समाज(कंटक)माध्यमे |लोकसत्ता –२५.०३.२०१८

फेसबुक माहितीचोरीच्या प्रकरणाआड दडलेले चित्र भयावह का आहे, हे समजून घेतले पाहिजे..

एक छान म्हण आहे इंग्रजीत- ‘मोफत भोजन असे काहीही नसते’. त्याची किंमत चुकवावीच लागते. पण हा मोफतचा मोह भल्याभल्यांचा धृतराष्ट्र करून टाकतो. तेथे सामान्यांची काय कथा? त्यांना ‘फुकट’, ‘एकावर एक मोफत’ अशा विक्रीकलेच्या तंत्रांनी ग्राहकाच्या भूमिकेपासून कधीच दूर नेले आहे. आजच्या माहितीयुगाचा हा प्रस्थापित कायदाच आहे, की आपणांस कोणतीही गोष्ट मोफत दिली जात असेल, तर तेथे आपली भूमिका ग्राहकाची राहातच नाही. तेथे आपणच एक विक्रीयोग्य उत्पादन बनत असतो. फेसबुक माहितीसंच चोरीच्या नुकत्याच जगजाहीर झालेल्या प्रकरणातून आभासी विश्वातील हे वास्तव अत्यंत नग्नपणे समोर आले. ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’मधील एक माजी अधिकारी ख्रिस्तोफर वायली याने माहितीचोरीचे हे बिंग फोडले. वस्तुत त्याने केलेल्या गौप्यस्फोटात काहीही नवे नाही.  हे असे काही पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. केवळ फेसबुकनेच हे केले असेही नव्हे. माहितीयुगात डेटा वा माहितीसंच हेच चलनी नाणे आहे, त्याची किंमत इंधनतेलाहून अधिक आहे. तेव्हा ते विकले जाणारच होते. येथे प्रश्न असा येतो की हे सर्व जर सर्वानाच माहीत होते, तर या तथाकथित गौप्यस्फोटाने सर्व जगालाच मानसिक धक्का बसल्यासारखे का झाले?

याचे उत्तर दडले आहे ते त्या माहितीचा वापर ज्या प्रकारे झाला त्यात. केवळ वापरच नव्हे, तर त्यातून लोकांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासंबंधीच्या विविध शक्यताही जगजाहीर झाल्या, त्यामुळे या धक्क्याची तीव्रता अधिकच वाढली. हा वापर, या शक्यता ते सारेच एवढे भयंकर आहे, की आज प्रलयघंटावाद म्हणून त्याची वासलात लावणे सहज शक्य आहे. व्यक्तीचे खासगीपण, तिचे स्वातंत्र्य याबाबतच्या सजगपणाचा अभावच नव्हे, तर या गोष्टींबाबतच्या तिरस्काराची सांस्कृतिक परंपरा असलेल्या तिसऱ्या जगामध्ये – तुम्ही म्हणजे अतिच सांगता, असे काही होत नसते, कारण लोकांना सगळे काही माहीत असते – असे म्हणून हा विषय तुच्छतेने सहजच उडविला जाऊ शकतो. पण त्याला वाळूत तोंड खुपसणे असे म्हणतात. ज्यांच्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य आणि खासगीपणा हे जपण्यायोग्य मूल्य आहे, त्यांना असा शहामृगी बाणा पत्करता येणार नाही. त्यांना हे प्रकरण मुळातून समजून घ्यावे लागेल. या प्रकरणाचे मूळ कोणत्याही तंत्रज्ञानात नसून, ते दडलेले आहे ‘सहमती निर्मिती आणि अभियांत्रिकी’ या संकल्पनांमध्ये. सामान्य जनता ही मेंढराप्रमाणे असते. आपणांस हवी तशी सामाजिक, राजकीय वा आर्थिक संरचना उभारायची असेल, तर या मेषझुंडीच्या वर्तनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. हे दंडशक्तीने करता येते. त्याला हुकूमशाही म्हणतात. परंतु त्यात धोके खूप असतात. त्यापेक्षा व्यक्तीचे मन वळवणे, आपणांस हवी तशी तिची सहमती तयार करणे हे सोपे आणि चिरंतन टिकाऊ. प्रोपगंडाच्या विविध तंत्रांनी ते करता येते. तसे केले गेले आहे. आजही केले जात आहे. त्यासाठी आजवर पत्रकांपासून वृत्तपत्रांपर्यंत, भित्तिचित्रांपासून चित्रपटांपर्यंत विविध प्रकारची साधने प्रभावीपणे वापरली गेली. एकविसाव्या शतकात या साधनांना जोड मिळाली ती माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीची. दरम्यानच्या काळात मानवी मनाच्या अभ्यासात मोठीच प्रगती झाली होती. तिने आणि माहिती-तंत्रज्ञानक्रांतीने प्रोपगंडा तंत्र आणि साधनांची दिशाच बदलली. आजवर प्रोपगंडा राजकीय असो वा उत्पादनविक्रीसाठीचा, तो प्रामुख्याने समूहलक्ष्यी होता. तो चित्रपट, वृत्तपत्रे, नभोवाणी वा दूरचित्रवाणी यांसारख्या जनमाध्यमांतून – मासमीडियातून – व्यक्तीपर्यंत नेला जात असे. समूहातील सर्व व्यक्तींपर्यंत जाणारा संदेश हा एकसमान असे. त्यामुळे त्याचा सर्वावरच सारखा परिणाम होणे कठीण होते. त्याऐवजी समजा प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, गरजा, त्याचा स्वभाव, त्याचे विचार येथपासून आर्थिक क्षमता हे सर्व ध्यानात घेऊन त्याच्यावर खोल परिणाम करील असे संदेश त्याला पाठवता आले तर?

