fuel price hike – असह्य भडका | Maharashtra Times Marathi Newspaper

असह्य भडका
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे चढे दर आणि डॉलरच्या तुलनेत अशक्त होत चाललेल्या रुपयाने सध्या कुणाचा आर्थिक छळ मांडला असेल तर तो भारतीयांचा. ऑगस्ट महिन्यात भारताने ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताच पाठोपाठ डॉलरनेही रुपयाची एकाहत्तरी साजरी केली. ७१ डॉलरचा भाव पार करणारे कच्चे तेल आणि रुपया यामुळे इंधनाचा भडका उडून शहरी आणि ग्रामीण अर्थकारणाला असह्य झळा बसू लागल्या आहेत. रोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणारा पेट्रोलचा दर शहरी मध्यमवर्गाचे जगणे अवघड करीत असताना ग्रामीण भागाला डिझेलच्या नव्या उच्चाकांनी त्रस्त करुन सोडले आहे.

एप्रिल-मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर असेच भडकत असताना कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. त्यावेळी कर्नाटकात मतदान पार पडेपर्यंत मोदी सरकारने तब्बल १९ दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, याची काळजी घेतली. पण आता नोव्हेंबर उजाडेपर्यंत देशात कुठे विधानसभा निवडणुका नसल्यामुळे तेवढीही उसंत मिळण्याची चिन्हे नाहीत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी २०१३-१४ सालात मनमोहन सिंग सरकारला लक्ष्य करताना पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि घसरत्या रुपयावर केलेली विधाने आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आली आहेत. पेट्रोलचा दर ८७ आणि डिझेलचा दर ७५ रुपयांवर पोहोचत असताना ही तात्पुरती दरवाढ असल्याचा बचाव पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना करावा लागत आहे. ती रोखण्यासाठी तूर्तास तरी मोदी सरकारपाशी कुठलीही योजना दिसत नाही. कच्चे तेलाचे भाव आणि रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरला तरच इंधनभडका काबूत येऊ शकेल. कच्चे तेल, डॉलर आणि रुपया यांच्या परस्परसंबंधांचे गणित सामान्यांसाठी गुंतागुंतीचे असले तरी या दरवाढीचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसतो. महागाईमुळे दैनंदिन खर्च वाढून मध्यमवर्गाचे बजेट कोलमडते, तर डिझेल दरवाढीमुळे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था हवालदिल होते. आताही शहरी भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना पेट्रोल दरवाढीचा आर्थिक मार सहन करावा लागत आहे, तर ग्रामीण भागात डिझेल दरवाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणखीच उग्र होत आहेत. सरकारने शेतमालाला दीडपट हमीभाव जाहीर केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अमलबजावणी दृष्टीपथात नसताना महागणाऱ्या डिझेलमुळे ट्रॅक्टर चालवणे आणि शेतमाल बाजारात नेणे या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. मे २०१४ मध्ये मनमोहन सिंग सरकार पायउतार झाले तेव्हा जगाच्या बाजारात कच्चे तेल १०५ डॉलर प्रतिबॅरल होते आणि मुंबईत पेट्रोलदर होता ७९.२६ रुपये प्रतिलिटर. त्यावेळी डॉलरचा भाव होता ५९ रुपये. म्हणजे त्यावेळी प्रतिबॅरल कच्च्या तेलाचा रुपयात दर होता ६१९५ रुपये. आज डॉलरचा भाव आहे ७१.५८ रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव आहे ७२ डॉलर प्रतिबॅरल. म्हणजे ५१५४ रुपये प्रतिबॅरल. तेव्हाच्या तुलनेत हजार रुपये स्वस्त. तरी पेट्रोलचा दर मे २०१४ च्या तुलनेत आज साडेसात रुपयांनी जास्त आहे.

मोदी सरकार येताच कच्च्या तेलाचे भाव वर्षभरात अगदी ४० डॉलरपर्यंत गडगडले. पण सरकारने त्याचा लाभ ग्राहकांना देण्याऐवजी सरकारची तिजोरी भरून घेतली. भविष्यात कच्चे तेल भडकले तर देशांतर्गत दर काबूत ठेवण्याची रणनीती यामागे होती. पेट्रोल-डिझेलच्या अबकारी करात बारावेळा वाढ करून आणि एकदा ते घटवून केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून साडेचार वर्षांत दहा लाख कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा विरोधी पक्ष करत आहेत. हा पैसा कुठे गेला, असा सवाल विरोधकांना पडला आहे. तब्बल १९ राज्यांत सत्तेत असलेल्या भाजपने पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करून नागरिकांची परवड थांबवावी, असे आव्हान विरोधी पक्ष देत आहेत. रुपया आणखी कमजोर झाल्याने काही फरक पडणार नाही, अशी विधाने मोदी सरकारमधील उच्चपदस्थ करीत आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीवरुन भाजपने रान माजवल्याने नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला होता. पण गेल्या साडेचार वर्षांत नागरिकांचा इंधन दरवाढीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असावा. त्यामुळे त्यांची नाराजी जाणवत नाही. त्यांच्या सहनशक्तीची कुठवर परीक्षा घेऊ शकतो, याचा मोदी सरकारही शांतपणे अंदाज घेत आहे. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असतानाही.

via Editorial News: fuel price hike – असह्य भडका | Maharashtra Times Marathi Newspaper

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s