मार्क झुकेरबर्ग २०० कोटी लोकांचे गुन्हेगार –लोकमत–२९.०३.२०१८

आपण कुठे फिरायला बाहेर निघालात की न चुकता फेसबुकवर स्टेट्स अपडेट करता. जेथे जाल तेथील फोटो अपलोड करता. एरवीही या माध्यमातून दररोज तुम्ही आपले विचार व्यक्त करत असता. तुम्ही जे काही लिहिता त्यावर किती ‘लाईक्स’ मिळाल्या व किती ‘कॉमेंट््स’ आल्या याचाही हिशेब करता. याच फेसबुकवरून तुम्ही मित्रमंडळींशी व परिचितांशी चॅट करता, बऱ्याच गोष्टी शेअर करता. आपले फोटो व व्यक्तिगत माहिती फक्त फेसबुकपुरती मर्यादित राहील अशा भ्रमाखाली तुम्ही निश्चिंत असता. पण एक दिवस कळते की जिचा तुमच्याशी काही संबंध नाही अशा कुण्या कंपनीने फेसबुकवरची तुमची सर्व माहिती चोरली आहे. मग प्रश्न पडतो की, फेसबुकच्या संमतीखेरीज असे कसे होऊ शकते ? फेसबुकचे संस्थापक व सीईओ मार्क झुकेरबर्ग अशा प्रकारे माहिती चोरीला जात असल्याची कबुली देतात आणि डेटा सुरक्षित ठेवू न शकल्याची चूक मान्य करून त्याबद्दल माफीही मागतात.

झुकेरबर्ग यांना माफ करावे का, हा त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आहे. अंगाशी आल्यावर कबुली दिली म्हणून त्यांची आणि फेसबुकची ही बेपर्वाई किरकोळ समजायची का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी फेसबुक तुम्हाला हे माध्यम विनामूल्य का उपलब्ध करून देते याचा विचार करा. मोबाईल कंपन्या त्यांच्या सेवेचे शुल्क आकारतात, मग फेसबुकने मोफत सेवा देण्याचे औदार्य का दाखवावे? स्वत:ची पदरमोड करून मोफत सेवा द्यायला ती समाजसेवा करणारी संस्था तर नक्कीच नाही! खरं तर याचा कुणी कधी विचारही केला नाही. ज्यांनी थोडा फार विचार केला त्यांनी असा समज करून घेतला की हे प्रकरण डेटा नामक संपत्तीशी संबंधित आहे. फेसबुकचे युजर जेवढे जास्त तेवढा त्यांच्या माहितीचा खजिनाही जास्त, हे सरळ गणित आहे. याच संपत्तीच्या जोरावर झुकेरबर्ग कुबेरही लाजेल एवढे श्रीमंत झाले आहेत. त्यांची रोजची कमाई सुमारे २६ कोटी रुपये एवढी आहे. जगभरातील एकूण प्रौढांपैकी ५८ टक्के व एकट्या अमेरिकेतील ८१ टक्के प्रौढ नागरिकांकडे फेसबुक अकाऊंट आहे, हे झुकेरबर्ग यांच्या गर्भश्रीमंतीचे रहस्य आहे.

फेसबुकवरील डेटा चोरला जाण्याचे सर्वात गंभीर प्रकरण जेथे समोर आले त्या अमेरिकेचा प्रथम विचार करू. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका नावाची एक कंपनी आहे. या कंपनीवर असा गंभीर आरोप केला गेला आहे की, तिने एका अ‍ॅपचा वापर करून फेसबुकचा डेटा चोरला आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने प्रभावित करण्यासाठी सुमारे पाच कोटी फेसबुक युजर्सच्या व्यक्तिगत माहितीचा दुरुपयोग केला. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने आपल्यासाठी काम केल्याचा ट्रम्प यांनी इन्कार केला असला तरी ब्रिटनमधील एका वृत्तवाहिनीच्या गुप्ततेने काम करणाºया वार्ताहराने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचे सीईओ अ‍ॅलेक्झांडर निक्स यांनी याविषयी दिलेली कबुली कॅमेºयावर टिपली होती. त्या वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केला. त्यात अ‍ॅलेक्झांडर निक्स असे सांगताना दिसतात की, सन २०१६ च्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय होण्यात आमच्या कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली. निक्स यांनी असेही सांगितले की, कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी कालांतराने आपोआप नष्ट होणाºया ई-मेलचाही कंपनीने यासाठी वापर केला. ही माहिती फोडल्याबद्दल कंपनीच्या संचालक मंडळाने निक्स यांना निलंबित केले.

