दावा एक; वास्तव दुसरे! | अग्रलेख -महाराष्ट्र टाइम्स

दावा एक; वास्तव दुसरे!
राज्यातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या केवळ चार हजार ४१० पदांसाठी तब्बल सात लाख ८८ हजार इच्छुकांनी अर्ज करण्याची घटना रोजगार निर्मितीच्या दुर्दशेवर प्रकाश टाकते. वेतन, काम, सुरक्षितता, स्थैर्य, प्रतिष्ठा आदी अनेक कारणांमुळे सरकारी नोकरीचे आकर्षण अधिक असल्याने ती मिळविण्याची इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या अधिक असणे स्वाभाविक असले, तरी खासगी क्षेत्रातून अपेक्षित गतीने रोजगार निर्मिती न होणे हेही त्याचे एक कारण आहे. देशातील आर्थिक सुधारणांना पुढच्या टप्प्यावर नेतानाच, उद्योगांना पोषण वातावरण देऊन दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल संपत असतानाचे हे चित्र त्यांचे अपयश अधोरेखित करणारे आहे. मोदींचे आश्वासन प्रत्यक्षात आले असते, तर एव्हाना दहा कोटी रोजगार नव्याने निर्माण झाले असते. याबाबत दावे प्रतिदावे होत असले, तरी एकेका जागेसाठी शेकडोंनी अर्ज येणे, बेरोजगारांच्या फौजेत इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट आदी व्यावसायिक पदवीधरांची भर पडणे आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांच्या संख्येत सतत वाढ होणे या गोष्टी वास्तवाकडे निर्देश करतात. पंतप्रधान व सरकार भलेही आकडेवारीनिशी दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात रोजगार निर्मितीचा वेग मंदावल्याचे भोवतालच्या घटनांवरून स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी यांनी गुरुवारी काँग्रेससह विरोधकांना लक्ष्य केले; तसेच रोजगाराबाबत दावेही केले. औपचारिक क्षेत्रात फक्त दहा ते पंधरा टक्के रोजगार आहे, असे सांगून तिथे रोजगार वाढविण्यात आलेल्या अपयशाची मोदींनी एक प्रकारे कबुली दिली. अनौपचारिक क्षेत्रात ८५ ते ९० टक्के रोजगार असल्याचे सांगताना मोदींनी भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) आकडेवारी दिली. सप्टेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या काळात एक कोटी ८० लाख नागरिक प्रथमच या पीएफसाठी योगदान देऊ लागले, याकडे मोदींनी लक्ष वेधले. त्यांतही ६५ लाख जण २८ वर्षांखालील असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या चार वर्षांत ६५ लाखांवरून एक कोटी २० लाखांवर गेल्याचेही त्यांनी सांगितले. रोजगार निर्मितीचा वेग मंदावत असल्याचा आरोप खोडून काढण्यासाठी ही आकडेवारी त्यांनी दिली. खासगी क्षेत्रात नोकरी करणारे आधीची नोकरी सोडून जेव्हा नवी नोकरी धरतात तेव्हा आधीचे पीएफ खाते बंद करतातच असे नाही. त्यामुळे नव्या ठिकाणी नवे खाते सुरू होते. पीएफ खातेधारकांची संख्या आणि रोजगारवाढ यांचे नाते अन्योन्य नसल्याचे यावरून लक्षात यावे. ‘एनपीएस’ची योजना आधीपासून असली, तरी त्याकडे आकृष्ट होणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढते आहे. त्यामुळे आधीच नोकरीवर असलेले, पण नव्याने ‘एनपीएस’ खाते काढलेले अनेक असू शकतात. त्यामुळे ‘एनपीएस’ खातेधारकांची संख्या म्हणजे रोजगारवाढ असे थेट नाते जोडता येणार नाही. गेल्या साडेचार वर्षांत ३६ लाख ट्रक, दीड कोटी प्रवासी वाहने, २७ लाख ऑटो रिक्षा नव्याने रस्त्यावर आल्याचे पंतप्रधान सांगतात. वाहतूक क्षेत्रात अशा प्रकारे सव्वा कोटी लोकांना रोजगार मिळाल्याचा दावा त्यांनी केला. काही मंडळी अशी वाहने घेऊन व्यवसाय करतात व रोजीरोटी कमावतात हे खरे असले, तरी रस्त्यावर येणारी प्रत्येक नवी गाडी नवा रोजगार निर्माण करते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पर्यटनात दीड कोटी नवे रोजगार तयार झाल्याचे आणि पंतप्रधान मुद्रा योजनेत सव्वाचार कोटी नागरिकांना प्रथमच कर्ज दिल्याचे मोदींनी म्हटले आहे. या साऱ्यांमुळे अनौपचारिक क्षेत्रात रोजगार वाढल्याचा त्यांचा दावा आहे. कुठलीही नोकरी न मिळाल्यास काही जण स्वयंरोजगाराची वाट चोखाळतात, तर इतर मिळेल ते काम करतात. स्वयंरोजगार असो किंवा असंघटित, अनौपचारिक क्षेत्रातील काम; तिथे कमालीची असुरक्षितता असते. कामाची शाश्वती नसते. शिवाय कमाईही जेमतेम असते. रजा, सुट्या, इतर भत्ते, पीएफ यांचा तर पत्ताच नसतो. त्यामुळे असे काम हे एक प्रकारचे ‘हातावरचे पोट’ असते. औपचारिक क्षेत्रात रोजगारवाढ मर्यादित असल्याचे खुद्द पंतप्रधानांनी आकडेवारीनिशी सांगितले आहे. अनौपचारिक क्षेत्रात मात्र रोजगार वाढत असतील, तर तेथील परिस्थित सरकारने बदलायला हवी. वेतनापासून भविष्यनिर्वाह निधीपर्यंत साऱ्याचे नियमन केले; तसेच स्वयंरोजगारासाठी पोषक वातावरण दिले तर या कामातही सुरक्षितता येईल. तसे झाल्यास काही हजार जागांसाठी लाखोंनी अर्ज करण्याची वेळ देशातील तरुणांवर येणार नाही.

via Editorial News: claim one; real second! – दावा एक; वास्तव दुसरे! | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s