एनपीए आणि राजन – Maharashtra Times

बँकांमधील वाढत्या थकीत कर्जाचा (एनपीए) अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय, ही राजन यांच्या गुणवत्तेची व क्षमतेची पावती आहे. गव्हर्नर म्हणून राजन यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असली, बँकांना शिस्त लावली असली आणि नेत्यांच्या लोकानुनयाच्या धोरणांना बळी न पडता आर्थिक घडी बसविली असली, तरी या कामाची दखल न घेता मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर राजन यांना संसदीय समितीचे प्रमुख मुरली मनोहर जोशी यांनी आमंत्रित केल्याने त्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी या समितीसमोर माहिती देताना राजन यांनी ‘एनपीए’ कमी करण्याबाबत केलेल्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर राजन यांना आमंत्रित करण्याचा निर्णय झाला. या निमित्ताने राजन यांनी त्यांच्या कार्यकालात नेमके काय केले याची उजळणी होऊ शकते आणि त्यापुढे जाऊन आणखी काय करता येईल, याचा विचार होऊ शकतो. बँकांना ‘एनपीए’च्या ओझ्यातून पूर्णत: नसले, तरी अंशत: मुक्त करण्यासाठी यातून पावले पडली तर चांगलेच आहे. ‘एनपीए’ ही केवळ बँकांची नव्हे, तर संपूर्ण देशाची डोकेदुखी बनली आहे. थकीत कर्जाची रक्कम रोज वाढत असून, ती नऊ लाख कोटींच्या घरात गेली आहे. सर्वच क्षेत्रातील बँकांना थकीत कर्जाचा विळखा बसला असला, तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सर्वाधिक फटका बसतो आहे. सरत्या आर्थिक वर्षात २१पैकी केवळ दोन सरकारी बँकांनी किंचित नफा नोंदविला. उर्वरित १९ बँकांचा तोटा ८७३ अब्ज रुपयांवर गेला. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने २१पैकी ११ सार्वजनिक बँकांचा ‘प्रॉम्प करेक्ट अॅक्शन’च्या (पीसीए) यादीत समावेश केला. रुग्णालयाच्या भाषेत बोलायचे तर त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती केले आहे. थकीत कर्जामुळे तोट्यात जाणाऱ्या सार्वजनिक बँकांना संजीवनी देण्यासाठी सरकारकडून निधी दिला जात आहे. गेल्या तीन वर्षांत केंद्र सरकारने १.४ लाख कोटी रुपयांचे भांडवल या बँकांना दिले आहे. यांपैकी सर्वाधिक आजारी बँकांना दोन तृतीयांश रक्कम मिळाली. म्हणजेच ‘आयसीयू’तील ११ बँकांना गेल्या तीन वर्षांत झालेल्या तोट्याइतके भांडवल त्यांना मिळाले. चालू आर्थिक वर्षातही बँकांना ६५० अब्ज रुपये भांडवल देण्याची तरतूद सरकारने केली आहे. मात्र, नवे भांडवल आल्यानंतरही बँकांच्या मूळ रोगावर इलाज होत नाही. थकीत कर्जाचा सापळ्यात बँका अडकण्याचे थांबताना दिसत नाही. राजन यांनी गव्हर्नर असताना २०१५मध्ये ‘स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन बँकांना थकीत खातेदारांची यादी करण्यास सांगितले होते. ‘आरबीआय’नेही दीडशे खात्यांची यादी तयार केली आणि त्यात काटछाट करून नंतर १२० खात्यांची यादी अंतिम करण्यात आली. त्यानंतर बँकांनी आपल्या थकबाकीदारांवर शिक्कामोर्तब केले आणि आपल्या एकूण मालमत्तेपैकी ७.६ टक्के मालमत्ता (म्हणजे आठ लाख कोटी रुपये) थकविण्यात आल्याचे मार्च २०१६मध्ये जाहीर केले. उद्योगपतींना कर्ज देऊन उद्योग व रोजगार निर्मिती यांना पूरक वातावरण तयार करण्याचे काम बँका करतात. उद्योगपतींना असे भांडवल पुरविणे गरजेचेच असते; परंतु हा पुरवठा करताना अनेकदा बँकांवर दबाव टाकला जातो. सार्वजनिक बँकांवर हा दबाव अधिक असतो, असे सुब्रह्मण्यन यांनी संसदीय समितीसमोर सूचकपणे नमूद केले होते. हा दबाव झुगारून देताना राजन यांनी ‘एनपीए’बाबत काळजी घेण्यासाठी बँकांना काही सूचना केल्या होत्या. थकबाकी असलेला प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे काय, याचा आढावा बँकांनी वारंवार घ्यावा; व्यवहार्य नसेल तर ‘एनपीए’ जाहीर करून कर्जपुरवठा थांबवावा, असे ते सांगत. एखादा प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर अशा प्रकल्पाच्या चालकास कर्ज देऊ नये, अशी त्यांची सूचना होती. स्वत:हून थकबाकीदार झालेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असा त्यांचा आग्रह असे. एखाद्या बँकेचा ‘एनपीए’ किती आहे हे शोधण्यास ‘आरबीआय’ मदत करेल; परंतु पैसे परत मिळविण्याची जबाबदारी बँकेची असल्याचेही ते सांगत. नेमक्या याच कणखर भूमिकेची आज गरज आहे. सार्वजनिक बँकांना पुन:पुन्हा भांडवल पुरवठा करताना ‘एनपीए’चा डोंगर वाढणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी; कारण हा शेवटी सामान्य नागरिकांचा पैसा आहे. सार्वजनिक पैशाबाबतची ही जबाबदारी बँकांना टाळता येणार नाही. त्यांना ती कळत नसेल तर शिकवावी लागेल. आणि त्यासाठी रघुराम राजन यांच्यासारखे शिक्षक हवेत.

via raghuram rajan:parliamentary panel calls former rbi governor raghuram rajan to brief on npas | एनपीए आणि राजन – Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s