यात सरळ फेसबुकवर जबाबदारी येते. कारण ज्या अ‍ॅपचा वापर करून डेटा चोरला गेला ते अ‍ॅप फेसबुकनेच आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊ दिले होते. ही चोरी उघड झाल्यावर झुकेरबर्ग स्वत:हून वस्तुस्थिती जगापुढे मांडतील, अशी अपेक्षा होती. पण ते गप्प बसले. भारतातही अशाच फेसबुक डेटाच्या चोरीवरून ओरड सुरु झाली तेव्हा मात्र गप्प बसलेल्या झुकेरबर्ग यांनी मौन सोडले. सन २०१९ मध्ये भारतात होणाºया लोकसभा निवडणुकीत मतदारांवर फेसबुक डेटा चोरून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर कठोर कारवाई करण्याची तंबी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. युजर्सच्या संख्येच्या दृष्टीने विचार केला तर फेसबुकसाठी भारत खूपच महत्त्वाचा आहे. भारतात फेसबुक युजर २० कोटी आहेत. त्यामुळे भारतात बंदी घातली गेली तर फेसबुकची मोठीच पंचाईत होईल. यामुळेच झुकेरबर्ग यांना उघडपणे माफी मागून असे सांगावे लागले की, फेसबुकवरचा डेटा जर बाहेर जात असेल तर कंपनीचा संस्थापक व सीईओ या नात्याने त्याला आपण जबाबदार आहोत. डेटाचोरीबद्दल त्यांनी जगाची माफी मागितली असली तरी त्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत.

या डेटाचोरीवरून आपण नक्कीच धडा घ्यायला हवा. मुळात जी इतरांना देण्याची गरजच नाही अशी व्यक्तिगत माहिती फेसबुकसारख्या अशा माध्यमातून न देण्याचा संयम आपल्याला पाळावा लागेल. भारतात एरवीही प्रायव्हसीच्या कायद्याचे फारसे पालन केले जात नाही. ‘आधार’च्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीची माहिती सरकारने गोळा केलेली आहे. ते प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहेच. दुसरीकडे लोकांचे टेलिफोन टॅप केले जात असल्याच्या बातम्याही येत असतात. ही स्थिती चांगली नाही. सरकारमध्ये बसलेल्यांवर व लोकप्रतिनिधींवर दबाव वाढावा व त्यांनी प्रायव्हसी कसोशीने जपण्याच्या बाजूने उभे राहावे यासाठी बुद्धिजीवींनी याविरुद्ध आवाज उठवायला हवा. असे झाले नाही तर त्याने लोकशाहीचे मोठे नुकसान होईल.

हे लिखाण संपविण्यापूर्वी…

काही दिवसांपूर्वी पृथ्वीवरील ‘नॉर्दन व्हाईट’ प्रजातीच्या शेवटच्या नर गेंड्याचा मृत्यू झाल्याची एक अत्यंत वाईट बातमी युगांडातून आली. आता त्या जातीच्या फक्त दोन माद्या शिल्लक आहेत. त्यामुळे गेंड्याची ही प्रजाती विलुप्त होणे अपरिहार्य आहे. ब्रह्मांडातील सजीवांचे एकमेव ज्ञात वास्तव्यस्थान असलेल्या पृथ्वीवरील एकेक सजीव कायमसाठी नष्ट होणे ही डोळे पाणावणारी घटना आहे. या शेवटच्या नर गेंड्याचे वीर्य वैज्ञानिकांनी जतन करून ठेवले असेल तर ही प्रजाती टिकविण्याची थोडी तरी आशा बाळगता येईल. पण त्याचबरोबर एक आनंददायी व आशादायक बातमीही आली. मुंबईच्या वर्सोवा किनाºयावर सुमारे २० वर्षांनंतर आॅलिव रिडले प्रजातीच्या कासवांची ८० पिल्ले दिसून आली! या प्रजातीच्या माद्या समुद्राच्या किनारी बाहेर येऊन वाळूत अंडी घालून निघून जातात. नंतर पिल्ले जन्मली की लगेच समुद्राच्या दिशेने तुरुतुरु वाटचाल सुरू करतात. पूर्वी मुंबईच्या समुद्रकिनारी हे लोभस चित्र पाहायला मिळायचे. ही कासवे कमालीची संवेदनशील असतात. मध्यंतरी मुंबईचा समुद्र एवढा प्रदूषित झाला की या कासवांनी या घाणीकडे पाठ फिरविली. परंतु सामाजिक कार्यकर्ते अफरोज शाह व त्यांच्या सहकाºयांनी १२७ आठवडे खपून किनाºयाची साफसफाई केली आणि आॅलिव रिडले कासवांना प्रजननासाठी पुन्हा एकदा हा किनारा आश्वासक वाटला. भले शाब्बास!

via Mark Zuckerberg 200 Million People Criminals | मार्क झुकेरबर्ग २०० कोटी लोकांचे गुन्हेगार | Lokmat.Com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s