| वॉलमार्टचा प्रवेश – महाराष्ट्र टाइम्स –11.05.2018

भारतात जन्म झालेल्या फ्लिफकार्ट या कंपनीचा ७७ टक्के हिस्सा विकत घेऊन अमेरिकेतील ‘वॉलमार्ट’ने भारताच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. वॉलमार्ट आणि फ्लिफकार्ट यांच्यातील व्यवहार हा भारतीय भूमीवर घडलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौदा असून त्याचे आकडे सामान्यांना चकीत करून टाकणारे आहेत. अवघ्या अकरा वर्षांच्या कालावधीत फ्लिफकार्टचे बाजारमूल्य २१ अब्ज डॉलरच्या घरात जाणे हा देखील एक विक्रमच म्हणावा लागेल. स्वतः कोणत्याही गोष्टीचे उत्पादन न करता, तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील विविध उत्पादकांची उत्पादने आपल्या माध्यमातून विकण्याची यंत्रणा निर्माण करण्यात कमालीची यशस्वी झालेली कंपनी म्हणून फ्लिफकार्टचा उल्लेख करावा लागेल. सचिन व बिन्नी बन्सल यांनी २००७मध्ये बेंगळुरू येथील एका छोट्याशा फ्लॅटमध्ये फ्लिफकार्टची सुरुवात केली. हे दोघेही देशातील आयआयटीसारख्या नामवंत शिक्षणसंस्थेचे विद्यार्थी. काही तरी वेगळे करण्याच्या ऊर्मीने त्यांनी वेगळा प्रयोग केला आणि तो यशस्वीही करून दाखविला. १९९१ मध्ये डॉ. मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचे धोरण मांडले त्या वेळेस बन्सल बंधू चंडीगडच्या शाळेत जात होते. या धोरणांमुळे आपल्या देशामध्ये सरस्वतीच्या आधारे लक्ष्मीची कास धरणे शक्य होईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. मात्र, आज ते सत्यात उतरले आहे. भारतात टाटा, बिर्ला यांच्यासारख्या उद्योगपतींनी साम्राज्य उभी केली.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात अंबानी, मोदी, गोदरेज यांच्यासारख्या अनेकांनी ही परंपरा पुढे नेली. या सगळ्यांनी काहीतरी उत्पादन केले आणि ते देशाच्याच नव्हे तर जगाच्या बाजारामध्ये विकण्याची जिद्द धरली; पण कोणतेच उत्पादन प्रत्यक्षात न करता असा व्यवसाय उभा करणारे बन्सल हे पहिलेच भारतीय असावेत. प्रारंभी पुस्तक विक्री करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या फ्लिफकार्टने संपूर्ण देशामध्ये आपल्या सेवेचे जाळे विणले. जगामध्ये सर्वाधिक म्हणजेच सुमारे पाचशे अब्ज डॉलरची उलाढाल करणारी वॉलमार्टही कंपनी आहे. त्याखालोखाल चिनी सरकारच्या मालकीच्या कंपनीचा क्रमांक लागतो. या वॉलमार्टने या पूर्वीही भारतामध्ये येऊन स्थिरावण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेस झालेला विरोध आणि त्यानंतर भारती उद्योगसमूहाने घेतलेली माघार यामुळे वॉलमार्टला भारताच्या भूमीत पाय रोवता आले नव्हते. अमेरिकेतील त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या अॅमेझॉनने मात्र भारतामध्ये आपले पाय कधीच रोवले होते. आता अमेरिकेमध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा भारताच्या भूमीवरही चालेल. या स्पर्धेत ग्राहकाचाच विजय होऊ शकतो. त्यांना अधिक दर्जेदार उत्पादने वाजवी किंमतीमध्ये विकत मिळू शकतील. अर्थात वॉलमार्टच्या प्रवेशाचे अनेक इतर अर्थही आहेत. उत्पादक, वितरक, विक्रेता आणि ग्राहक या पारंपारिक साखळीला आव्हान देत या अॅमेझॉनपासून वॉलमार्टपर्यंतच्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. उत्पादक ते थेट ग्राहक अशा पद्धतीने काम करत असल्यामुळे मधले अनेक खर्च वाचून त्याचा अंतिम फायदा ग्राहकांना मिळत आहे. मात्र, यात मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका आहेच. त्याचा बाऊ करायचा नाही असे ठरविले तरीही या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचप्रमाणे देशामध्ये अनेक फ्लिफकार्ट का तयार होत नाहीत याचाही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअपच्या नावाखाली अनेक कंपन्या नवनवीन संकल्पना मांडून पुढे येत असल्या तरीही त्यांच्या यशस्वीतेचे प्रमाण खूप कमी आहे. ते प्रयोग जास्तीत जास्त यशस्वी कसे होतील हे पाहण्यासाठी सरकारबरोबर सामान्य नागरिकांनीही पाठिंबा देण्याची गरज आहे. या सौद्याचा फायदा मिळून फक्त बन्सलच नव्हे तर या कंपनीतील अनेक कर्मचारीही कोट्याधीश झाले आहेत. एका जिद्दीने सुरू केलेल्या या प्रवासाचा हा सुखद शेवट आहे. अर्थात वॉलमार्टने फ्लिफकार्टचे नाव कायम ठेवण्याचा निर्णय सध्या तरी घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात फ्लिफकार्ट ही भारतीय युवकांच्या दृष्टीने नवी प्रेरणा असेल. आता फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग हीच बाजारपेठ आहे आणि त्या संपूर्ण बाजारपेठेला कवेत घेण्याची जिद्द बाळगण्याची गरज आहे, हाच संदेश या एक लाख पाच हजार कोटी रुपयांच्या व्यवहारातून भारतातील नवीन पिढीला मिळणार आहे. म्हणूनच त्याचे स्वागत करायला हवे.

via walmart flipkart deal:walmart flipkart deal | वॉलमार्टचा प्रवेश – Maharashtra Times

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s