निषेधार्ह हस्तक्षेप | CBI–Maharashtra Times

निषेधार्ह हस्तक्षेप

व्हिडिओकॉन उद्योगसमूहाच्या कर्जप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्याधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी परदेशात बसून लिहिलेला ब्लॉग आणि लगेच या प्रकरणात गुन्हा दाखल करणाऱ्या सुधांशू धर मिश्रा या अधिकाऱ्याची होणारी बदली हा योगायोग नाही. उद्योगपती, बॅँका आणि राजकीय व्यवस्था यांचे हितसंबंध यांची साखळी किती मजबूत आहे हेच यातून स्पष्ट होते. उद्योगांना देण्यात आलेली लाखो कोटी रुपयांची कर्जे एकापाठोपाठ बुडित खात्यात जात असताना सीबीआय संबंधित संशयितांवर गुन्हे दाखल करू लागली की उद्योगपती व बँक अधिकाऱ्यांच्या मागे थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना उभे राहावेसे वाटते, हे देशातील सामान्य नागरिकांचे दुर्दैव आहे. व्हिडिओकॉन व सहयोगी कंपन्यांना दिलेल्या कर्जांमुळे आयसीआयसीआय बँकेला एक हजार ७३० कोटींचा तोटा सोसावा लागला. या कर्जात अनियमतता तसेच गैरप्रकार असल्याचे उघड झाल्यावर चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर व व्हिडिओकॉनचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या पार्श्वभूमीवर जेटली यांनी ब्लॉगमधून यंत्रणा तपास करीत आहे की साहस, असा प्रश्न विचारला. कोणाचा पक्ष घेण्यासाठी आपण हा सवाल करीत नाही हे सिद्ध करण्यासाठी जेटली यांनी वकिली भाषेत या दोहोंमधील फरक तपास अधिकाऱ्यांना समजावून सांगितला. वास्तविक जेटली जे सांगू इच्छितात, त्याच गृहितकावर संपूर्ण न्यायव्यवस्था बेतलेली आहे. शेकडो अपराधी सुटले तरी चालतील; परंतु एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये, याच तत्त्वावर न्यायालये काम करतात. सर्वोच्च न्यायालयात आयुष्यभर वकिली केलेल्या जेटली यांनीही पक्षकारांची बाजू मांडताना या विधानाचा आधार घेतला असेल. त्यामुळे, त्यांनी आता त्याचा अर्थ परत समजावून देण्याची गरज नाही. या प्रकरणातले पुरावे न्यायालयासमोर टिकणारे असावेत ही अपेक्षा योग्य असली, तरीही या पुराव्यांची वैधता ठरविण्याचा अधिकार जेटलींना कोणीही दिलेला नाही. तपास अधिकाऱ्यांच्या अशा दुःसाहसामुळे संबंधितांची प्रतिष्ठा धुळीला मिळते, अगदी त्यांची कारकीर्द धोक्यात येते, असेही सांगण्यास जेटली विसरत नाहीत. जेटलींना खरेतर हे खूप आधी आठवायला हवे होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेकदा असे घडले आहे. अनेक मोठी मंडळी न्यायालयात पुराव्याअभावी निर्दोष सुटतात; पण तशा निर्दोष सुटणाऱ्यांविषयी जनभावना काय असते हे जेटलींना बहुधा माहीत नसावे. जेटलींना स्वतःची मते मांडण्याचा अधिकार आहे. ते वकीलही आहेत. तशीच गरज पडली तर ते या प्रकरणात कोचर यांचे वकीलपत्र घेऊन थेट न्यायालयात त्यांची बाजूही मांडू शकतील. मात्र, सध्या ते गोपनीयतेची शपथ घेतलेले केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे विधान तपास यंत्रणांवर दबाव आणू शकते, इतकेही भान त्यांना उरलेले नाही का? त्यांचे स्वत:चे असे मत असले, तरी जाहीरपणे तसे बोलण्याचे स्वातंत्र्य सध्या त्यांना नाही. अभिव्यक्त होण्याची इतकीच तातडी असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग खुशाल तपास यंत्रणांच्या कथित साहसाबद्दल किंवा व्यावसायिकतेवर जाहीर चर्चा करावी. त्यांना कोणी अडवणार नाही. जेटली यांनी आपली मते जाहीर मांडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांची तातडीने बदली झाली. हे ही अपेक्षितच म्हटले पाहिजे. जेटलींसारखा जबाबदार व ज्येष्ठ मंत्री अशा पद्धतीने जाहीरपणे एखाद्या यंत्रणेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करतो, तेव्हा असे होणारच. व्हिडिओकॉन प्रकरणी छाप्यांच्या संदर्भातील माहिती फोडल्याचा आणि प्रकरणाचा तपास वेगाने करीत नसल्याचा खुलासा सीबीआयने संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीच्या पुष्ट्यर्थ केला आहे. मात्र, तो मुळीच पटणारा नाही. हा तपास संथगतीने होत होता हे सीबीआय अधिकाऱ्यांना जेटलींनी कान उपटण्यापूर्वी कळले नव्हते का आणि नसल्यास त्याबाबत त्यांनी याआधी काय केले, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहतात. म्हणूनच हे सगळे प्रकरण आणि त्यातील सगळ्या उच्चपदस्थांचे वर्तन कमालीचे संशयास्पद आहे. कोचर प्रमुख असलेली बँक व्हिडिओकॉन समूहाला कर्ज देते, त्यानंतर लगेच त्या समूहाच्या वतीने कोचर यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक होते, पाठोपाठ त्या कंपनीची सूत्रे कोचर यांच्या पतीकडे जातात.. या साऱ्या योगायोगांची तर्कशुद्ध उत्तरे जेटली देतील काय? तशी ती देता येत नसतील तर जेटली आपल्या पदाचा आणि सत्तेचा वापर देशातील कायद्याच्या राज्याला धक्का लावण्यासाठी करीत आहेत, असे म्हणावे लागेल. हा हस्तक्षेप निषेधार्ह आहे.

via Editorial News: neutral interference – निषेधार्ह हस्तक्षेप | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s