी त्यांना नको आहे. आणि भविष्यातही ते देशाच्या सत्तेच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी काहीही बोलले तरी चालते. पंतप्रधान मोदी यांनाही छप्पन इंचाची बढाई मागे ठेवून किंवा आपले जेम्स बाँड अजित डोवल यांना बाजूला ठेवून लष्कराला सर्वाधिकार दिल्याचे सांगावे लागले. युद्धासाठी आतुर झालेल्या सर्वभाषिक वृत्तवाहिन्यांच्या वृत्तनिवेदकांनी गेल्या चार दिवसांत काही शेकडा वेळा केंद्रातील मंत्र्यांना आणि भाजपच्या नेत्यांना सर्जिकल स्ट्राईक कधी करणार किंवा बदला कधी घेणार असे प्रश्न विचारले असतील. परंतु पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकण्याची भाषा पाच वर्षांपूर्वी बोलणाऱ्या एकानेही त्याचे ठोस उत्तर दिलेले नाही. यावरून सत्ताधाऱ्यांची गोची लक्षात येऊ शकते. दहशतवाद्यांना, त्यांना आश्रय देणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना धडा शिकवावा अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. परंतु कथित राष्ट्रभक्तांनी कितीही बढाया मारल्या तरी शांततेचा आग्रह धरणे आणि सरकारच्या पाठिशी एकमुखाने उभे राहणे हीच खरी देशभक्ती आहे.

via pulwama Attack: pulwama attack protest erupts against pakistan – देशांतर्गत शांतता महत्त्वाची ! | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s