Adultery –Supreme Court Judgment–Editorial News: supreme court strikes down victorian-era adultery law – स्वागतार्ह निवाडा | Maharashtra Times

स्वागतार्ह निवाडा
‘भारतीय दंड संहिते’तील ४९७व्या कलमाला घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाने तब्बल १५८ वर्षे जुनी असलेली, कालबाह्य झालेली आणि विवाहित महिलेला पतीची ‘संपत्ती’ ठरविणारी तरतूद रद्द केली आहे.

स्त्री-पुरुष संबंध आणि विवाहसंस्था या दोहोंबाबत समाज संवेदनशील असतो हे खरे; परंतु ही संवेदनशीलता प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीतून आली असून, तीत स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे, पितृसत्ताक परंपरेतील नीती-नियमांची बदलत्या काळानुसार आणि राज्यघटनेच्या चौकटीत समीक्षा व्हायलाच हवी. कालबाह्य प्रथांची चिकित्सा करणे जसे गरजेचे असते, तसे जुन्या समाजव्यवस्थेतून आणि नैतिकतेतून जन्मलेल्या कलमांचाही फेरविचार आवश्यक असतो. ४९७व्या कलमाचा असा फेरविचार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरुवारी केला आणि त्यावर फुली मारली. विवाहबाह्य संबंधांना गुन्हा ठरविणारा हा कलम रद्द केल्याने अनैतिकता माजेल असा सवंग निष्कर्ष कोणी यातून काढत असेल, तर दोष दृष्टीचा म्हणावा लागेल. हा निवाडा विवाहबाह्य संबंधांना उत्तेजन देणारा नाही; तर अशा संबंधांत विवाहित स्त्रीला वस्तूप्रमाणे वापरण्याची रीत रोखणारा आहे. स्त्री-पुरुष हे कायद्यापुढे समान आहेत. राज्यघटनेच्या चौदाव्या अनुच्छेदाने ही समानता बहाल केली आहे; तसेच एकविसाव्या अनुच्छेदाने जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यही संरक्षित केले. मात्र, ४९७वे कलम या दोन्ही अनुच्छेदांना छेद देते. व्यभिचाराच्या या कलमानुसार एखाद्या विवाहित स्त्रीने स्वेच्छेने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवल्यास, तो गुन्हा ठरवून त्या पुरुषाला शिक्षा करण्याची तरतूद या कलमाने केली आहे. विवाहिता ही पतीची जणू मालमत्ता आहे, असे यातून ध्वनित होते. यामुळे, तिची मानहानी होते, असे सांगून न्या. मिश्रा यांनी हे कलम मनमानी करणारे ठरवले. विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोट होऊ शकतो किंवा असे संबंध ठेवणाऱ्या पतीची पत्नी आयुष्यही संपवू शकते. विवाहबाह्य संबंधांच्या अशा परिणामांची सर्वोच्च न्यायालयाला कल्पना आहे आणि न्या. मिश्रा यांनी त्यांचा उल्लेखही केला. एखाद्या पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आयुष्य संपविल्यास आणि तसे पुरावे मिळाल्यास तो आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, यामुळे विवाहबाह्य संबंधांना किंवा व्यभिचाराला फौजदारी गुन्हा ठरविता येणार नाही, असे मत त्यांनी नोंदविले. या मुद्द्याकडे न्यायालयाने घटनेच्या चौकटीतून पाहिल्याचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले. राज्यघटनेने बहाल केलेली समानता या कायद्यात प्रतिबिंबित होत नव्हती. या कायद्यामुळे विवाहितेच्या खासगीपणावर गदा येत होती आणि तिच्या सहचऱ्याला झुकते माप मिळत होते. म्हणूनच तो घटनाबाह्य ठरत होता. पूर्वापारचे सामाजिक नियम ‘नैतिकता’ ठरवतात आणि समाजाच्या नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पना याच नियमांवर आधारित असतात. मात्र, हे नियम पुरुषप्रधान आणि तत्कालीन अभिजन समाजप्रधान आहेत. विवाह बंधनाला पवित्र व अनुल्लंघ्य मानण्याचा नियमही यांपैकीच एक. विवाहसंस्था अतिशय महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही; परंतु तिला पवित्र मानून जोडप्यांच्या विवाहाला शाश्वत संबंधांचे रूप देण्याने पती व पत्नी या दोघांच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप होतो. आधी प्रेम, नंतर विवाह असो; किंवा विवाहानंतरचे प्रेम असो; अनेकदा ते टिकतेच असे नाही. अनेक कौटुंबिक व सामाजिक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे काहींच्या नात्यातील प्रेम, ओलावा कमी होतो. त्यातूनच काहीजण घटस्फोटाकडे वळतात, तर काही विवाहबाह्य संबंधांकडे आणि या संबंधांचीही परिणती घटस्फोटात होऊ शकते. म्हणूनच ४९७व्या कलमाचे समर्थन करताना सरकारने विवाहसंस्थेचा उल्लेख केला. विवाहसंस्थेचे पावित्र्य टिकण्यासाठीच हे कलम असल्याचा युक्तिवाद सरकारने केला. मात्र, यामुळे घटनात्मक तरतुदींचा भंग होतो, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत होते. विवाहबाह्य संबंधाला गुन्हा ठरविताना केवळ विवाहसंस्था टिकविण्याचा किंवा तिच्या पावित्र्याचा विचार करून चालणार नाही. विवाहबंधनातल्या स्त्री-पुरुषांच्या वैयक्तिक इच्छांचाही विचार करावा लागतो. पतीचे संमतीने कोणा पत्नीने संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरत नाही. यातूनही पतीचा पत्नीवर असलेला हक्कच दिसून येत होता. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा पुरातन कायदा रद्दबातल ठरविला आहे. जुन्या समाजव्यवस्थेवर आधारलेल्या पठडीबाज नैतिकतेच्या चष्म्यातून न पाहता भारतीय राज्यघटनेच्या चष्म्यातून पाहिल्यास हा निवाडा किती योग्य आहे, हे स्पष्ट दिसेल. म्हणूनच त्याचे स्वागत करायला हवे.

via Editorial News: supreme court strikes down victorian-era adultery law – स्वागतार्ह निवाडा | Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s