दररोज २८ जण ‘सायबर क्राइम’च्या [ जाळ्यात सापडतात ]| eSakal–२१.०३.२०१८

काळानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सायबर क्राइमचे प्रमाणही वाढले आहे. घरफोडीपेक्षा कुठेही राहून ऑनलाइन चोरी करणे सहज शक्‍य झाले आहे. फसवणूक करणारी व्यक्ती त्याचे काम झाल्यानंतर तत्काळ मोबाईल, सिम कार्ड, फेसबुक किंवा अन्य माध्यमातील संपर्क नष्ट करतो. बनावट कागदपत्रांद्वारे मोबाईल सिम कार्ड, बॅंक खाती उघडतो. बॅंका, फेसबुक, गुगल, विमा व मोबाईल कंपन्यांकडून पुरेशी माहिती मिळत नाही. उपलब्ध माहिती खोटी असते. वेळखाऊ व किचकट प्रक्रियेमुळे शोधकार्यास विलंब होतो. तांत्रिक व अन्य आव्हाने असतानाही पोलिस गुन्हे उघडकीस आणतात. मात्र, सायबर क्राइमबाबत जनजागृतीची गरज आहे. – सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्‍त
पुणे – ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका गृहिणीच्या मोबाईलवर एका महिलेने संवाद साधला. वारंवार फोन आल्यावर विश्‍वास ठेवून तिने साठ हजार रुपये भरले. दिवसागणिक आणखी पैशांची मागणी होत गेली.
आपली फसवणूक होत असल्याचे गृहिणीच्या लक्षात आले. या संदर्भात गेल्या वर्षभरात दहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यानुसार दररोज २८ या नागरिक फसवणूक करणाऱ्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत आहेत.
गलेलठ्ठ पगाराची नोकरी देतो, वर अमेरिकास्थित असून त्यास वधू पाहिजे, तत्काळ कर्ज मिळेल, महागडी तिकिटे स्वस्तात देतो, अशी विविध कारणे सांगून फोनद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी फोनद्वारे संपर्क साधून, तर कधी ई-मेल, मेसेज किंवा फोनद्वारे नागरिकांची वैयक्तिक ओळख (आयडेंटिटी थेफ्ट) म्हणजेच नाव, पत्ता, आयडी क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, युजर नेम, पीन, पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांकाची चोरी करून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न होत आहे, तर कधी बॅंकेचे अधिकारी असल्याचे सांगून खात्याबाबतची माहिती मिळविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. गेल्या वर्षभरात सायबर क्राइमच्या दरमहा पाच हजार ७४१ म्हणजे दररोज १५, तर ऑनलाइन फसवणुकीच्या चार हजार ३२० म्हणजे दररोज १३ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत सायबर क्राइमच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे म्हणाल्या, ‘‘फोन, मेसेज, ऑनलाइन खरेदी-विक्री तसेच अन्य सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरील प्रलोभने व आमिषांना नागरिक बळी पडतात आणि फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात. विशेषतः सोशल नेटवर्किंगचा नव्याने वापर करणाऱ्या दहा वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळ्याच वयोगटातील व्यक्ती फसवणूक करणाऱ्यांचे सावज ठरू लागल्या आहेत. फसवणूक होणाऱ्यांमध्ये व्यावसायिक, महिलांचे प्रमाणही अधिक आहे.’’
फिशिंग म्हणजे काय?
सोशल मीडिया, बॅंकिंग व एटीएम कार्डचे डिटेल्स मिळविणे
फिशिंगचाच पुढील प्रकार ‘विशिंग’ असून, यात फोनवरून संवेदनशील माहिती मिळविण्यात येते
मूळ संकेतस्थळासारख्या बनावट संकेतस्थळाद्वारे ग्राहकांना फसविणे
ई-मेल, मोबाईलवर मेसेजद्वारे बनावट वेबलिंक पाठवून माहिती चोरणे
फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
बॅंक, क्रेडिट, डेबिट कार्डबाबतची माहिती व वैयक्तिक ओळख गुप्त ठेवणे
मोबाईल व संगणकावरील विविध साईट्‌स व ॲप्लिकेशनमधून कामानंतर तत्काळ लॉगआउट करणे
ई-मेल पासवर्ड ‘ऑटोसेव्ह’ करणे टाळावे
इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांचा पासवर्ड सतत बदलता ठेवणे
मोबाईललाही पासवर्ड ठेवावा
कार्डचा वापर करण्यापूर्वी एटीएम सेंटरमध्ये काळजी घ्यावी
मोबाईलमध्ये बॅंकविषयक माहिती न ठेवणे
सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर आपले सध्याचे ठिकाण (लोकेशन) देण्याचे टाळणे
ऑनलाइन खरेदीपूर्वी संकेतस्थळाची सत्यता पडताळणे
https ने सुरू होणाऱ्या सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा
फसवणूक करणारे कोण?
ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांमध्ये नायजेरिया येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना भारतीय नागरिकांकडून मदत मिळते. त्यापाठोपाठ विवाहविषयक, बॅंकिंग, विमा, नोकरीचे आमिष आणि ऑनलाइन माहिती चोरून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात मुंबई, दाक्षिणात्य राज्यात बंगळूर, तर उत्तरेकडे दिल्ली या मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचे वास्तव्य असते.
सायबर क्राइमच्या दाखल तक्रारी
वर्ष                              तक्रारी
२०१६                          २०७९
२०१७                          ५७४१
२०१८ (फेब्रुवारीअखेर)     ८८०
ऑनलाइन माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक
वर्ष                         तक्रारी
२०१६                       ११६७
२०१७                         ४३२०
२०१८ (फेब्रुवारीअखेर)    ६६६
सायबर गुन्ह्यांचे प्रकार
फिशिंग, हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, विवाहविषयक फसवणूक, वैयक्तिक ओळख वाढवून चोरी, बॅंक / विमाविषयक फसवणूक, ऑनलाइन खरेदी, समाजमाध्यमांद्वारे होणारे गुन्हे.
कायदा काय सांगतो
ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, हॅकिंग, विवाह, विमा, बॅंकविषयक फसवणूक केल्यास त्यास ‘इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी ॲक्‍ट २०००’ नुसार कारावासाच्या शिक्षेसह लाखो रुपयांचा दंडही होऊ शकतो.

via pune news cyber crime दररोज २८ जण ‘सायबर क्राइम’च्या | eSakal

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s