परंतु हे करायचे तर त्या व्यक्तीची सर्व माहिती आपल्याकडे हवी. येथे उपयोगास आले माहिती-तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाइल, त्यातील विविध उपयोजनस्थले, त्यातील समाजमाध्यमे. लोक काय पाहतात, कसे वागतात, काय विचार करतात हे समजून घेण्यासाठी पूर्वीचे हुकूमशहा गुप्तचर नेमत असत. लोकांच्या घरांत गुपचूप पाळतयंत्रे ठेवत असत. आता हे करण्याची आवश्यकताच उरली नाही. लोकच आता  स्वमर्जीने ही माहिती पुरवत आहेत. आपण दिवसभरात ऑनलाइन वा ऑफलाइन जे काही करतो त्याचा माहितीसंच म्हणजे बिगडेटा. विविध साधनांतून आणि समाजमाध्यमांतून तो मिळवला जात असतो. फेसबुक हे त्यातलेच एक. तेथे आपण जे काही उद्योग करतो, लिहितो, पाहतो, आवडी नोंदवितो त्याची नोंद होते हा या प्रकरणातील एक भाग. त्याचा दुसरा भाग सुरू होतो तो या नोंदींचा वापर नेमका कसा करायचा येथून. येथे प्रवेश होतो ब्रिटनमधील ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज’ आणि तिची उपकंपनी असलेल्या ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’चा. केंब्रिज विद्यापीठातील सायकोमेट्रिक सेंटरमधील संशोधनातून बिगडेटाच्या साह्य़ाने व्यक्तीचे मानसशास्त्रीय चित्र तयार करणे शक्य झाले होते. ‘ओशन मॉडेल’ म्हणून ते ओळखले जाते. ते एवढे सक्षम आहे की त्याद्वारे केवळ फेसबुकवरील लाइक्सच्या आधारे त्या व्यक्तीचा स्वभावच नव्हे, तर त्याच्या त्वचेचा रंग, लैंगिक आवड, आवडता पक्ष अशा अनेक गोष्टी अचूक सांगता येतात. एकदा हे सर्व ओळखणे सोपे झाल्यानंतर कोणत्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारच्या जाहिरातींचा मारा करायचा, त्यात प्रोपगंडाची कोणती तंत्रे वापरायची हेच ठरवायचे होते. केंब्रिज अ‍ॅनालिटिकावर असा आरोप आहे की त्यांनी आधी हे तंत्र भलत्याच मार्गाने हस्तगत केले. फेसबुकवरून लक्षावधी व्यक्तींची माहितीनोंद मिळवली . समाजमाध्यमांमुळे प्रत्येक व्यक्तीला एकेकटे गाठणे सोपेच बनले होते. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने अशा प्रकारे व्यक्तीलक्ष्यी प्रोपगंडा करण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले मोठे यश पाहायला मिळाले ब्रेग्झिटमध्ये आणि नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामध्ये. आज अनेक देशांमध्ये ही कंपनी वा तिच्या उपकंपन्या प्रोपगंडाचा उद्योग करीत आहेत. भारतातही त्यांनी वेळोवेळी या अथवा त्या पक्षासाठी काम केलेले आहे.

व्यक्तीला वेचून काढून त्याच्या नकळत त्याच्यावर प्रोपगंडाच्या तंत्रांचा मारा करणे हे एकंदर समाजासाठी किती घातक ठरू शकते याची कल्पनाच करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘नाइन्टीन एटी फोर’ या कादंबरीकडे जावे लागेल. आपण वैचारिक गुलाम आहोत आणि त्याचा आपल्याला पत्ताही नाही आणि त्यामुळे आपले सत्ताधारी – मग ते आर्थिक क्षेत्रातील असोत वा राजकीय – सहजच आपल्या सहमतीची निर्मिती करू शकतात, ही स्थितीच भयानक आहे. परंतु त्याकडे हळूहळू सर्वाचाच प्रवास सुरू आहे. आपल्याहाती कवडीमोलाने ‘इंटरनेट डेटा’ दिला जात आहे. लोकांनी अधिकाधिक ऑनलाइन राहावे आणि विविध संकेतस्थळांतून, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, ट्विटर यांसारख्या मोफत समाजमाध्यमांतून आपली माहिती पेरत राहावे असा हा सर्व उपक्रम आहे. आम्ही तुमच्यासमोर मोफतच माहितीनग्न होतो, तुम्ही त्याचा वापर करून आम्हांला भावेल अशा जाहिराती दाखवा, तसे प्रचारी संदेश पाठवा, आम्ही त्यानुसार वागू अशा परिस्थितीकडे आपण चाललो आहोत. सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्यांना लोकांच्या माहितीचा ‘आधार’ हवा आहे तो त्यासाठीच. फेसबुक माहितीचोरीच्या प्रकरणाआड असे भयावह चित्र दडले आहे. या समाजमाध्यमांची आवश्यकता, त्यांचे लाभ आणि त्यांची समाजकंटकता हे सर्वच तपासून घेण्याची वेळ आता आली आहे..

via The Facebook and Cambridge Analytica scandal | समाज(कंटक)माध्यमे | Loksatta

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s