demonetisation policy: failure of demonetisation – असत्याचा अस्त! | Maharashtra Times Marathi Newspaper

असत्याचा अस्त!
भारतीय रिझर्व्ह बँकेचा दीर्घकाळ प्रलंबित नोटाबंदी विषयीचा हिशेब अहवाल अखेर प्रसिद्ध झाला आणि विलंबाने का होईना, वास्तव समोर आले आहे. अर्थशास्त्राच्या कोणत्याही नियमात न बसणाऱ्या आणि कोणत्याही अर्थसल्लागाराने अनुमती न दिलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून सातत्याने रेटून त्याच्या समर्थनार्थ निर्माण केलेले आभासी चित्र अस्त पावले आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार १५ लाख ४१ हजार कोटी रुपयांच्या बंदी घातलेल्या चलनापैकी १५ लाख ३१ हजार कोटी रुपयांचे चलन बँकेत परत आले आहे. हे प्रमाण ९९.३ टक्के इतके आहे. म्हणजे केवळ दहा हजार ७२० कोटी रुपयांच्या नोटा परत आलेल्या नाहीत. आपला निर्णय चुकला असे कबूल करण्याऐवजी सरकारने या निर्णयामुळे अन्य कोणकोणते फायदे झाले याचा प्रचार सुरू केला आहे. त्यात करदात्यांची संख्या वाढली आणि केवळ कागदोपत्री असलेल्या लाखों कंपन्यांना चाप लागला, असे सांगण्यात येते. मात्र हे साध्य करण्यासाठी नोटाबंदीची गरज नव्हते, हे जनतेला कळते. पंतप्रधान मोदी यांनी आठ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता अचानक क्रांतिकारक अर्थशास्त्रज्ञाचे रूप धारण केले आणि ज्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने आपल्या सहीनिशी हमी दिली होती, त्या एक हजार रुपये आणि पाचशे रुपयांच्या मूल्यांच्या नोटा आता केवळ ‘कागदाचे तुकडे’ असतील असे जाहीर केले. तसे करण्याची तीन कारणे सरकारने सांगितली. पहिली गोष्ट दहशतवादाचा खात्मा. दहशतवादी बनावट नोटा छापतात आणि छुपा काळा पैसा वापरतात. त्यामुळे या मोठ्या नोटांवर बंदी घातल्याने देशविघातक दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे कंबरडे मोडेल आणि दहशतीचे समूळ उच्चाटन होईल. दुसरे कारण दिले होते ते देशातील काळा पैसा संपवण्याचे. काळा पैसा हा या सरकारचा विशेष अजेंडा होता. आधी तो स्वीस बँकेतून देशात आणण्याचा होता. त्याबद्दल काही करता आले नाही ही गोष्ट अलाहिदा, पण आता देशातला काळा पैसा बाहेर काढण्याचा हेतू होता. हजार व पाचशे या मोठ्या मूल्याच्या नोटा असल्याने या नोटांच्या रूपात काळा पैसा साठवला जातो व नोटाबंदीमुळे किमान पाच लाख कोटी रुपये इतका काळा पैसा बाहेर निघू शकेल, असा अंदाज होता. सरकारने सांगितलेले तिसरे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणातील रोकडता देशातील भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याने त्याचेही आपसूक उच्चाटन साधेल. तथापि, यातील काहीही साध्य झालेले नाही हे आता कळले तरी यापूर्वीही त्याची झलक मिळालीच आहे. तसेच, सरकारच आपल्या युक्तिवादाच्या विरोधात कृती करते हेही दिसले. जर एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात काळा पैसा साठवला जात असेल तर त्याहून मोठी दोन हजारांची नोट उपलब्ध झाल्याने तसे करणे अधिक सोयीचे होणार नाही का? असा प्रश्न सरकारला पडला नाही. नोटाबंदीच्या तीन आठवड्यानंतरच दहशवाद्यांकडे दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या, त्यामुळे तेही साध्य झाले नाही. पुन्हा सगळ्याच नोटा परत आल्या, त्यामुळे सरकारचा लाखों कोटी रुपयांच्या लाभाचा दावाही अन्य दाव्याप्रमाणेच मिथ्या होता हेही दिसून आले. नोटाबंदीनंतर रोख व्यवहार कमी होऊन डिजिटल चलनाला उत्तेजन मिळेल, असाही दावा नंतर केला जात होता. तोही किती आभासी होता, हेही उघड झाले. ही परिस्थिती दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळींचा आधार घेऊन वर्णन करायची झाली तर ‘टूटा तिलिस्म, सच सें भय खाता हूँ, गीत नही गाता हूँ..’ अशी डोळ्यांवरील मोहिनी उतरल्यानंतर जाणवणाऱ्या वास्तवाच्या चटक्यांप्रमाणे समोर आली आहे. हा निर्णय अविचारी, अविवेकी, नुकसानकारक आणि अर्थव्यवहाराशी विसंगत असल्याची ‘मटा’ची सुरुवातीपासून भूमिका होती. तीही या निमित्ताने योग्य असल्याचे सिद्ध झाले. परंतु ते महत्त्वाचे नाही. प्रश्न या निर्णयाच्या उत्तरदायित्वाचा आहे. या अट्टहासापायी कित्येक प्राण गेले, अनेक नोकऱ्या गेल्या आणि हातावर पोट असणारांचा रोजगार गेला. देशाच्या अर्थप्रगतीचे गाडे रुतले. अडचणीत असलेली अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी यांना मते देऊन ‘अच्छे दिन’ची आशा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांचे काय काय हाल झाले, याच्या करूण कहाण्या हृदयाला घरे पाडणाऱ्या आहेत. त्यांचे परिमार्जन कोण आणि कसे करणार?

via demonetisation policy: failure of demonetisation – असत्याचा अस्त! | Maharashtra Times Marathi Newspaper

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s